Monday, August 17, 2026
Homeफलटणचार वर्षांपासून फरार असलेला खून प्रकरणातील दोषी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चार वर्षांपासून फरार असलेला खून प्रकरणातील दोषी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

चार वर्षांपासून फरार असलेला खून प्रकरणातील दोषी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सातारा | प्रतिनिधी :-  खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर जाऊन तब्बल चार वर्षांहून अधिक काळ फरार असलेल्या भरत कांतीलाल ओसवाल (रा. गुलमोहोर कॉलनी, शाहुपुरी, सातारा) याला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी शाहुपुरी चौक परिसरातून अटक केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

भरत ओसवाल हा शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून आणि कौटुंबिक छळ (भादंवि कलम 302 व 498-अ) प्रकरणात शिक्षा भोगत होता. 14 मे 2020 रोजी तो 45 दिवसांच्या पॅरोल रजेवर कारागृहातून बाहेर आला होता. कोविड-19 काळातील विशेष सवलतीमुळे त्याच्या रजेचा कालावधी वाढविण्यात आला. मात्र, 19 मे 2022 रोजी कारागृहात परत हजर राहणे बंधनकारक असतानाही तो गैरहजर राहिला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 172 व 224 अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फरार झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले होते. आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने आणि वेशांतर करून राहत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण तसेच नातेवाईक आणि परिचितांच्या संपर्कातून पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा निश्चित केला.

विश्वसनीय माहितीच्या आधारे बुधवारी शाहुपुरी चौक परिसरात सापळा रचून पोलिसांनी भरत ओसवाल याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, पृथ्वी जाधव, रोहित निकम आणि महेश निर्मळ यांनी केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पथकाचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments