Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रगोष्ट सांगतो ऐका...: घटना

गोष्ट सांगतो ऐका…: घटना

गोष्ट सांगतो ऐका…:  घटना

[ad_1]

अरविंद जगताप1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

जयंतराव वाचत गेले, तसं त्यांचं वडिलांविषयीचं मत बदलत गेलं. राज्यघटना एवढी सोपी नाही. आणि आपले वडीलही.. याची त्यांना जाणीव झाली.

नारळवाडीला कुलकर्ण्यांचा पहिला मान.. लहानपणीपासून हे वाक्य ऐकून तेजस वैतागलाय. तेजसचे वडील जयंतराव चाळीस वर्षांपूर्वी नारळवाडी सोडून शहरात आले. कारण नारळवाडीत मान सोडला, तर काहीच मिळत नव्हतं. त्यांचा कुलकर्ण्यांचा वाडा मोडकळीस आला होता. जयंतरावच्या वडिलांचं स्वप्न होतं स्वतःची बोट बनवायचं. मोठी बोट बनवायच्या नादात खूप तोटा झाला. बोट काही पाण्यापर्यंत पोचली नाही. किनाऱ्यावरच राहिली. होते नव्हते पैसे गेले.

जयंतरावच्या वडिलांचे निधन झाले. हळूहळू लोकांनी बोटीचं एक एक सामान चोरून नेलं. आता सांगाडा उरलाय. गंजलेला. पडका वाडा आणि एक पुस्तक सोडून जयंतराव शहरात आले. खासगी कंपनीत काम करत संसार चालवत राहिले. मुलाला म्हणजे तेजसला मोठ्या अपेक्षेने इंजिनिअर बनवलं. पण, त्यालाही कारकुनाएवढाच पगार आहे. इंजिनिअर खूप झालेत. आपल्याला गरिबीचा शाप आहे, हा जयंतरावांचा समज हळूहळू पक्का झाला.

आजकाल त्यांची तब्येतही बरी नसते. मेंदूत गाठ झालीय. उपचार घेण्याची ताकद नाही. मेंदूत गाठ झाल्याचं निदान झाल्यापासून खूप विचार डोक्यात येतात. फक्त पैसा कमवायचा एकही विचार डोकावत नाही. आपले कमी दिवस उरलेत, हे जयंतरावांनी स्वीकारलंय. आता चिंता कमी झालीय. आठवणी खूप झाल्यात. वडिलांची तर सारखी आठवण येते.

त्यांनी बनवलेली बोट. रोज किनाऱ्याला जाऊन त्यात होणारे बदल जयंतरावांनी पाहिले होते. कधीतरी ती चालू होईल, हे स्वप्न पाहिलं होतं. बोट बनवायच्या नादात पाच – सात वर्षे आणि घरातल्या महागमोलाच्या वस्तू गेल्या. ती बोट समुद्रात गेली नाही, पण कुलकर्ण्यांना बुडवून गेली. पैसा गेला. पैसा गेला तशी प्रतिष्ठा गेली. गावात राहण्यासारखंही काही राहिलं नाही. वडिलांची पाच – पन्नास पुस्तकं होती. ती हळूहळू लोकांना वाटण्यात गेली. एक राज्यघटनेची प्रत होती. ती जयंतरावांच्या वडिलांना जिल्हाधिकाऱ्यांनी सही करून भेट दिली होती. ती घरात तशीच राहिली.

राज्यघटना तसेही किती लोक वाचतात? त्यांना आपले अधिकार कुठं समजून घ्यायचे असतात? आपल्याला हक्काने मिळालेलं घर, जमीन आणि शेत नावावर असलेले कागद वाचायचे असतात. जपायचे असतात. जयंतरावांना तेही जपता आलं नाही. गावाकडचा पडका वाडा यावर्षी विकून टाकला. जयंतराव वाड्यातला तांब्याचा बंब घेऊन येणार होते. पण, घर घेणाऱ्याने तो मला राहूद्या, म्हणून विनंती केली. तसाही शहरात जयंतरावांना काय उपयोग होता बंबाचा? ते रिकाम्या हाती निघाले, तेव्हा घर विकत घेणाऱ्या माणसाने त्यांच्या हातात राज्यघटना ठेवली. हे पुस्तक तुमच्या वडिलांना भेट आलंय, असं म्हणाला.

जयंतराव निर्विकारपणे ते पुस्तक घेऊन निघाले. वाडा विकला त्या पैशात आजारपणाचा खर्च करावा की मुलाला घर घेण्यासाठी पैसे वापरावेत, हा प्रश्न होता. पण, मुलानं नवीन घर घेईपर्यंत त्यांनी आजार लपवून ठेवला. उगाच मुलाला वाईट वाटायला नको.

घर घेतल्यावर काही दिवसांतच जयंतरावची तब्येत ढासळली. नव्या घरात खिडकीपाशी ठेवलेल्या पलंगावर ते पडून आहेत. आपला आत्मा खिडकीतून जाईल की दारातून, असे काहीबाही विचार त्यांच्या मनात येत राहतात. क्षणभर. पुन्हा वडील आठवत राहतात. बोट डोळ्यासमोर दिसत राहते. घटना वाचायला सांगणारे वडील पैसे वाचवत राहिले असते तर? पण, त्यांना काहीतरी भव्य दिव्य करायचं होतं. दूर समुद्रात जाऊन मासेमारी करायची होती. तसं काहीच घडलं नाही. वडील गेले आणि तरुणपणापासून जयंतरावांचा संघर्ष सुरू झाला. वडिलांची आठवण निघाली की जयंतराव म्हणायचे, ‘नशीब, बापाने कर्ज काढून ठेवलं नाही. उपकार झाले.’

