Tuesday, August 11, 2026
Homeक्रीडाऑलिम्पिक दिनानिमित्त फलटणच्या लखन मोरे यांचा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून गौरव

ऑलिम्पिक दिनानिमित्त फलटणच्या लखन मोरे यांचा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडून गौरव

सॉफ्ट हॉकीच्या माध्यमातून भारतीय संघाचे नेतृत्व; देशाला मिळवून दिलेल्या यशाबद्दल सन्मान

फलटण | प्रतिनिधी :- दरवर्षी २३ जून रोजी जगभरात तसेच भारतात ऑलिम्पिक दिवस उत्साहात साजरा केला जातो. खेळातील कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती, सक्रिय जीवनशैली आणि जागतिक एकता व बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी हा दिवस प्रेरणादायी ठरतो.

याच पार्श्वभूमीवर पुणे येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात फलटणच्या सुपुत्र श्री. लखन मोरे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

लखन मोरे यांनी सॉफ्ट हॉकी या खेळाच्या माध्यमातून भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवित देशाचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत देशाचा गौरव वाढविला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने त्यांचा सन्मान करून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला.

फलटणच्या भूमीतून घडलेला हा खेळाडू आज अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान ठरत असून, त्यांच्या यशामुळे फलटणच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. लखन मोरे यांच्या या सन्मानाबद्दल फलटण शहर व तालुक्यातील क्रीडाप्रेमी, नागरिक आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

फलटणच्या मातीतून उगवलेली ही क्रीडा प्रतिभा भविष्यातही देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

“आपलं सुंदर फलटण… हरित फलटण… मी फलटणकर!”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments