Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रगोष्ट सांगतो ऐका...: प्रिन्स

गोष्ट सांगतो ऐका…: प्रिन्स

गोष्ट सांगतो ऐका…:  प्रिन्स

[ad_1]

अरविंद जगताप2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

हळूहळू उन्हं उतरू लागली. पूर्णवेळ उन्हात बसलेल्या प्रिन्सच्या आईची शुद्ध हरवली. तिला सावलीत नेऊन उपचार सुरू झाले. आता प्रिन्स एकटाच होता खड्ड्यात…

खरं तर त्याचं नाव प्रिन्स नाही. पण, त्या दिवशी अचानक सगळे लोक त्याला प्रिन्स म्हणायला लागले. कारण सरळ होतं. खूप वर्षांपूर्वी प्रिन्स नावाचा एक लहान मुलगा बोअरवेलच्या खड्ड्यात पडला होता. दिवसरात्र टीव्हीवर एकच बातमी होती. प्रिन्स खड्ड्यात पडला.. देशभर टीव्हीवर ती बातमी बघणाऱ्या लोकांनी देवाकडं प्रार्थना केली होती, नवस बोलले होते. प्रिन्स खड्ड्यातून सुखरूप बाहेर निघावा म्हणून. खूप लोक प्रयत्न करत होते. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. प्रिन्स खड्ड्यातून बाहेर पडला. अशी घटना पुन्हा घडू नये, खड्डे उघडे राहू नयेत, याची काळजी घेतली जाईल, ही खात्री होती. पण, तसं झालं नाही. पुन्हा असे खड्डे होतच राहिले. मुलं पडतच राहिली. नंतर फक्त एकच झालं की, मुलं खड्ड्यात पडली, रात्र-रात्र अडकून राहिली, तरी कुणाला बातमीचं कुतूहल राहिलं नाही. भीती राहिली नाही. प्रिन्स दिवस-रात्र टीव्हीवर दिसला. नंतर अनेक प्रिन्स खड्ड्यात पडले, पण त्यांची पेपरातसुद्धा बातमी आली नाही. तर असाच एक बबलू अशाच एका गावात खड्ड्यात पडला. त्याच्या घरच्यांचा आरडाओरडा ऐकून चार-दोन लोक गोळा झाले. कुणीतरी व्हिडिओ क्लिप केली. गावात बातमी झाली. मुलाचं नाव माहीत नव्हतं. म्हणून लोक म्हणू लागले, ‘आणखी एक प्रिन्स खड्ड्यात पडला..’

हा प्रिन्स खड्ड्यात पडला, तेव्हा उन्हाचा तडाखा होता. बाहेर लोक चर्चा करत होते. सरपंचाला सांगा, आमदाराला बोलवा, कलेक्टरला निरोप द्या.. वगैरे सूचना करून झाल्या होत्या. एक जण म्हणाला, ‘पालकमंत्री चांगला माणूसय, त्यांना सांगा..’ खूप वेगवेगळ्या माणसांची नावं समोर येत होती. त्या निमित्तानं कामाची माणसं कोण असू शकतात, याची एक यादी झाली. पण, त्यातलं कुणीच त्यावेळी उपलब्ध नव्हतं. सरपंच अयोध्येला गेले होते. आमदार मुंबईत होते. कलेक्टर मीटिंगमध्ये होते. पालकमंत्री विरोधी पक्षातला कुणीतरी राजीनामा देऊन त्यांच्या पक्षात आला होता, म्हणून त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात होते. प्रिन्स एकटा खड्ड्यात होता. प्रिन्सचे वडील उन्हातान्हात कोण मदतीला येतंय का, म्हणून फिरत होते. प्रिन्सची आई एकटी उन्हात त्या खड्ड्यात डोकवून प्रिन्सला आवाज देत होती. सुदैवानं खड्डा अजून फार खोल नव्हता. प्रिन्सला आवाज जात होता. अधूनमधून त्याचा आवाज येत होता. पण, खड्डा एवढा छोटा होता की प्रिन्स काही बोलायला गेला की त्यांच्या तोंडात माती जात असावी. त्यामुळं तो बोलायची हिंमत करत नव्हता. प्रिन्सची आई रखरखत्या उन्हात त्या खड्ड्यात पडलेल्या आपल्या लेकराला दिलासा देत होती. जमिनीवर हात ठेवून खड्ड्यात डोकवताना तिला गरम तव्यावर हात ठेवल्यासारखं वाटत होतं. हे चटके तिला जाणवत असले, तरी त्याकडं लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यापेक्षा जास्त चटका लागला होता जीवाला. एकुलता एक लेक खड्ड्यात पडला होता. तिला माहीत होतं, आपला लेक अंधाराला खूप भितो. रात्री लघवी करायला घराबाहेर जावं लागायचं. तेव्हा प्रिन्स आईला उठवून सोबत यायला सांगायचा. आज तोच प्रिन्स डोळ्याभोवती मिट्ट काळोख असलेल्या खड्ड्यात एकटाच होता. आई बिचारी त्या खड्ड्यावर पदर धरून होती लेकराला ऊन लागू नये म्हणून. खरं तर लोकांना वाटत होतं, उन्हातान्हात तिनं डोक्यावर पदर ठेवावा. पण, तिचा जीव आपल्या लेकरासाठी तीळतीळ तुटत होता.