वडील समाजकारण, राजकारण या गोष्टीत रस असणारे होते. आपल्या मुलाला घटना माहीत असली पाहिजे, असा त्यांचा अट्टाहास होता. वडील गेले. वाड्याच्या लाकडांना वाळवी लागू लागली. घरातल्या पुस्तकांवर धूळ जमू लागली. त्यानंतर जयंतराव गावी गेले, ते वाडा विकायलाच. आता वाडा नाही, पण घटनेचं पुस्तक जयंतरावांजवळ आहे. ते उगाच चाळत बसतात. जिल्हाधिकाऱ्याने केलेली सही. वाचनालय सुरू केल्याबद्दल दोन ओळीत केलेलं वडिलांचं कौतुक. गेल्या चार-पाच दिवसांत जयंतरावांनी पन्नास वेळा तरी ते वाचून काढलं.

आतही काहीतरी नोंदी करून ठेवल्या होत्या. जयंतराव वाचत गेले, तसं वडिलांविषयीचं मत बदलत गेलं. राज्यघटना एवढी सोपी नाही. आणि आपले वडीलही.. याची त्यांना जाणीव झाली. वडील आणि राज्यघटना समजायला एक बैठक लागते. वैचारिक आणि भावनिक. आपला खरा वारसा आपल्याला ओळखू येत नाही. वारसा कळायला फक्त त्या घरात जन्म घेऊन चालत नाही. त्या घराच्या दारं, खिडक्या यांच्यासोबत छोट्या छोट्या वस्तूंचं मोल पण समजायला लागतं. गावच्या घरातल्या खिडकीत येणाऱ्या पक्ष्यांची ओढ, घराच्या इतिहासात घट्ट रुतून बसलेली झाडाची मुळं, उंबरठ्यावर अडकून पडलेली कितीतरी स्वप्नं, देवळीवर जमलेली दिव्याची काजळी, सगळ्या घराची भडास निघालेला धुण्याचा दगड, अंगणातल्या लिंबाखाली असलेला अनोळखी देव. घरी येणारा जाणारा माणूस विचारायचा, ‘हा कुठला देव?’ कुणाला सांगता यायचं नाही. पण, घरातला प्रत्येक जण हात जोडायचा. मोठे हात जोडतात म्हणून लहानगे पण हात जोडायचे. जयंतरावांच्या आजीने श्रद्धेने तो पूजला, त्याला कुलदैवतासारखा मानही मिळाला. गावातले लोकही हटकून पाया पडायला यायचे.

जयंतरावांना सगळ्या गोष्टी आठवत गेल्या. त्यांच्या वडिलांनी या एक एक वस्तूंचा उल्लेख एका कवितेत केला होता. वडील आपल्याला लहानपणी ती कविता पाठ करायला लावायचे. पण, तेव्हाही ती कविता वाईट वाटायची. आता तो कागद सापडला. त्यावर वडिलांनी ‘अनोळखी देवाची आरती’ असं लिहिलं होतं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी आपल्या मुलाला- तेजसला जवळ बोलावलं. वाडा विकून चूक केली, म्हणू लागले. आपण व्यवहार रद्द करू, म्हणून हट्ट धरून बसले. तेजसला हा वेडेपणा वाटत होता. एकतर त्यानं नवीन घर घेतलं होतं. आणि ज्याने वाडा विकत घेतला, त्याने तो पाडून नवीन बांधकाम सुरू केलं होतं. जयंतरावांनी विचारलं, ‘आपला लिंबाखालचा देव?’ तेजस म्हणाला, ‘तो गावातल्या मंदिरात ठेवलाय म्हणे. लिंबाखाली हौद बनवलाय आता..’ खूप मोठा धक्का बसला जयंतरावांना. तेजसने विचारलं, ‘काय झालं?’ जयंतराव म्हणाले, ‘घटना वाचली पाहिजे होती..’ तेजसला काही कळलं नाही.

जयंतरावांनाही आजच कळलं होतं. त्या पुस्तकात त्यांच्या वडिलांनी लिंबाखालच्या अनोळखी देवाची आरती असलेलं पान ठेवलं होतं. आरती कसली? त्या अनोळखी देवाखाली सहा फुटावर आजीने तिचे पन्नास तोळे दागिने ठेवले होते. तो देव नव्हता, खुणेचा दगड होता. कुलकर्ण्यांच्या खानदानात कुणाला कधी अडचण आलीच तर विकायला दागिने असावेत म्हणून. त्याची ती वृत्तातली कविता. आरती नव्हे कोडं, जे जयंतरावांना आज सुटलं. जयंतरावांच्या वडिलांनी विचार केला होता की, वाचनाची, ज्ञानाची आवड असणाऱ्याला ते दागिने मिळावेत. म्हणून हे कोडं त्या पुस्तकात ठेवलं. योग्य वारस निवडायची चांगली व्यवस्था केली होती त्यांनी.

जयंतराव पुढे काहीच बोलले नाहीत. तेजसच्या लक्षात आलं, वडील गेले. पण, घटना वाचली पाहिजे होती, असं ते का म्हणाले, हे त्याला लक्षात आलं नाही. येईल. अर्थात घटना चाळली तर. घटना कामी येतेच.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments