संभ्रमाचे मिथक: दोलायमान मध्यावर

0
11
संभ्रमाचे मिथक: दोलायमान मध्यावर


दत्ता पाटील11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘सत्तेला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही, विरोध करणारेच सत्तेत येऊ घातल्यावर हे राष्ट्र प्रगतीच्या शिखरावर आहे, असे समजावे,’ हा सरांना त्यांच्या विद्वान ग्रुपवरून आलेला मेसेज कालच त्यांनी फॉरवर्ड केला होता. त्यावरही जोडीदारांमध्ये चर्चा झाली. टीव्हीवर ऐकलेलं एकमेकांना ऐकवताना ते सगळे आनंदी दिसत होते.. कुठल्याही घामाशिवायचा, मोबदल्याशिवायचा हा आनंद, मलाही आपलं वर्तमान नि भविष्य भिरकावून देवून निवांत गाफील होऊन जाण्यासाठी उद्युक्त करत होता…

या गावाच्या पलीकडं फार मोठं वगैरे जग किंवा राष्ट्र असण्याची शक्यता नाही. राष्ट्र राष्ट्र म्हणून जे बोललं जातं ते आधी पटकन् डोळ्यापुढं देश म्हणून यायचं. नकाशा आणि गांधी-नेहरूंसह. म्हंजे मी खूप म्हातारा झाल्यामुळं जुन्या काळाला उगाळत बसतोय, असा समज झाला असंल, तर तो चुकीचाआहे. एकतीस लागलंय आता. वडील एक सहा चौसष्टचे. साठीचे झाले नुकतेच. पण, गेल्या पाच वर्षांपासून ‘साठ पासट आसंल आता वय आप्पाचं’ असं अनेक वेळा वेगवेगळ्या नातलगांच्या तोंडून ऐकत आलोय. जे जास्तीचं वाट्याला येईल, ते आधी पदरात पाडून घ्यावं, या विचारातून वडिलांनीही पाच वर्षांपूर्वीच पासष्ट वय स्वीकारून टाकलंय. ते लगेच तसे दिसायलाही लागले. त्यांचे गावातले, शिवारातले जोडीदार व्हाट्स ॲपवर येणाऱ्या राष्ट्राच्या वैश्विक प्रगतीबद्दलच्या माहितीवर रोज संध्याकाळी उत्साहानं बोलत राहतात. ‘भारत अमेरिकेच्या फक्त एक पाऊल मागे,’ हा लेख वाचून एक पाऊल म्हणजे नेमका किती कालावधी? एक दिवस की एक किलोमीटर की एक वर्ष की दहा वर्ष? यावर परवा सायंकाळी खूप तावातावानं चर्चा झाली होती. अनेक फेक बातम्यांवर वडील आणि त्यांच्या पिढीचा चटकन् विश्वास बसतो. दुसऱ्या दिवशी मी त्याबाबत पुराव्यासह गैरसमज दूर करण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी फेक बातमी ही मूळ सत्य म्हणून त्यांच्या मेंदूत घर करून बसते.

आता हळूहळू असं लक्षात येत चाललंय की, त्यांना हा खोटानाटा, भडक, अविचारी, अतिरंजित भवताल आवडू लागलाय. किंवा मूळ विदारक सत्यापासून कायम दूर राहण्यासाठीचं गुंगीचं आयतं औषध यंत्रणेनं त्यांना उपलब्ध करून दिलंय. हे आताचं राजकारण, हे आताचं धर्मकारण ही या राष्ट्राला तीव्र प्रगतिपथावर नेण्यासाठीची युक्ती आहे, असं त्यांना ठाम वाटतंय. खरं तर, पोट भरण्यासाठी करावं लागणारं शेतीकाम, धंदा हे त्यांच्या दृष्टीनं राष्ट्रावरच्या अखंड चर्चेत फार अडथळा ठरू लागलंय. पण, ‘आपण विश्वाचे म्होरके होणार म्हणल्यावर घोडामैदान जवळच आहे. त्यानंतरचं निवांत बसून खायचं आयुष्य हे अखंड चर्चेतून फक्त राष्ट्रशेवेकरता अर्पण करायचं भौ आप्पौ,’ असं कालच धान्याचा व्यापार करणारे वडिलांचे मित्र आमच्याकडं थकलेल्या उधारीतील निम्मे पैसे घेऊन जाण्याआधी बोलले होते.

आताही कडूलिंबाच्या झाडाखाली प्लास्टिकच्या खुर्चीत मी बसलेलोआहे. आतून टीव्हीचा खणखणीत आवाज येतोय. उजवीकडून शिवारातून बेडकांचा आणि डावीकडून टीव्हीत भसाभसा बोलणाऱ्या, भांडणाऱ्या माणसांचा. सारे सारखंच बोलत असल्यानं सगळी हळूहळू सारखीच ऐकायला यायला लागलीयत. स्वतः बहुसंख्येनं असतानाही थोड्याच शिल्लक राहिलेल्या विरोधकांवर सतत संतापून किंचाळताहेत. ‘हे राष्ट्र महान आहे. विश्वाचे म्होरके बनलो आहोत आपण..’ असंही रागारागाने सांगताना दिसताहेत. असेल नसेल तसं. पण, अभिमानानं सांगण्याच्या अशा गोष्टी जणू राष्ट्राच्या पारंपरिक शत्रूराष्ट्राला ऐकवाव्यात, या पद्धतीनं का तुटून पडतात हे लोक? आपल्याच माणसांना का ऐकवत असतील? आपल्याला या राष्ट्रात खूप शत्रू असल्यासारखे का वागतायत? पण, मग ते ज्या वैश्विक प्रगतीचं सांगताहेत, त्याच्या तं काय पन खाणाखुणा गावात दिसल्या नाहीत कधी. जे जे सरकारकडून गावाला कालपर्यंत रितसर मिळत होतं, तेच आजपण मिळतंय. आधी पण धा गोष्टी मिळत होत्या. आता पण त्याच धा गोष्टी जरा चांगल्या पिशवीतून मिळताहेत इतकंच. मग जुन्या पिशव्यांपेक्षा नव्या पिशव्यांचे रंग चांगले असल्याकारणानं ही वैश्विक झेप की काय ते आसंल का? असावी बा! वस्तू महागल्या बऱ्याच. पण, ‘जगाकडून मागणी वाढल्यानं वस्तूंच्या किमती महागणारच. काय करायचं ते करा. काही तक्रार नाय गड्यांनो..’

तरी पण सगळं ताब्यात असतानाही सतत आपल्या ताब्यातून सगळं काही निसटून चालल्यागत कावसून का गेलेली दिसतात ही मान्सं? मिळवल्याचाआनंदही घेता येत नाही ह्या टीव्हीतल्या नेते लोकांना? हजारदा सांगितलं वडिलांना, की ते न्यूज च्यानल लावून बसत नका जाऊ. जरा बरा पाऊस पडलाय. थोडं रान निळं दिसाया लागलंय. पिकांचं नियोजन चाललंय. संध्याकाळ होऊनही उजेड दिसतोय जरा. वर आभाळात पावसाळी ढग आहेत. पण, मावळतीला जरा तंबू उचकवून खाली जाताना सूर्य डोकावून गावाकडं बघतोय. त्यामुळं हिरवं रान मजेशीर दिसतंय. पण, हा राष्ट्रीय कालवा कशाकडंच लक्ष नीट देवू देत नाही… पूर्वी पाखरांचा आवाज वावरातला संध्याकाळचा एक भाग वाटायचा. मुद्दाम निराळा ऐकायची गरजच नसायची. पण, टीव्हीतल्या बाहेर ऐकू येणाऱ्या गदारोळात कान देवूनही तो नीट ऐकू येईना झालाय. बरं टीव्ही संपला की मोबाइल धरून बसतात सगळे त्यांचे दोस्त. एकामागून एक लड लावतात रिळांची. हसत एकमेकांनाआग्रह करत आपापल्या मोबाइलातला रीळ दाखवत राहतात.. पोटापुरतं पिकूनही रान सुनं, निर्जीव वाटाय लागलंय हल्ली… अशी गुंतून गेलीत मान्सं कशात तरी.. ध्येय न गाठतात अचानक निवृत्त झाल्यागत निवांत होऊन गेलीय मधली पिढी.. आज्जा ८८ वयापर्यंत काम करत होता.. मी त्याच्याकडून शिकलो काम. आधी आज्जा नि मग तो गेल्यावर मी असल्यानं वडिलांना जुन्या नि नव्या गोष्टी शिकण्याची फार गरज पडली नाही. आज्ज्याच्या तोंडून गांधीबाबाचं, नेहरूंचं नाव ऐकलं होतं. ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला उभे राहिले होते वडील. आज्ज्यानं विरोध करताना, “जणू गांधी, नेहरूच लागून गेला समाजशेवा करायला!” असं वाक्य ऐकवलं होतं त्यांना.

वडिलांनी नि त्यांच्या दोस्तांनी ‘राष्ट्रसेवा हेच कृषिधन’ नावाचा ग्रुप जॉइन केलाय. निवृत्तीनंतर हरिपाठ अन् सत्संगाला नेमाने जाणाऱ्या गावातील सरांनी सुरू केलाय हा ग्रुप. सरांची त्यांच्या मूळ गावी असलेली शेती भाऊबंदकीच्या तंट्यात विकावी लागली. त्यामुळं शेतीत वाहून घेतलेली पिढी ही राष्ट्रीय कार्यातील सर्वात मोठी हानी असल्याचे त्यांचे स्पष्ट मत होते. नोकरीतील बराच काळ त्यांच्या घरी विद्यार्थी आपल्या शेतातून भाजीपाला, धान्य आणून देत. त्यामुळे शेतमालाला रास्त भाव वगैरेंच्या ते विरोधात आहेत. जे माणसाला जगवते, त्याचा भाव करू नये वा त्यासाठी भांडू नये, असे त्यांचे स्पष्ट मत होते. वडील आणि त्यांच्या पिढीतले त्यांचे जोडीदार सरांकडून येणाऱ्या राष्ट्रभक्तिपर तत्त्वज्ञानाने भारावून गेले आहेत. ‘सत्तेला विरोध करण्यात काहीच अर्थ नाही, विरोध करणारेच सत्तेत येऊ घातल्यावर हे राष्ट्र प्रगतीच्या शिखरावर आहे, असे समजावे,’ हा सरांना त्यांच्या विद्वान ग्रुपवरून आलेला मेसेज कालच त्यांनी फॉरवर्ड केला होता. त्यावरही जोडीदारांमध्ये चर्चा झाली. टीव्हीवर ऐकलेलं एकमेकांना ऐकवताना ते सगळे आनंदी दिसत होते.. कुठल्याही घामाशिवायचा, कष्टाशिवायचा, मोबदल्याशिवायचा हा आनंद, मलाही आपलं वर्तमान नि भविष्य भिरकावून देवून निवांत गाफील होऊन जाण्यासाठी उद्युक्त करत होता…

तेवढ्यात लाइट गेले.. अंधार पडलाच होता.. काही क्षण शांतता.. रातकिडे आणि घर शोधणाऱ्या चुकार पक्ष्यांचे आवाज येऊ लागले.. मम्मीनं तुळशीजवळ दिवा लावला.. वर ढगांच्या फटींमधून चांदण्या दिसू लागल्या.. मोबाइलची बॅटरी लावत वडील बाहेर आले.. खाटेवर बसले.. ही क्षण चुळबुळत राहिले. त्यांना त्यांच्या या अशा एकटेपणावर मात करता येत नाही आताशा, हे माझ्या लक्षात आलं. मग त्यांनी फोन लावला. जरा वेळानं एकेक करत जोडीदार येऊन बसले. मग त्यांचे नि अनेक राजकीय स्टोऱ्यांचे आवाज वावरात दुमदुमू लागले.. पाऊस आल्यावर खिडकीतून आत शिंतोडे येतात, असं मम्मी म्हणली होती.. तिथं प्लास्टिकचा कागद लावून मी कांद्याच्या चाळीकडं झोपायलानिघून आलो.. तोवर पाणी नसलेले काही पातळ ढग अर्ध्यामुर्ध्या चंद्राशी खेळत बसले होते…

संपर्क : ९४२२७६२७७७ dattapatilnsk@gmail.com



Source link