गावातले लोक येऊन जात होते. तिथं उभ्या एका शहाण्या माणसानं सांगितलं की, त्या खड्ड्यापासून दूर राहा. माती ढासळली तर पोराला त्रास व्हायचा. उन्हातान्हात उभं राहायची इच्छा नसलेल्या लोकांना तो एक दिलासाच वाटला. ते खड्डयापासून दूर लांब सावलीला उभे राहिले. मग कंटाळून खाली बसले. अर्थात ते तरी काय करणार होते? कुणी विहिरीत पडलेला असला, तर त्याला सहज काढता आलं असतं. पण, हे बोअरवेलचे खड्डे. यात काय करायचं? गावात तंत्रज्ञान असं लंगडत येतं. माणसाला उभंही राहू देत नाही अन् बसूही देत नाही. नळ येतात, पण पाणी नसतं. विजेचे खांब येतात, पण वीज नसते. प्रिन्सला बाहेर काढायला पोलिसांपासून सगळ्यांना संपर्क केला. बिचारे पोलिस तरी काय करणार? त्यात प्रिन्सचं गाव डोंगरात. प्रवास काही साधा सोपा नाही. प्रिन्सच्या वडिलांनी भावनेच्या भरात डॉक्टरांना पण ही गोष्ट सांगितली. डॉक्टर येतो म्हणाले, पण त्यांनी काय करायचं? प्रिन्स बाहेर आला, तर त्यांना काही करता आलं असतं. बाकी ते आयुर्वेदिक डॉक्टर. त्यांच्याकडं काही ऑक्सिजन वगैरेची सोय नव्हती. पण, अशावेळी ते धावून आले. उभे राहिले. प्रिन्सची आई लेकराला तहान लागली असेल म्हणून रडत होती. बरी गोष्ट एकच होती की खड्डा मोठा होता. खड्डा घेणारा जरा चुकला होता. त्यातच पैशावरून वाद झाला अन् काम बंद पडलं. दुसरीकडं खड्डा घ्यायचं ठरवून जमीन मालकानं हा खड्डा तसाच ठेवला.

हळूहळू उन्हं उतरू लागली. पण, पूर्णवेळ उन्हात बसलेल्या प्रिन्सच्या आईची शुद्ध हरवली. तिला सावलीत नेऊन उपचार सुरू झाले. आता प्रिन्स एकटाच होता खड्ड्यात. वडील तालुक्याला जाऊन या ऑफिसातून त्या ऑफिसात फिरत होते. गावातले राजकीय पक्षाचे पंटर पत्रकारांना बातमी देत होते. पण, पत्रकारांनाही आता या बातमीत फारसा रस नव्हता. एक पत्रकार म्हणाला, देश खड्ड्यात चाललाय आणि तुम्ही पोराची खड्ड्यात पडल्याची बातमी काय सांगता? दुसरा म्हणाला, नको ही बातमी. सरकारच्या विरोधात जाईल.. तर एकूण प्रिन्सच्या बातमीत मिडियाला रस नव्हता. मीडिया येत नव्हता म्हणून राजकारण्यांचे पंटरही फिरकत नव्हते. पक्षप्रवेश रंगात आल्याने पालकमंत्री अॅव्हेलेबल नव्हते. कलेक्टर व्हिडिओ कॉन्फरन्स नावाच्या गोंडस मिटिंगमध्ये दिवसभर अडकलेले होते. सरपंच म्हणाले, मी अयोध्येत मंदिरात नवस बोलणार आहे. आमदार स्वतःच आपण पक्षात राहायचं का पक्ष सोडायचा, या भानगडीत असल्याने त्यांनी फोनही उचलला नाही. अंधार पडू लागला. लोक होतेच. नवीन लोक गोळा झाले. तुमच्या पक्षाचे लोक कसे निष्क्रिय आहेत, असं एकमेकांना सांगत होते. विरोधी पक्षवाले आणि सत्ताधारीवाले हमरीतुमरीवर आले होते. मैदानातल्या त्या खड्डयावर मावळत्या सूर्याची किरणं पडली होती. अचानक गर्दीतून एकच गलका ऐकू आला. सगळे डोळे मोठे करून पाहू लागले. प्रिन्स स्वतःच खड्ड्यातून बाहेर आला होता. त्या आवाजाने आई भानावर आली होती. धावत प्रिन्सकडं गेली. प्रिन्सला मिठी मारली.. ‘चमत्कार झाला माय..!’ प्रिन्स तोंडातली माती थुंकून म्हणाला, ‘नाय आई.. खड्ड्यात गेल्यावर लक्षात आलं, कुणी कामाला येणार नाही. आता आपलं आपल्यालाच वर यावं लागणार. जमाना लई वाईट आलाय.’

लहान लेकराच्या तोंडून एवढी समजुतीची भाषा ऐकून सगळे हैराण झाले. तेवढ्यात गर्दीतला एक जण म्हणाला, ‘प्रिन्स अजून लहानंय. अठरा वर्षाचा होऊ द्या, बरोबर कुणाचा तरी समर्थक होतो का नाही बघा.’

(संपर्कः jarvindas30@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments