लोहगड हत्या प्रकरणाचा उलगडा : बहिणीच्या संशयामुळे उघड झाले केतन अग्रवाल हत्येचे गूढ

0
2
लोहगड हत्या प्रकरणाचा उलगडा : बहिणीच्या संशयामुळे उघड झाले केतन अग्रवाल हत्येचे गूढ

पुणे प्रतिनिधी :- १८ जून २०२६ हा दिवस पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक विशाल अग्रवाल यांच्या कुटुंबासाठी आयुष्यभर विसरता न येणारा ठरला. त्यांचा २६ वर्षीय मुलगा केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले गेले. केतन आपल्या होणाऱ्या पत्नी सिया गोयलसोबत तिच्या प्री-बर्थडे सेलिब्रेशनसाठी ट्रेकला गेला होता. मात्र हा ट्रेक त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.

अपघाताची नोंद, पण बहिणीच्या मनात कायम संशय

घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. दुःखात बुडालेल्या अग्रवाल कुटुंबाने कोणताही संशय व्यक्त न करता केतनवर अंत्यसंस्कार केले. मात्र केतनची बहीण या घटनेबाबत सतत साशंक होती. “नेमकं काय घडलं?”, “तो कसा पडला?”, “त्याला वाचवता आलं असतं का?” असे अनेक प्रश्न तिच्या मनात कायम होते.

सियाच्या उत्तरांमुळे वाढला संशय

अंत्यसंस्कारानंतर चार दिवसांनी सिया गोयल सांत्वनासाठी अग्रवाल कुटुंबाच्या घरी आली. त्यावेळी केतनच्या बहिणीने तिला लोहगडावर घडलेल्या घटनांबाबत सविस्तर विचारणा केली. मात्र सिया अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. तिची उडवाउडवीची भूमिका पाहून बहिणीचा संशय अधिकच बळावला. तिने ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिली.

सीसीटीव्ही फुटेजने बदलली तपासाची दिशा

कुटुंबीयांच्या संशयानंतर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना एका संशयित तरुणाची हालचाल पोलिसांच्या नजरेत भरली. ऐन उन्हाळ्यात हुडी घालून, चेहरा झाकून आणि कानात हेडफोन घालून फिरणाऱ्या त्या तरुणाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे दिसून आले. याच धाग्यावरून तपासाची दिशा बदलली.

प्रेमसंबंधांचा उलगडा; दोघांची कबुली

तपासादरम्यान सिया गोयलचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला दोघांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या कसून चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणात केतनच्या बहिणीने दाखवलेल्या सतर्कतेमुळे सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य समोर आले. तिच्या चिकाटीमुळेच या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू झाला आणि कथित हत्येचा उलगडा होण्यास मदत झाली.