पुस्तकामागच्या गोष्टी: टिपलेल्या विसंगती अन् न माजवलेले अवडंबर

0
18
पुस्तकामागच्या गोष्टी: टिपलेल्या विसंगती अन् न माजवलेले अवडंबर


आदूबाळ6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रत्येक भाषेचं आपापलं वैशिष्ट्य असतं. त्या भाषेतले काही काही शब्द ‘अ-भाषांतरणीय’ असतात. कितीही प्रयत्न केला तरी मूळ शब्दाचा स्वाद भाषांतरित शब्दाला येत नाही. इंग्रजीमधला ‘Irreverant’ हा असाच एक शब्द आहे. कोशात त्याचा अर्थ ‘अनादर करणारा’ असा आहे, पण ज्या संदर्भात तो वापरला जातो त्या दृष्टीने विचार करता ‘देव्हारे न माजवणारा’ असा भावार्थ अधिक समर्पक आहे. साहित्यात अशा प्रकारच्या लेखनाला विशेष स्थान आहे, कारण अशी पुस्तकं प्रस्थापित समजुतींना, धारणांना, समाजमान्यतांना धक्का देत काही मूलभूत प्रश्न विचारतात. जोसेफ हेलर यांचं सुप्रसिद्ध ‘कॅच-२२’ हे पुस्तक अशा देव्हारे न माजवणाऱ्या साहित्याचं उत्तम उदाहरण समजलं जातं.

हेलरचा साहित्यिक वंशज शोभावा असा लेखक नव्या सहस्रकाच्या सुरूवातीला उदयाला आला. मोहम्मद हनीफ त्यांचं नाव. हनीफ यांचा जन्म पाकिस्तानातला. त्यांनी पाकिस्तानी हवाई दलात प्रवेश मिळवला आणि वैमानिकाचं प्रशिक्षण घेतलं. पण लवकरच त्यांच्या ध्यानात आलं की, आपला ओढा पुस्तकांकडे आहे. इंग्लंडमध्ये येऊन त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि बीबीसीमध्ये रुजू झाले.

२००८ मध्ये मोहम्मद हनीफ यांची ‘अ केस ऑफ एक्सप्लोडिंग मँगोज’ ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीची तुलना अनेकांनी जोसेफ हेलर यांच्या ‘कॅच-२२’शी केली. यात मोहम्मद हनीफ यांनी आपल्या वैमानिकी प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. झिया-उल-हक यांच्या ‘अपघाती’ निधनाभोवती रचलेलं हे एक मनोरंजक कथानक आहे. कादंबरीचा नायक अली शिग्री हा वैमानिक होण्याचं प्रशिक्षण घेत असतो. त्याचा मित्र ओबेद पळून जातो आणि अली संशयाच्या जाळ्यात अडकतो. झिया-उल-हक त्यांच्या सैनिकी अकादमीत प्रमुख पाहुणे म्हणून येणार असतात. त्यांच्या सुरक्षारक्षकांना अली शिग्री अनेक कारणांनी संशयास्पद वाटत राहतो. पण, झिया-उल-हक यांना ठार करायला अनेक लोक उत्सुक असतात – रशियन केजीबी ते तेव्हा उदयोन्मुख असलेलं तालिबान ते (चक्क) एक कावळा! कसलेल्या लेखकाप्रमाणे मोहम्मद हनीफ संशयाची सुई फिरवत ठेवतात. झिया-उल-हक यांचा मृत्यू हा खरंच अपघात होता का? त्यात अलीचा किंवा ओबेदचा हात होता का? या सगळ्या घटनाक्रमात कावळ्याचा काय सहभाग होता? हे सगळे प्रश्न कादंबरीत तुफान मनोरंजक पद्धतीने सुटतात. ही कादंबरी हे एक तपशिलात काढलेलं व्यंगचित्र आहे. २००८ च्या बुकर ‘लाँग लिस्ट’मध्ये या कादंबरीचा समावेश झाला होता. (या लाँग लिस्टमधले आणखी दोन लेखक या लेखमालेत भेटणार आहेत!)

त्यानंतर दहा वर्षांनी प्रकाशित झालेली ‘रेड बर्ड्स’ ही कादंबरी खरं तर ‘..एक्सप्लोडिंग मँगोज’पेक्षा श्रेष्ठ आहे. गेल्या तीस वर्षांतल्या अमेरिकेच्या परराष्ट्र (आणि / किंवा युद्ध) धोरणाची मनमुराद खिल्ली मोहम्मद हनीफ या कादंबरीतून उडवतात. मध्य-पूर्वेमधील एका (मुद्दाम अनाम ठेवलेल्या) देशातल्या एका निर्वासित छावणीवर बॉम्ब टाकायची जबाबदारी एका अमेरिकी वैमानिकाला दिली जाते. पण, त्याचं विमान अपघातग्रस्त होतं आणि त्याच छावणीतला ‘मोमो’ नावाचा टीन एजर मुलगा त्याला वाचवतो. मोमो परिस्थितीमुळे चलाख बनला आहे. त्याला या छावणीतून सुटून जायचं आहे, शक्यतो अमेरिकेला. त्याने प्रयत्नपूर्वक अमेरिकी उच्चारही घोटवले आहेत. पण, घरी दुःखात असलेली आई आहे. तिचा थोरला मुलगा (मोमोचा भाऊ) काही महिन्यांपूर्वी एकाएकी गायब झाला आहे आणि त्यामागे अमेरिकी सैनिक असावेत, असा मोमोला संशय आहे. या कादंबरीतली दोन महत्त्वाची पात्रं सांगितल्याशिवाय राहवत नाही. पहिला आहे मोमोचा कुत्रा ‘मट’. कादंबरीतला काही भाग आपल्याला मटच्या ‘सर्वज्ञानी तत्त्वज्ञ’ दृष्टिकोनातून वाचायला मिळतो. दुसरी आहे, सतत छापील असंबद्ध बकबक करणारी एक अमेरिकी मनोवैज्ञानिक सल्लागार. चलाख मोमो तिचा कावा बरोबर ओळखतो. तो वैमानिक आपल्या देशी परततो का? मोमो आणि मट युद्धातून सुखरूप सुटतात का? अशा प्रश्नांच्या उत्तरासह या विविधरंगी पात्रांच्या अनुभवांतून मध्य-पूर्वेतील वास्तवाचे चटके वाचकाला समजू शकतात. एकूणातच, मोहम्मद हनीफ यांचं लेखन विनोदी, प्रहसनात्मक, प्रसंगी अतर्क्य असं आहे. पण, फक्त तितकंच नाही. विसंगती दाखवत मूलभूत प्रश्न विचारण्याचा त्यांनी शोधलेला तो एक अफलातून मार्ग आहे.

aadubaal@gmail.com



Source link