
सातारा | प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १५ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून, लाखो वारकरी आणि भाविकांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन पूर्ण केले आहे. पालखीचा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्काम असणार असून, या काळात सुमारे एक हजार अधिकारी व कर्मचारी विविध विभागांतून सेवा बजावणार आहेत. तसेच १०० हून अधिक आरोग्य पथके वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
वारकऱ्यांना तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी पालखी तळांवर ४ आरोग्य पथके, ४ आयसीयू पथके, ४६ फिरती वैद्यकीय पथके, १७ तात्पुरते दवाखाने आणि १२ रुग्णवाहिका पथके कार्यरत राहणार आहेत. जर्मन हँगरमध्ये ७ वैद्यकीय मदत पथके तसेच ७ फूट मसाज पथके सेवा देणार आहेत. याशिवाय ‘मेडिसीन ऑन व्हील’ या संकल्पनेअंतर्गत ३ विशेष वैद्यकीय पथकेही कार्यरत राहतील.
पालखी मार्गावरील हॉटेल्स व खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यासाठी ३ विशेष सनियंत्रण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणे तसेच हॉटेल कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झाली आहे की नाही, याची पाहणी करणार आहेत.
वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी खंडाळा तालुक्यात ५ आणि फलटण तालुक्यात २९ अशी एकूण ३४ पाणी शुद्धीकरण पथके तैनात करण्यात आली आहेत. पाणी टँकर भरण्यासाठी ६२ फिलिंग पॉइंट तयार करण्यात आले असून, त्यामध्ये खंडाळा तालुक्यात १६ तर फलटण तालुक्यात ४६ ठिकाणांचा समावेश आहे.
पालखी मार्गावर ७ सार्वजनिक विहिरी, ७४ बोअरवेल, ३१५ खासगी विहिरी आणि ५४ नळ पाणीपुरवठा योजना अशा विविध स्रोतांद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय शासकीय ३२, खासगी ५७ आणि दिंडी व्यवस्थापनातील ५७८ असे एकूण ६६७ पाणी टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत.
पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये आणि आरोग्यविषयक मदत तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद आणि उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.










