Monday, August 17, 2026
Homeसाताराबरड गटासाठी ऐतिहासिक निर्णय : धोम–बलकवडी प्रकल्पाच्या पोट कालव्यांसाठी ५० कोटींचा निधी...

बरड गटासाठी ऐतिहासिक निर्णय : धोम–बलकवडी प्रकल्पाच्या पोट कालव्यांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर, बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा

फलटण :-  बरड गटासाठी ऐतिहासिक निर्णय : धोम–बलकवडी प्रकल्पाच्या पोट कालव्यांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर, बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा
बरड जिल्हा परिषद गटातील दुष्काळी व जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. बरड गटातील गावांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या धोम–बलकवडी प्रकल्पाच्या पोट कालव्यांसाठी राज्य शासनाने तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे हे पोट कालवे पारंपरिक उघड्या कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपलाईन (Closed Pipeline) पद्धतीने होणार आहेत.
ही महत्त्वपूर्ण माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, बरड गटातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
बंदिस्त पाईपलाईनमुळे उघड्या कालव्यांतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन व गळती पूर्णपणे थांबणार असून पाण्याचा अपव्यय रोखला जाणार आहे. त्यामुळे कालव्याच्या टेल भागातील म्हणजेच शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंतही पुरेशा दाबाने आणि वेळेत पाणी पोहोचणे शक्य होणार आहे.
या नव्या योजनेमुळे पाण्याचे समान व न्याय्य वाटप होणार असून शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारे वादही कमी होतील. तसेच उघड्या कालव्यांसाठी लागणारे मोठ्या प्रमाणातील जमीन अधिग्रहण टळणार असल्याने शेतकऱ्यांची मौल्यवान शेती जमीन वाचणार आहे.
यावेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले,
“आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर निधी आणून प्रत्यक्ष कामे मार्गी लावतो. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढवत असून बरड गटातील जनतेचा आम्हाला भरघोस पाठिंबा मिळत आहे.”
या निर्णयामुळे बरड गटातील शेतीला नवी दिशा मिळणार असून, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments