
फलटणमध्ये शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; आठवडी बाजाराचे ठिकाण बदलले
फलटण :- फलटण शहर व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिरवणुकीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक ते मालोजीराजे पुतळा या प्रमुख परिसरातून जाणार असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मार्गांवरून प्रवास करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी, त्या दिवशी होणारा आठवडी बाजार स्थलांतरित करण्यात आला आहे. हा बाजार गिरवी नाका, शासकीय विश्रामगृह ते बी.एस.एन.एल. ऑफिस रोड, कामगार वसाहत परिसर येथे भरविण्यात येणार आहे.
फलटण नगरपालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ही माहिती दिली असून, सर्व नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.








