Tuesday, August 11, 2026
Homeफलटण“महापुरुषांना जातींत नाही, विचारांत जपा” — आयु. बाबासाहेब जगताप

“महापुरुषांना जातींत नाही, विचारांत जपा” — आयु. बाबासाहेब जगताप

महापुरुषांना जातींत नाही, विचारांत जपा” — आयु. बाबासाहेब जगताप

फलटण (प्रतिनिधी) : दि. १५ एप्रिल २०२६ रोजी इंजिनिअरिंग कॉलेज फलटण येथे “महापुरुषांचे देशासाठी योगदान” या विषयावर आयु. बाबासाहेब दिलीप जगताप सर यांचे प्रभावी व मार्गदर्शक व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. मनोजकुमार दळवी साहेब होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयु. विठ्ठल निकाळजे सर (मुख्याध्यापक, ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी) उपस्थित होते. यावेळी आयु. आनंद जगताप यांनीही विशेष उपस्थिती दर्शवली.

आपल्या व्याख्यानात आयु. बाबासाहेब जगताप सर यांनी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकला. महात्मा फुले यांनी समाजसुधारणेसाठी केलेले कार्य सांगताना त्यांनी मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा, तसेच सावित्रीबाई फुले यांचे पहिले स्त्री शिक्षिका म्हणून असलेले योगदान अधोरेखित केले. याशिवाय सतीप्रथा बंद करण्यासाठी नाभिक समाजाचा संप घडवून आणलेली ऐतिहासिक घटना त्यांनी विशद केली.
तसेच डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडताना त्यांच्या बालपणापासून ते शिक्षणापर्यंतचा प्रवास, साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमधील शिक्षण, देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापनेमागील त्यांचा विचार, तसेच महाडचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह यांसारख्या सामाजिक चळवळींचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्यावरही त्यांनी विशेष भर दिला.

व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी महापुरुषांना जाती-जातीमध्ये विभागण्याऐवजी ते संपूर्ण समाजाचे व देशाचे आहेत, ही भावना आजच्या पिढीने जोपासणे आवश्यक असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन इंजिनिअरिंग कॉलेज फलटणचे समन्वयक श्री. अमोल खेसे सर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. प्रतीक्षा भोसले मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. आशा दुधाळ मॅडम यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments