Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्ररसिक स्पेशल: ‘आंतरिक निकडी’ने झालेले लेखन शाश्वत

रसिक स्पेशल: ‘आंतरिक निकडी’ने झालेले लेखन शाश्वत

रसिक स्पेशल: ‘आंतरिक निकडी’ने झालेले लेखन शाश्वत

[ad_1]

डॉ. वृषाली किन्हाळकर13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मराठी साहित्य संमेलने अत्यंत उत्साहात होतात, तिथे चांगली गर्दीही जमते. तरीही जरा खोलवर डोकावले, तर जो उत्साह असतो तो नेमका कशाचा, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. संमेलनातील ग्रंथ खरेदीची आकडेवारी मोठी असते, पण खरोखर लोक वाचतात का? आज भरपूर लिहिले जातेय. वैविध्यपूर्ण आणि उत्तम. मात्र, व्यावसायिक यशाच्या हमीची आणि महितीपर पुस्तके वाचकांना भुरळ पाडत आहेत. विचारांना चालना देणारे , माणूसपण अधोरेखित करणारे, अंतर्मुख करणारे लेखन फारसे वाचले जात नाही. दीर्घ लेखनही वाचले जात नाही. थोडेसे चटकदार, खमंग, सनसनाटी वा काहीसे भडक वाचण्याकडे जास्त कल दिसतो.

आजकालच्या लेखनात धिटाई येतेय; पण त्यालाही बांध आवश्यक आहे. त्यात थोडी घाई जाणवते. श्री. ना. पेंडसे यांनी ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी जवळपास एकोणीस वेळा पुन्हा लिहिली. स्वतःचे संपूर्ण समाधान होईपर्यंत! हे आज किती लोक जाणतात? जुन्या काळात झटपट छपाईची सोय नव्हती, त्यामुळे लेखकांना प्रतीक्षा करावी लागे. वृत्तपत्राच्या जिल्हा आवृत्ती नसत. त्यामुळे लेखन प्रकाशित होण्यासाठी संधीही अपुऱ्या होत्या. सध्याच्या काळात भरपूर संधी आणि व्यक्त होण्यासाठी पुरेसा अवकाश आहे. मात्र, थोडे सावध असण्याची गरज आहे. प्रतीक्षा, पुनर्लेखन, आपल्या मर्यादांची उचित जाणीव, संपादकांशी सखोल चर्चा या पूर्वीच्या गोष्टी आजही आवश्यक वाटतात. समाजमाध्यमांमुळे आता जणू प्रत्येकाच्याच हाती एकेक नियतकालिक आले आहे. पण, इथे कुठली संपादकीय शिस्त नाही, धाक नाही. त्यामुळे जो तो आपलीच जाहिरात करतोय! आपण स्वत:चे लेखन कितीदा तपासून पाहतो? इतरांचे किती वाचतो? एकमेकांत किती निखळ साहित्यिक चर्चा होतात? मूळ पुस्तक – मासिक हातात घेऊन वाचण्याचे प्रमाण किती आहे? आणि नव्या पिढीत मराठीची ओढ असावी, यासाठी आपण काय प्रयत्न करतो? आदी प्रश्न महत्त्वाचे आहेत.

संमेलनात फारसे न दिसणारे अनेक जण दर्जेदार लिहितात. वर्दळीला दूर ठेवून अक्षरपूजा करतात. याचा अर्थ संमेलने अनावश्यक आहेत, असा नाही. एकत्र येण्यातून सकस चर्चा घडावी आणि मार्गदर्शन व्हावे. संमेलन म्हणजे केवळ मिरवणे नसावे. हल्ली संमेलनातील श्रोत्यात फोटो काढणारे आणि मोबाइल पाहत बसणारे बरेच असतात. मोठ्या, लोकप्रिय लेखक, कवींसोबत सेल्फी काढणाऱ्यांपैकी अनेकांनी त्यांचे लेखन फारसे वाचलेले नसते. व्यासपीठावरून बोलणारेच अनेकदा सदोष उच्चार करतात. अनावश्यक विशेषणे वापरून भाषा बोथट करतात. साहित्य संमेलनात मराठी भाषेचेच सौंदर्य अनाघ्रात ठेवले जात नाही. संमेलनापूर्वी आणि संमेलनात साहित्यबाह्य विषयच चर्चेत असतात, ही शोकांतिका आहे. शेवटी.. कोणतेही लेखन पुरस्कार किंवा प्रसिद्धीसाठी नसावे. ‘माझी आंतरिक निकड’ म्हणूनच लिहिलं तर ते उत्तम लेखन होईल. ते काळाच्या कसोटीवरही टिकेल.

संपर्क-
ज्येष्ठ कवयित्री, स्त्रीवादी लेखिका
‘वेदन’, ‘तारी’ कवितासंग्रह
‘सहजरंग’, ‘संवेद्य’ हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध
sahajrang@gmail.com

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments