माझ्या हिश्श्याचे किस्से: आदमी मुसाफ़िर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता है…

0
33
माझ्या हिश्श्याचे किस्से: आदमी मुसाफ़िर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता है…


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Article Mazhya Hisshyache Kisse Column Written By Rumi Jafri  | Man Is A Traveller, He Comes And Goes, He Leaves Memories On The Way…

रूमी जाफरी8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘द रेल्वे मेन’ या वेबसिरीजने ३९ वर्षांपूर्वी घडलेल्या भोपाळ वायू दुर्घटनेच्या भयानक आठवणी पुन्हा ताज्या केल्या.     

यशराज फिल्म्सची ‘द रेल्वे मेन’ ही वेबसिरीज पाहिल्यापासून मला भोपाळच्या आणि वायू दुर्घटनेच्या अनेक गोष्टी आठवताहेत. योगायोगाने आज ३ डिसेंबर आहे आणि भोपाळ वायू दुर्घटनेला ३९ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये आज या दुर्घटनेशी संबंधित काही चित्रपटांची चर्चा करूया. यशराज फिल्म्सने बनवलेल्या ‘द रेल्वे मॅन : अनटोल्ड स्टोरी ऑफ भोपाल १९८४’ या वेब सिरीजला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याआधी काही खास लोकांना बोलावून यशराजच्या मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आली. माझे घनिष्ट मित्र राहुल रवैल यांचे पुत्र शिव यांनी ही सिरीज दिग्दर्शित केली असल्याने ती मला आवर्जून पाहायची होती.

त्या रात्री या सिरीजचे दोन एपिसोड पाहिल्यानंतर मला त्या भयानक रात्रीचे दृश्य आठवले अन् डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण मोठ्या पडद्यावर जी दृश्ये दाखवली जात होती, ती मी स्वत: अनुभवली होती. खरे तर भोपाळ वायू दुर्घटनेच्या त्या भयावह रात्रीचा मी प्रत्यक्ष साक्षीदार होतो. लहानपणापासून मोठ्यांकडून हे ऐकत आलो होतो की, जगाच्या विनाशाची वेळ येईल, तेव्हा असा हाहाकार उडेल की कुणी कुणाला ओळखणारही नाही. त्या रात्रीही अशीच स्थिती होती. कुणीच कुणाला ओळखत नव्हते, प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. नेमकं काय झालंय, हे कुणालाच कळत नव्हतं. प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे हवेत बाण मारत होता.

कुणी म्हणत होता, भोपाळमध्ये आग लागलीय.. कुणी सांगत होता, गॅस लीक झालाय.. तर कुणी, पाकिस्तानने बॉम्ब टाकलाय, असं म्हणत होता. ज्याला जशी संधी मिळेल, तसा तो लांब पळ काढत होता. आमच्या कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात आगआग होऊ लागली, खोकला वाढू लागला, तशी माझ्या भावाने बाहेर पडण्यासाठी जीप काढली. तर रस्त्यावर सैरभैर होऊन धावणारे लोक आमच्याआधी जीपमध्ये येऊन बसले. त्या रात्रीचा तो भोपाळ ते मंडीदीपर्यंतचा प्रवास मी कधीही विसरू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी भोपाळमध्ये जिकडे तिकडे मृतदेह दिसू लागले. त्याचवेळी, पुन्हा गॅस लीक झाल्याची अफवा कुणीतरी पसरवली. या अफवेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा बळी गेला. त्यानंतर संपूर्ण भोपाळ शहर रिकामे करण्यात आले. असो. तर आपण भोपाळ वायू दुर्घटना आणि त्यावरील चित्रपटांविषयी बोलूया. १९८६ मध्ये राकेश रोशन यांनी बनवलेल्या आणि जी. ओमप्रकाश यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘भगवान दादा’मधील श्रीदेवीचे पात्र, आपण भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडित असल्याचे सांगून नायकाची सहानुभूती मिळवते. त्यावेळी पहिल्यांदा श्रीदेवीच्या तोंडून आपल्या शहराचे नाव ऐकून चांगलं वाटलं होतं. मी भाग्यवान आहे की, पुढे श्रीदेवी आणि राकेश रोशन यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध निर्माण झाले. परंतु दरम्यानच्या काळात डॉ. राही मासूम रझा यांना मी भेटलो.

त्यावेळी त्यांना म्हणालो की, तुम्ही ‘भगवान दादा’मध्ये श्रीदेवीला गॅस दुर्घटना पीडित दाखवले, पण सिनेमात भोपाळ वायूकांडाविषयी आणखी काही दाखवायला हवे होते. तेव्हा ते म्हणाले की, सिनेमात सगळ्या गोष्टी कथेच्या गरजेनुसार दाखवल्या जातात. त्या कहाणीची गरज नसल्याने या गोष्टी दाखवल्या नाहीत. मग मी त्यांना म्हणालो की, तुम्ही इतके मोठे लेखक आहात. या वायू दुर्घटनेवर तुम्ही एखादे पुस्तक लिहिले, तर भोपाळवासीयांची वेदना, दु:ख जगासमोर येईल. त्यावर ते उत्तरले, अरे, भोपाळशी माझे खूप जवळचा संबंध आहे. माझ्या पत्नीमुळे आणि भोपाळचे अनेक शायर माझे घनिष्ट मित्रही आहेत. त्यामुळे मी नक्की लिहीन. डॉ. रझांशी पुन्हा भेट झाली नाही, त्यामुळे या विषयावर त्यांच्याशी बोलणे राहून गेले. त्यांना आणखी आयुष्य लाभले असते, तर कदाचित त्यांनी भोपाळ दुर्घटनेवर लिहिले असते.

त्यानंतर या दुर्घटनेवर काही माहितीपट बनले, पण सिनेमे तुलनेने कमीच तयार झाले. जगातील अन्य देशात अशी दुर्घटना घडली असती, तर त्यावर कितीतरी सिनेमे बनले असते. आपल्याकडील प्रेक्षकांना दु:खदायक गोष्टी आठवणे आवडत नाही, हेही कदाचित यामागचे कारण असेल. त्यांना सिनेमांतील प्रेमाच्या कहाण्या आणि गीत – संगीत आवडते. केवळ भोपाळ दुर्घटनाच नव्हे, तर युद्ध आणि फाळणीवरही आपल्याकडे फारसे चित्रपट तयार झाले नाहीत. आणि जे तयार होतात त्यात प्रेमाची कहाणी असतेच. ही गोष्ट चित्रपटांच्याच नव्हे, तर साहित्याच्या बाबतीतही लागू होते. भोपाळ दुर्घटनेवर लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. फ्रेंच लेखक डोमेनिक लापिएर आणि स्पॅनिश लेखक जेव्हिएर मोरो यांचे ‘फाइव्ह पास्ट मिडनाइट इन भोपाल’ तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी मोती सिंह यांनी लिहिलेल्या ‘भोपाल गॅस त्रासदी का सच’ या पुस्तकाशिवाय या विषयावर तशी खूप कमी पुस्तके आली.

‘द रेल्वे मेन’ या सिरीजच्या आधी भोपाळ वायूकांडावर आणखी दोन चित्रपट आले होते. १९९९ मध्ये महेश मथाई यांनी ‘भोपाळ एक्स्प्रेस’ हा चित्रपट बनवला होता. त्यात के. के. मेनन, नसीरुद्दीन शाह आणि झीनत अमान यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील भोपाळच्या कहाणीचे हैदराबादेत चित्रीकरण केले गेले. झीनत अमान यांना गणिकेच्या भूमिकेत सादर करण्यात आले, पण प्रत्यक्षात भोपाळमधील गणिका आणि त्यांच्या नृत्य – गायनाची संस्कृती बऱ्याच वर्षांपूर्वी संपुष्टात आली होती. अशाप्रकारचा दुसरा चित्रपट ‘भोपाल : अ प्रेअर फॉर रेन’ २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. रविकुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा भोपाळमध्येच चित्रीत झाला.

पण यातील कहाणी सादर करण्याचा प्रकारही वेगळाच होता. त्यानंतर आलेली ‘रेल्वे मेन’ ही सिरीज लोकप्रिय ठरते आहे, कारण ती वास्तवाच्या बरीच जवळ जाणारी आहे. घडलेल्या घटनेवर आधारित सिनेमा बनवताना सिनेमॅटिक लिबर्टी वापरली नाही, तर चित्रपट आणि माहितीपट यांच्यात फरक उरत नाही. नेमकी हीच गोष्ट लक्षात ठेऊन शिव रवैल यांनी ही जबरदस्त सिरीज बनवली आहे. त्या दुर्घटनेच्या वेळी आपण तिथंच उपस्थित होतो किंवा शिव रवैलनी त्या रात्री स्वत: भोपाळमध्ये राहून हे सगळं पाहिलं असावं, असं आपल्याला वाटत राहतं. भोपाळ दुर्घटनेवर बोलताना भोपाळीपणावर बोललो नाही, तर ते चुकीचे ठरेल. कारण आपल्या दु:खातही स्वत:वर हसण्याचा बहाणा शोधणे, हा भोपाळवासीयांचा स्वभाव आहे. साऱ्या जगाचे लक्ष भोपाळकडे लागले होते, तेव्हा बासित भोपाली यांचा हा शेर प्रत्येक भोपाळवासीयांच्या भावनांना अर्थ देत होता… तूफान डूबोए तो उछलना सीखो लग जाए जो ठोकर तो सम्हालना सीखो। या वक़्त की रफ्तार बदल कर रख दो या वक़्त की रफ्तार पे चलना सीखो।। ‘द रेल्वे मेन’प्रमाणेच ‘भोपाल : अ प्रेअर फॉर रेन’ या सिनेमात एक पात्र समान आहे. दोन्हीकडे त्याचे नाव वेगवेगळे आहे. ‘द रेल्वे मेन’मध्ये पत्रकाराची भूमिका सनी हिंदुजाने केली आहे आणि हीच भूमिका चित्रपटात काल पेन यांनी साकारली आहे. दोन्ही ठिकाणी पत्रकाराचे नाव वेगळे असले, तरी या व्यक्तिरेखेचे खरे नाव राजकुमार केसवानी असल्याचे बऱ्याच जणांना माहीत आहे. राजकुमार केसवानी हे सिनेपत्रकार त होतेच, पण भोपाळ वायू दुर्घटनेविषयी लोकांना सावध करणारे पहिले पत्रकार होते. २५ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीमध्ये भोपाळमध्ये एक कार्यक्रम झाला, त्याला मी सुद्धा उपस्थित होतो. भोपाळ वायू दुर्घटनेवरील ही चर्चा आपण जे. ओमप्रकाश यांच्या ‘भगवान दादा’पासून सुरू केली. शेवटी त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘अपनापन’ या सिनेमातील हे गाणे अवश्य ऐका… आदमी मुसाफिर है आता है जाता है.. आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है… आपली काळजी घ्या, आनंदी राहा.

(बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक)



Source link