Wednesday, August 26, 2026
Homeसातारासंघर्षातून घडलेला शिक्षक: आयुष्यमान विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास”

संघर्षातून घडलेला शिक्षक: आयुष्यमान विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास”

संघर्षातून घडलेला शिक्षक: आयुष्यमान विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास”

संघर्षातून घडलेला शिक्षक: आयुष्यमान विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास”

साहस Times : जिद्द, कष्ट आणि निष्ठेच्या बळावर आयुष्य घडवणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या आयुष्यमान श्री. विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या अथक परिश्रमातून केवळ स्वतःचेच नव्हे, तर असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्याचे कार्य केले.
त्यांचा जन्म ५ मे १९६८ रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोनगाव येथे झाला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, वडील शेती व्यवसायात आणि आई गृहिणी दोघेही अशिक्षित असतानाही त्यांनी शिक्षणाची कास कधीही सोडली नाही. तीन भाऊ व तीन बहिणी अशा मोठ्या कुटुंबात वाढताना अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी आपली वाट स्वतःच निर्माण केली.
शेती हा कुटुंबाचा मूळ व्यवसाय असताना वडिलांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. चार कुटुंबांचा भार सांभाळत त्यांनी कष्टाने संसार उभा केला; मात्र १९७६ साली नांगराच्या फाळामुळे झालेल्या धनुर्वाताने त्यांचे अकाली निधन झाले आणि लहान वयातच कुटुंबाचा आधार हरपला. इयत्ता चौथीत असतानाच वडिलांचे छत्र हरपले, तरी त्यांच्या आठवणी मनात आजही ताज्या आहेत. चौथी पास झाल्यावर आणलेले पेढे आणि शेतातील कष्ट हेच पुढील आयुष्याचे प्रेरणास्थान ठरले. त्यानंतरची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. दोन वेळचे अन्नही मिळणे कठीण झाले होते. कुंजीर, माठ, कुरडू अशा साध्या रानभाज्यांवर दिवस काढावे लागले. कधी रात्रीच्या अंधारात ऊस आणून बंद दाराआड उपासमार भागवावी लागली.
गरीबीचे चटके आणि अपमान पचविणारा प्रसंग :
इयत्ता पहिलीमध्ये असताना आईने शेतात ज्वारीची राखण करण्यासाठी पाठविले. सकाळची वेळ होती. मी आणि माझा एक चुलत भाऊ शेतामध्ये जात असताना शेजारच्या शेतात मकेची कणसं लागलेली होती. पोटात खूप भूक लागली होती. आम्ही दोघांनी चार कणसे मोडली. तेवढ्यात एका शेजारच्या माणसाने आम्हाला पाहिले आणि पकडून चावडीवर त्या कणसांसह वरात काढत आणले. शेताचा मालक आला, पोलिस पाटील व गावातील चार प्रतिष्ठित माणसे जमा झाली. आईला तिथे बोलावण्यात आले. त्यावेळी नको-नको ते शब्द ऐकावे लागले. शेवटी आईने माफी मागितली आणि पुन्हा अशी चूक होणार नाही, याचे लेखी स्टेटमेंट लिहून घेतले. तो प्रसंग आजही मनाला चटका लावून जातो.
आईने मोठ्या धैर्याने सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या; पण कुटुंब मोठे असल्याने त्यांना बहिणीकडे शारदानगर येथे पाठवण्यात आले. तिथे शिक्षणासोबत घरकाम, जनावरांची देखभाल अशी सर्व कामे करत त्यांनी दोन वर्षे काढली.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनगाव येथे इयत्ता चौथीपर्यंत झाले. वडिलांच्या निधनानंतर शिक्षणाची जबाबदारी अधिकच वाढली. अशा वेळी त्यांनी बहीण सौ. अनुसया वामन भोसले यांच्या सहकार्याने शारदानगर येथे इयत्ता पाचवी व सहावी पूर्ण केली. त्यानंतर पुन्हा सोनगाव (राजाळे सर्कल) येथे इयत्ता सातवीचे शिक्षण घेतले. इयत्ता आठवी ते दहावीचे शिक्षण जानाई हायस्कूल, राजाळे येथून पूर्ण केले. सन १९८४ मध्ये शाळेच्या पहिल्याच बॅचचा निकाल १००% लागण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.
इयत्ता दहावी (१९८४) बोर्ड परीक्षा होती; पण ४२ रुपयांची परीक्षा फी भरण्यासाठी पैसे नव्हते. आई आठ दिवस वणवण पैसे मागत फिरत होती, पण पैसे मिळाले नाहीत. गावातील एक दानशूर व्यक्ती श्री. रामभाऊ बेलदार यांनी ती फी भरण्यासाठी मदत केली. आईने त्यांच्या शेतामध्ये काम करून पैसे फेडले.
पुढील शिक्षणासाठी त्यांनी बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात प्रवेश घेऊन अकरावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९९१ साली बी.एड. पदवी संपादन करून त्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले.
पुढील शिक्षणासाठी संघर्ष अधिकच वाढला. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक माहिती व साधनसामग्री काहीच नव्हते. अंगावर चांगले कपडेही नव्हते. भावाचा शर्ट-पँट घालून, पायात साधी स्लीपर घालून त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच दूध वितरण, मेडिकलमध्ये काम अशा छोट्या-मोठ्या कामांतून स्वतःचा खर्च भागवत त्यांनी शिक्षण सुरू ठेवले.
बी.एड.साठीही आर्थिक अडचणी आल्या; मात्र मेहुण्यांच्या मदतीने त्यांनी ते शिक्षण पूर्ण केले. उपजीविकेसाठी शेतातील उरलेले धान्य वेचणे, साध्या अन्नावर गुजराण करणे, मित्र तानाजी जगताप यांच्या मदतीने दिवस काढणे. या सर्व संघर्षातून त्यांनी आपला मार्ग तयार केला.
कॉलेज जीवनातील एक आठवण ते आवर्जून सांगतात, ती म्हणजे माथेरान सहल. सहलीला जाण्याची प्रचंड इच्छा होती; पण खिशात इतकेच पैसे होते की ये-जा आणि अत्यल्प खर्च भागेल. तरीही त्यांनी सहलीचा आनंद घेतला. झुक-झुक गाडीतच मुक्काम करून त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले हीच त्यांच्या जिद्दीची ओळख.
इयत्ता बारावीत असतानाच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षक होण्याचा ध्यास घेतला आणि तो पूर्णही केला. घरातील अंधश्रद्धा, जावलीतील बोकड बळी यांसारख्या प्रथा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून नाकारल्या. थोरल्या भावजयींच्या आजारपणात देवाकडे केलेल्या प्रार्थनेनंतरही त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मनातील देवावरील अंधविश्वास ढासळला. पुढे मेहुणे दादासाहेब भोसले यांच्या सहवासातून त्यांनी विवेक, विज्ञाननिष्ठा आणि परिवर्तनवादी विचार स्वीकारले.
२०१० साली भारतीय बौध्द महासभेच्या बौद्ध धम्माच्या परंपरेनुसार श्रामणेर होऊन त्यांनी धम्म चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी फलटण तालुक्याचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. आजही ते तन, मन आणि धनाने या चळवळीत कार्यरत आहेत.
कार्यक्षेत्राची सुरुवात त्यांनी पुणे येथे वेल्डर म्हणून काम करून केली. १९९२ मध्ये सरस्वती माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, बीबी (ता. फलटण) येथे त्यांनी शिक्षक म्हणून सहा महिने सेवा दिली. त्यानंतर १९९४ मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय, पिंपरी-वाघेरी येथे त्यांनी सेवेत रुजू होऊन आपल्या शिक्षक जीवनाला खरी दिशा दिली.
५ जानेवारी १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी श्री बल्हेश्वर विद्यामंदिर, बेल्हे (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे कार्य केले. १९९९ ते २००३ या कालावधीत कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, मोखाडा (जि. पालघर) या दुर्गम आदिवासी भागात त्यांनी चार वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली.
