बलराज संघई यांचा कॉलम: योगाभ्यास ही पहिली पायरी, आत्मसाधना हा मूळ उद्देश

0
6
बलराज संघई यांचा कॉलम:  योगाभ्यास ही पहिली पायरी, आत्मसाधना हा मूळ उद्देश


  • Marathi News
  • Opinion
  • Balraj Sanghai: Yoga Practice Is First Step, Self Realization Is Core Purpose

बलराज संघई18 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

योगाभ्यास सर्वांनाच करावा वाटतो. परंतु तो आज नको उद्यापासून करू अशी एक मानसिकता आज मोठ्या प्रमाणात दिसून येते. आज सर्वांनाच योगाभ्यास प्रत्यक्ष जीवनात सक्रिय करण्याची आवश्यकता आहे. ” योगा ” बद्दल सर्वजण सगळीकडे वाचतात, ऐकतात कोणीही अनभिज्ञ नाही. तथापि आपण मांडलेला विषय, विचार उपयुक्त आहे.

योगाभ्यास आज आणि आजच झाला पाहिजे, उद्यापासून नको हे बरोबर आहे. उद्या कधीच येत नसतो, आज हे सत्य असते. भविष्य कधीच अस्तित्वात नसते. तो क्षण वर्तमान म्हणून अस्तित्वात येत असतो. काळ हा कोणासाठीही थांबत नाही. काळ निरंतर गतिशील असतो. काळाचा परिणाम म्हणूनच जीव अजीव सर्वांच्या अवस्थेमध्ये परिवर्तन होत असते. मन प्रसन्न ,समभावात राहण्यासाठी आणि शरीर स्वस्थ राहण्यासाठी, उत्साह आणि ऊर्जा वाढण्यासाठी योगाभ्यास हा दररोज केला पाहिजे. दररोजच्या दिनचर्यामध्ये पहाटे किंवा सकाळच्या पहिल्या वेळेमध्ये आवश्यक म्हणून काहीवेळ यासाठी राखून ठेवावा, अवश्य द्यावा. साधनेसाठी पहाटेचा वेळ हा उत्कृष्ट यासाठीच की त्यावेळी साधना पूर्णत्वाला जावी असे पवित्र स्त्राव हे अनेक ग्रंथी मधून स्त्रवत असतात. आपल्या योग साधनेला त्याची मदत होते. कोणत्या ग्रंथी मधून कोणत्या समयाला कोणते स्त्राव स्त्रवतात याचे विस्तृत विश्लेषण करण्याचा या ठिकाणी विचार नाही.

वास्तविक पाहता शरीरासाठी केलेला योगाभ्यास त्यासाठी आसन प्राणायाम या क्रिया अस्तित्वात आहेत. मन आणि चैतन्याच्या उज्वलतेसाठी योगाच्या पुढील पायरी ” ध्यान ” ही अस्तित्वात आहे. योगाच्या आधारे शरीर स्वस्थ आणि मन स्थिर करायचे असते. ही स्थिरता साधली म्हणजे त्यातूनच मनाची एकाग्रता साधली जाते. मनाच्या चंचल वृत्तीला लगाम घालणे हा योगाचा उद्देश आहे.

आत्मिक उज्वलतेसाठी साधना करत असताना योगा ही पहिली पायरी. शरीर आणि मनाची स्वस्थता हे त्यातून मिळवलेले उत्पाद. मूळ उद्देश हा आत्मसाधना आहे. या साधनेच्या प्रक्रिया प्रवृत्ती मध्ये योगा म्हणजे योगाभ्यास हे नितांत आवश्यक आहे. परंतु आज आत्मसाधनेचा उद्देश सोडून शारीरिक स्वस्थतेसाठी, शरीर अधिक काळ व्यवस्थित टिकवण्यासाठी व्यायाम यादृष्टीने योगा कडे पाहिले जाते.

आत्मसाधने साठी केल्या जाणाऱ्या ध्यानाची,साधनेची आसन ही पहिली पायरी. त्यानंतर मनाची चंचलता दूर करण्यासाठी प्राणायाम. आणि त्यातून एकाग्रता साधल्यानंतर ध्यानाची एक एक पायरी आत्मसात करायची असते. म्हणूनच आत्मिक उज्वलता या परम पावन पवित्र साध्यासाठी योगाभ्यास आणि ध्यान ही साधना असते. यात आपण स्वतः साधक. मग साधक कसा असावा यासाठी काही नियम असतात. ते समग्रपणे या ठिकाणी विश्लेषण करण्याचा विचार नाही. सात्विक आहार आणि विहार, आणि सर्व विषयात समभाव ही जीवनशैली इतकेच या ठिकाणी म्हणता येईल.

साधना उत्कृष्ट होण्यासाठी परम पावन आणि पवित्र मानसिकतेतून अभ्यास असेल तर उत्तम साधक हा साध्याची पवित्र स्वरूपात प्राप्ती करू शकतो हेच उत्तम सत्य. आत्मसमृद्धी हेच साधनेचे प्रमुख ध्येय आहे. आणि हाच मुक्ती मार्ग. प्रत्येक क्षण हा आपण मुक्तीसाठीच जगत असतो हे कदापि विसरता कामा नये.

(संपर्क- 9420015108)



Source link