
फलटण | प्रतिनिधी :- माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून महसूल विभागाने फलटण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच साखरवाडी (पिंपळवाडी) येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
संतोष पाटील यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, फलटण येथे नव्याने सुरू होणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय कार्यरत राहणार आहे. या कार्यालयाच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात फलटण, माण आणि खटाव या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची महसूल व प्रशासकीय कामे अधिक वेगाने, कार्यक्षमतेने आणि स्थानिक पातळीवर मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
याचबरोबर, फलटणच्या उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर यांनी साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची स्वतंत्र अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात होळ, तरडगाव आणि आदर्की बुद्रुक या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना महसूल विषयक सेवांसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार असून प्रशासन अधिक लोकाभिमुख होणार आहे.
फलटण आणि परिसराच्या प्रशासकीय विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या दोन्ही कार्यालयांच्या मंजुरीसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने यास मान्यता देत अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार व्यक्त केले.
या निर्णयामुळे फलटण, माण, खटाव तसेच साखरवाडी परिसरातील नागरिकांना प्रशासन अधिक जवळून उपलब्ध होणार असून विकास प्रक्रियेला नवी गती मिळणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.