यानंतर १६ जून २००३ ते ३० नोव्हेंबर २००४ या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, नागाव (ता. महाड, जि. रायगड) येथे त्यांनी कार्य केले. पुढे १ डिसेंबर २००४ ते ३० जून २०१० या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, भोळी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे त्यांनी उत्कृष्ट कार्य केले.
१ जुलै २०१० ते १० जुलै २०१४ या कालावधीत न्यू इंग्लिश स्कूल, सुरवडी (ता. फलटण) येथे त्यांनी सेवा दिली. त्यानंतर ११ जुलै २०१४ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव येथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.
त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेऊन त्यांना बढती देण्यात आली व पर्यवेक्षक म्हणून १ डिसेंबर २०२२ ते २८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय, दहिवडी येथे त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यानंतर २९ ऑगस्ट २०२३ पासून श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश हायस्कूल, चव्हाणवाडी (ता. फलटण) येथे त्यांनी कार्य सुरू ठेवले असून, ३१ मे २०२६ रोजी ते सन्मानाने सेवानिवृत्त होत आहेत.
३१ वर्षांच्या नोकरीत ते कधीच शाळेत उशिरा गेले नाहीत. रजेवर असताना १९९४ साली एकदाच उशीर झाला. तेव्हा पर्यवेक्षक श्री. वाल्लेकर सरांनी दिलेली शिकवण “वेळेवर या” त्यांनी आयुष्यभर पाळली.
सन २००२ मध्ये अचानक रक्तदाब वाढल्यामुळे त्यांच्या दृष्टीवर गंभीर परिणाम झाला आणि जवळजवळ ९०% दृष्टी कमी झाली. अनेक डॉक्टरांकडे उपचार झाले. डॉक्टरांनी दिलेल्या सकारात्मक शब्दांनी त्यांनी खंबीरपणे या संकटावर मात केली.
७ जून १९९४ रोजी साळूताई लक्ष्मण भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगी साळूताईंनी त्यांना खंबीर साथ दिली. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच त्यांनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली.
आज त्यांची दोन्ही मुले अजय आणि विजय उच्च शिक्षित असून वडिलांचा आदर्श पुढे नेत आहेत.
जीवनातील कठीण प्रसंगी चुलत बंधू चंद्रकांत निकाळजे, बहीण आणि मेहुण्यांनी मोठी साथ दिली. १९७६ मध्ये वडिलांचे आणि २०२३ मध्ये आईचे निधन झाले. हा त्यांच्या जीवनातील अत्यंत वेदनादायक टप्पा होता.
शालेय जीवनात त्यांनी खेळ क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. खो-खो, बॉल बॅडमिंटन, टेनिक्वाइट या खेळांमध्ये विद्यार्थ्यांना विभागीय व राज्यस्तरावर नेले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी यशस्वी झाले. प्राजक्ता शिरसाट (मेडिकल ऑफिसर), विनय काशीकर (मॅनेजर), प्रज्ञा शेजवळ (प्राध्यापक), अमोल मोहटकर (अधिकारी), अमेय मांडवकर (डॉक्टर), मेघा लेमन (उद्योजिका), अनिकेत (एमबीबीएस शिक्षण घेत आहे).

प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी नवे ध्येय निश्चित केले आहे. आधुनिक शेती, उद्योग उभारणी, बौद्ध स्थळांना भेट, सामाजिक व धार्मिक कार्यात सहभाग आणि मित्रपरिवारासोबत आनंदी जीवन.
संघर्ष, जिद्द आणि समाजासाठी झटणारी वृत्ती यांच्या बळावर त्यांनी केवळ स्वतःचे आयुष्य घडवले नाही, तर हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या सेवापूर्तीनंतरच्या आयुष्यास मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य लाभो, हीच मनोकामना!

शुभेच्छुक : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका माजी कार्यकारणी व संपूर्ण BBM Family

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments