Tuesday, August 11, 2026
Homeफलटणशेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला; टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण

शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला; टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण

शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला; टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण

फलटण | प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील टाकळवाडा येथे शेतजमिनीच्या वहिवाटीच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्यावर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ऊस तोडणीच्या कारणावरून झालेल्या या वादात टिकावाच्या दांड्याने व कुऱ्हाडीच्या तुंब्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अर्जुन आण्णा नाझीरकर (वय ५४, रा. टाकळवाडा, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा आणि त्यांचे भाऊ तात्याराम आण्णा नाझीरकर यांच्यात शेतजमिनीच्या वहिवाटीवरून दीर्घकाळापासून वाद सुरू असून संबंधित दिवाणी दावा न्यायालयात प्रलंबित आहे.

दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तात्याराम नाझीरकर हे वादग्रस्त शेतातील ऊस तोडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अर्जुन नाझीरकर तेथे गेले. त्यांनी ऊस तोडण्यास विरोध केल्यावर “हे शेत माझे आहे, मध्ये पडलास तर जीवे मारेन,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

त्यानंतर त्याच दिवशी दुपारी सुमारे ३.१५ वाजता शेजारील ओढ्याजवळ ऊस कुटी मशीनद्वारे ऊस कुटला जात असताना अर्जुन नाझीरकर यांनी याबाबत जाब विचारला. यावेळी संतोष तात्याराम नाझीरकर यांनी टिकावाच्या दांड्याने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली, तर तात्याराम नाझीरकर यांनी कुऱ्हाडीच्या तुंब्याने डाव्या हाताच्या कोपरावर व उजव्या हातावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनीही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या अर्जुन नाझीरकर यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सागर अभंग करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments