Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रगोष्ट सांगतो ऐका...: हे काय झालं..?

गोष्ट सांगतो ऐका…: हे काय झालं..?

[ad_1]

अरविंद जगताप10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

विशालला दीप्तीचा फोन बघून वेड लागणं बाकी होतं. रस्त्यात दिसलेली पाचशेची नोट उचलावी तसा त्याने फोन उचलला. दीप्तीने त्याला अर्जंट भेटायला बोलावलं होतं.

प्रशांतला दीप्ती आवडते. दीप्तीला प्रशांत आवडतो. पण, ही गोष्ट विशालला आवडत नाही. आता विशालचा काय संबंध? तर विशाललाही दीप्ती आवडते. तिघे एकाच कॉलनीत राहतात. प्रशांतचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे. विशालची बिअर शॉपी आहे छोटी. दीप्ती आईला पार्लरमध्ये मदत करते. दीप्तीच्या वडिलांची जिम आहे. एरियातले पाच-पंचवीस पैलवान कायम संपर्कात असल्याने दीप्तीच्या वडिलांची सगळ्यांना आदरयुक्त भीती आहे. पण, प्रेमात पडलेली माणसं लग्न होईपर्यंत घाबरत नाहीत.

लग्न झाल्यावर खूपदा बायकोलाच घाबरू लागतात. तर, प्रशांतला दीप्ती आवडते. दीप्तीला प्रशांत आवडतो. दोघांनी ही गोष्ट फक्त एकमेकांना सांगितलीय. बाकी कुणाला कळू देण्याचा प्रश्नच नाही. एका कॉलनीत राहत असल्यामुळे ते धाडसही नाही. पण, मेसेजवर बोलणं चालू आहे. मेसेज करायचा. वाचायचा आणी त्याच वेगात डिलीट करायचा. खरं तर दीप्तीचा मेसेज कधीच डिलीट करावा वाटायचा नाही प्रशांतला. पण, दीप्तीने त्याला तशी शपथ घातली होती.

बरं, मित्रही कायम मोबाइल बघायचे. म्हणून नाइलाजाने का होईना, तो मेसेज डिलीट करायचा. दोघांनी कुणाला सांगितलं नसलं तरी जवळच्या मित्रांना संशय येत होता. प्रेमात पडलेली माणसं व्हायरल आजार झाल्यासारखी असतात. लक्षणं ठरवूनही लपवता येत नाहीत. विशाललाही संशय होता. पण, दीप्ती एक न एक दिवस आपल्याला होकार देईल याची त्याला खात्री होती. दीप्तीच्या वडिलांकडे महापालिकेची मंडळी कायम यायची. अशा वेळी ते विशालला बिअर पाठवायला सांगायचे आणि विशाल माणूस न पाठवता स्वतः जायचा. विशालची खंत एवढीच होती की, एवढी बिअर शॉपी आहे, पण त्यातली एक गोष्ट आपण दीप्तीला गिफ्ट देऊ शकत नाही.

आपला सासरा पितो एवढीच काय ती त्याच्यासाठी समाधानाची बाब. विशाल काही न काही निमित्ताने दीप्तीच्या वडिलांसमोर विषय काढायचा की प्रशांत कसा चुकीचा आहे, तो कसा वाईट आहे.. दीप्तीचे वडील ते ऐकून खुश व्हायचे. त्यांचा प्रशांतवर वेगळाच राग होता. त्यांनी जिमच्या नवीन जागेतल्या उद्घाटनासाठी प्रशांतला पन्नास फेटे सांगितले होते. फेटे आले, पण कार्यक्रम सुरू झाला आणि लक्षात आलं की ते बांधायला कुणीच नाही. फेटे तसेच पडून राहिले.

दीप्तीचे वडील प्रशांतवर चिडले, ते आजही त्यांचा राग कायम आहे. बाकी विशाल दीप्तीसाठी खूप काही करायचा प्रयत्न करतो. म्हणजे पार्लरचं सामान पुण्यातून आणून देण्यापासून काहीही. दीप्तीला तो जवळचा मित्र वाटतो. कधीही मदतीला धाऊन येणारा. पण, एक दिवस झालं भलतंच. रात्रीचे आठ – साडेआठ वाजले असतील. दीप्ती आणि प्रशांत फोनवर बोलत होते. म्हणजे नेहमीप्रमाणे मेसेज करत होते. प्रेमाच्या आणाभाका रंगल्या होत्या. आता तुझ्यावाचून करमत नाही वगैरे नेहमीची कॅसेट चालू होती. किती दिवस एकमेकांपासून दूर राहायचं, हा घासून गुळगुळीत संवाद चालू होता. पण, विषय जास्तच तापला.

प्रशांत म्हणाला.. ‘आजच पळून जाऊया. पुण्यात मित्र आहे माझा. तो तयारीत आहे. लग्न पण लावून देईल. राहायची आणि नोकरीची सोय आहे. तुला पण पार्लर सुरू करता येईल.’ या गोष्टी बोलायला सोप्या होत्या, पण दीप्तीपुढे वडिलांचा चेहरा आला. तिने विषय बदलला. पण, आता प्रशांत मागे हटायला तयार नव्हता. माझ्यावर तुझं खरं प्रेम नाही वगैरे टिपिकल डायलॉगबाजी चालू झाली. बोलता बोलता प्रकरण वादावर आलं. दीप्ती म्हणाली, ‘नाही माझं प्रेम. काय करतो?’ आणि मग एक भयंकर शांतता. वेगात पाठवले जाणारे मेसेज बंद. पण, दीप्ती अजूनही चिडलेलीच होती. सारखी मोबाइलकडं बघत होती. तिला वाटलं प्रशांतचा मेसेज येईल. पण, प्रशांतही नेमका हाच विचार करत बसला होता. मोबाइलकडं बघत. दीप्तीचा मेसेज येईल याची वाट बघत. अशा वेळी इगोची परीक्षा असते. पण, काहीतरी वेगळंच घडणार होतं.

दीप्तीने रागात विशालला फोन लावला. विशालला दीप्तीचा फोन बघून वेड लागायचं बाकी होतं. अचानक रस्त्यात दिसलेली पाचशेची नोट उचलावी तसा त्याने फोन उचलला. दीप्तीने त्याला अर्जंट भेटायला बोलावलं होतं. कॉलनीपासून दूर असलेल्या कॅफेत. विशाल आणि दीप्ती बोलत होते. विशालचा कानावर विश्वास बसत नव्हता. कॉफी तशीच होती. थंड झाली होती, एवढंच. दीप्ती विशालला म्हणाली पळून जायचंय. आजच्या आज. ती तशी चिठ्ठी लिहून आली होती घरात.

विशालला गाडीची सोय का करायला सांगितली, हे लक्षात आलं. विशाल गोंधळून गेला. दीप्ती म्हणाली, ‘घाबरलास?’ विशाल बळेच आव आणत ‘नाही’ म्हणाला. पण, काय अडचणी येऊ शकतात ते सांगू लागला. दीप्ती म्हणाली, ते प्रशांत बघून घेईल. विशाल भानावर आला. दीप्ती प्रशांतसोबत पळून जाणार होती. आणि विशालला त्या दोघांना पळून जायला मदत करायची होती. अचानक तिचा अपमान करणंही शक्य नव्हतं. खरं तर मनातून खूप राग आला होता, पण व्यक्त करता येत नव्हता. अर्थात काहीही झालं तरी तो दोघांना पळून जायला मदत करणार नव्हता.

विशाल दीप्तीला समजवू लागला. पण, ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. आणि ऐकून करणार काय? घरात चिठ्ठी लिहून आली होती. ‘मी घर सोडून जातेय. काळजी करू नका. तुमच्या परवानगीशिवाय लग्न करतेय. लवकरच फोन करून सगळे डिटेल्स कळवते.’ घरच्यांनी चिठ्ठी वाचली होती. शोधाशोध सुरू झाली होती. दीप्तीने फोन बंद करून ठेवला होता. घरच्यांना चिंता होती की फोन करावा कुणाला? आणि सांगावं काय?

विशाल अजूनही तिला समजावत होता. तुझे वडील प्रशांतला मारून टाकतील वगैरे वगैरे. कदाचित म्हणूनच तो आला नाही. आणि खरंच प्रशांतही फोन उचलत नव्हता. अर्थात त्याचं आणि दीप्तीचं थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं होतं. रुसवा मिटला होता. पळून जायचं ठरलं होतं, हायवेला हॉटेलपाशी भेटायचं ठरलं होतं. फक्त प्रशांत बसने जाऊया म्हणत होता. दीप्तीने विशालची मदत घ्यायचं ठरवलं. विशालची कार होतीच. आणि तो तिला जवळचा मित्र वाटत होता. विशाल आणि दीप्ती कारमध्ये बसले.

विशाल दीप्तीच्या घरी कळवायची संधी शोधत होता. आपण तिच्या घरी सांगितलंय, हे दीप्तीला कळू नये यासाठी काय करावं हा विचार करत होता. आणि दीप्तीचा पळून जायचा प्रयत्न फसला की, आपलं दीप्तीशी लग्न सोपं, हे गुलाबी स्वप्नही त्याच वेळी बघत होता. प्रेमात पडलेली माणसं कुठल्या प्रसंगात काय विचार करतील याचा नेम नसतो. विशाल हे स्वप्न रंगवत असतानाच एका गाडीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं. समोरासमोर येऊन थांबली. विशालने भानावर येऊन ब्रेक दाबला. त्यातून चार-पाच माणसं बाहेर पडली आणि विशालला मारायला सुरुवात केली. एवढं मारलं की विशाल जागीच बेशुद्ध पडला. दोन लोक त्याला त्याच्याच गाडीत दवाखान्यात घेऊन गेले. बाकी लोक दीप्तीला घेऊन घरी गेले. दीप्ती घरच्यांना काही सांगू बघत होती. पण, वडील तिला काहीच बोलले नाहीत. सगळ्यांनी तिच्याशी अबोला धरला.

सकाळी प्रशांत घरी आला. वडील त्याला म्हणाले, ‘काल तू घरी आला होतास, दीप्तीशी लग्न करायची परवानगी मागायला. मी तुला शिव्या दिल्या. हाकलून दिलं. माझी पोरगी मोठ्या ऑफिसरला द्यायची म्हणालो. आणि ही भवानी कालच त्या विशालबरोबर पळून चालली होती. मी जे काय आहे ते खरं सांगणारा माणूस आहे. माझ्यासाठी तर ही कालच मेली. पण, हे सगळं ऐकूनही तुला लग्न करायचं असंल तर उद्याच्या उद्या लावून देतो लग्न. बोल?’ प्रशांत ‘हो’ म्हणाला. लग्न करून दीप्ती आणि प्रशांत विशालला भेटायला गेले. तीन दिवसांनी तो नुकताच शुद्धीवर आला होता. पण, त्यानं दोघांना जोडीनं आलेलं पाहिलं आणि त्याला पुन्हा आयसीयूमध्ये हलवावं लागलं. प्रशांत दिवसभर फक्त एवढंच बोलत राहिला, ‘हे काय झालं..?’

(संपर्कः jarvindas30@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments