Friday, September 11, 2026
Homeफलटणभारतीय बौद्ध महासभेचा कार्यभार नूतन कार्यकारिणीकडे सुपूर्द; धम्मप्रसाराचा माजी कार्यकारिणीचा संकल्प कायम

भारतीय बौद्ध महासभेचा कार्यभार नूतन कार्यकारिणीकडे सुपूर्द; धम्मप्रसाराचा माजी कार्यकारिणीचा संकल्प कायम

भारतीय बौद्ध महासभेचा कार्यभार नूतन कार्यकारिणीकडे सुपूर्द; धम्मप्रसाराचा माजी कार्यकारिणीचा संकल्प कायम

फलटण, दि. ३ जून २०२६ : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सर्व माजी पदाधिकारी यांनी आज भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आयु. भिमराव लोंढे सर यांच्याकडे संस्थेचा कार्यभार सन्मानपूर्वक सुपूर्द केला.

गेल्या तीन वर्षांमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. यामध्ये वर्षावास प्रवचनमाला, बालसंस्कार शिबिरे, श्रामणेर शिबिरे, महिला उपासिका शिबिरे तसेच प्रत्येक रविवारी “चला बुद्ध विहारी” या संकल्पनेअंतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे लहान मुलांवर बौद्ध संस्कार घडावेत, त्यांना बुद्धधम्माचे ज्ञान मिळावे तसेच समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत धम्माचे महत्त्व पोहोचावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले.

याशिवाय समता सैनिक दलाच्या ग्राम शाखांची विविध खेडेगावांमध्ये स्थापना करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाने आचार-विचाराने धम्ममार्गाचा स्वीकार करून पुढील पिढीला आदर्श जीवनमूल्ये मिळावीत, या उद्देशाने विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच समाजातील विविध शासकीय सेवांमध्ये यश संपादन करणारे युवक-युवती यांचा गौरव व सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला.

यावेळी माजी पदाधिकाऱ्यांनी भारतीय बौद्ध महासभेची कागदपत्रे, रजिस्टर, मासिक मिटिंगची वही, बँक पासबुक, चेकबुक तसेच संस्थेचे इतर कार्यालयीन साहित्य विद्यमान अध्यक्ष आयु. भिमराव लोंढे सर यांच्या ताब्यात सुपूर्द केले. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन पुढील काळात संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मात्र, संस्थेचे कार्यालयीन साहित्य व कामकाज सुपूर्द केले असले तरी धम्मकार्याची जबाबदारी संपलेली नाही, अशी भावना सर्व माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संस्थेत पद असो वा नसो, बुद्धधम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयुष्यभर कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा सर्व माजी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. पुढील काळातही समाजप्रबोधन, धम्मसंस्कार आणि संघटनात्मक कार्य अविरतपणे सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष यशवंतराव (भैय्यासाहेब) भीमराव आंबेडकर, तृतीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर, विद्यमान कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर, संस्थेचे कायदेशीर सल्लागार तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर परिवार यांच्यावरील आपली श्रद्धा व विश्वास कायम असल्याचे माजी कार्यकारिणीने स्पष्ट केले.

“बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आंबेडकरी विचारांच्या अधिष्ठानावर आम्ही समाजजागृती, धम्मप्रसार आणि संघटनबांधणीचे कार्य यापुढेही सुरू ठेवणार आहोत,” असा विश्वास भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या माजी कार्यकारिणीने व्यक्त केला.

या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर , महासचिव आयु. बाबासाहेब जगताप सर , कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर , संस्कार सचिव आयु.अमोल भोसले, माजी कार्यालयीन सचिव तथा विद्यमान केंद्रीय शिक्षक आयु. चंद्रकांत मोहिते तसेच इतर माजी पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना “जय भीम” म्हणत शुभेच्छा दिल्या आणि स्नेहपूर्ण वातावरणात निरोप घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments