
मलठण-जिंती नाका परिसरातील स्वच्छता व पाणीपुरवठ्याची प्रशासनाकडून पाहणी
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांचे दौरे; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे निर्देश
फलटण | प्रतिनिधी. फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी निखिल जाधव, आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे, पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर तसेच नगरसेवक रोहित नागटिळे यांनी मलठण आणि जिंती नाका परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे, ड्रेनेज लाईन आणि पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला. मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रशासनाला सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे आदेश दिले. तसेच नव्याने मंजूर झालेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या जागा तातडीने स्वच्छ करून दर्जेदार बांधकाम सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागाला करण्यात आल्या.
यावेळी पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांनी परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची स्थिती, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. नागरिकांना नियमित वेळेत आणि योग्य दाबाने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाणीपुरवठा विभागाने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेत कचराकुंड्या नियमित साफ करण्यावर भर दिला. नागरिक व व्यापाऱ्यांकडून ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्या जागांची सातत्याने स्वच्छता राखावी तसेच घंटागाडीचे वेळापत्रक नागरिकांच्या सोयीनुसार निश्चित करून कचरा संकलन अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, नगरसेवक रोहित नागटिळे यांनी प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी सांगितले की, गेल्या तीन दशकांपासून प्रलंबित असलेल्या अनेक मूलभूत समस्या आता प्राधान्याने सोडविण्यात येणार आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक ५ च्या विकासाला गती देण्यात येईल आणि नागरिकांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या पाहणीमुळे मलठण व जिंती नाका परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांबाबत प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले असून नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.










