
कराड : महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आपल्या दमदार खेळाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मायणी येथील युवा पैलवान राहुल कोरडे यांचे अवघ्या २० व्या वर्षी दुःखद निधन झाले. निमसोड येथील यात्रेत कुस्ती जिंकल्यानंतर पुढील सामन्यासाठी जात असताना अचानक चक्कर आल्याने त्यांची प्रकृती बिघडली.
तत्काळ त्यांना मायणी येथून कराडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक युवकांनी अवघ्या एका तासात सुमारे २ लाख ८० हजार रुपयांचा निधी उभारून उपचारासाठी मदत केली. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही राहुल यांची प्राणज्योत मालवली.
राहुल कोरडे यांची कुस्तीतील वाटचाल अत्यंत संघर्षमय होती. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही वडिलांची मजुरी आणि आईचे कष्ट यांच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी झुंज दिली. इंदिरानगर येथील समर्थ व्यायाम शाळेतून त्यांनी कुस्तीचे धडे घेतले आणि नंतर सांगलीच्या भोसले व्यायाम मंदिरात सराव सुरू ठेवला. त्यांच्या थोरल्या भावानेही त्यांना मोठे पाठबळ दिले.
आपल्या जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर राहुल यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच सलग दोन वर्षे तृतीय क्रमांक मिळवला होता. शिवाजी विद्यापीठ चॅम्पियनशिप, त्रिमूर्ती केसरी आणि माण-खटाव केसरी यांसारख्या अनेक प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये त्यांनी यश संपादन केले होते.
राहुल यांच्या अकाली निधनाने सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मायणी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक मान्यवर, खेळाडू आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका उगवत्या ताऱ्याच्या निधनाने कुस्ती क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.





