अरविंद जगताप5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हळूहळू कल्पेश एवढा विश्वासातला झाला की, आमदार त्याच्या नावाने गुंतवणूक करू लागले. जमिनी घेऊ लागले. मग कल्पेशला त्यांनी कागदोपत्री बिल्डर बनवलं. पण, कल्पेश त्यात एवढा रमला की धंद्यात कुठच्या कुठं निघून गेला. साहेबांना चिंता नव्हती. पण, अडचण अशी होती की, कल्पेशची महत्त्वाकांक्षा कितीतरी पटीने वाढत होती. साहेबांना न सांगता तो परस्पर जमिनी घेत होता. लोकांना ब्लॅकमेल करत होता. आमदार त्यात लक्ष घालत नव्हते. त्यांचं लक्ष विनिताकडेच. पण, एक दिवस आमदाराच्या पायाखालची जमीन सरकली…
कल्पेश शहरातला नामांकित बिल्डर. एकेकाळी वन रूम किचनमध्ये राहणारा कल्पेश आज दहा दहा मजली बिल्डिंग बांधतो. त्याचा स्वतःचा बंगला बारा खोल्यांचा आहे. कधी काळी त्याची खोली होती तिच्यापेक्षा मोठ्या गाड्या आहेत आज त्याच्याकडं. कल्पेशची गोष्ट लोक कौतुकाने एकमेकांना ऐकवतात. शून्यातून मोठ्या झालेल्या लोकांचं लोकांना कौतुक असतंच. पण, कल्पेशचं कौतुक फक्त त्याच्या तोंडावर करतात लोक. बाकी अख्ख्या शहराला माहीत आहे, कल्पेश मोठा झाला यात त्याचं काही कर्तृत्व नाही. मुळात कल्पेश एक साधा ड्रायव्हर, पण गेल्या पाच वर्षांत तो बघता बघता शंभर कोटीचा मालक झालाय. हे सगळं त्याच्या बायकोचं – विनिताचं कर्तृत्व. कल्पेशच्या शब्दात सांगायचं, तर विनिताचा पायगुण.
कल्पेश आमदारसाहेबांकडं बदली ड्रायव्हर म्हणून जायचा. महिन्यात दोन – चारदा. आमदार साहेबांचा नेहमीचा ड्रायव्हर त्यांच्या बायकोच्या गावाकडचा. म्हणून तिच्याशी एकनिष्ठ. सगळी खबरबात घरात सांगायचा. आमदाराला या गोष्टीचा अंदाज आला होता. त्यामुळं काही खासगी गोष्टी असल्या की ते बदली ड्रायव्हर सोबत न्यायचे. त्यात कल्पेश त्यांना भारी वाटला. कल्पेश अजिबात बोलायचा नाही. आमदार साहेबांनी कितीही फालतू जोक केला, तरी जोरात हसायचा. कल्पेशवर आमदाराचा विश्वास बसला. खासगी कामाला ते कल्पेशला आवर्जून घेऊन जायला लागले. कल्पेशने कधी इकडची गोष्ट तिकडं सांगितली नाही. हळूहळू आमदार त्याच्याकडं पैशाचा कारभार सोपवू लागले. याला पाच लाख देऊन ये, त्याच्याकडून पंचवीस लाख घेऊन ये.. पण, दोन महिन्यांत कल्पेशने कधी एक पैशाचा घोळ केला नाही की कधी कुठं त्याबद्दल शब्द काढला नाही. आमदार त्याला शाबासकी म्हणून पैसे देऊ लागले. पण, त्यानं काही माणूस श्रीमंत होत नाही.
कल्पेशचं नशीब एका छोट्या गोष्टीनं बदललं. एकदा सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याने आमदाराला एका गुन्ह्यात अडकवलं. खरं तर आमदाराने काही केलं नव्हतं. पण, मंत्र्याचा जावई गेले दोन टर्म या आमदाराच्या विरोधात हरत होता. म्हणून आमदाराला कसाही करून बदनाम करायचा डाव होता. साक्षी – पुरावे गोळा केलेले होते. पण, आमदाराला सुगावा लागला आणि तो गायब झाला. मंत्र्याने पोलिसांवर दबाव आणला, पण आमदार सापडले नाहीत. कारण कल्पेशबद्दल कुणाला संशय आला नाही. आमदार कल्पेशच्या घरी लपून बसले होते. एका खोलीचं चाळीतलं घर. कल्पेशला वाटलं साहेबांना खूप अडचण होईल. पण, साहेब मजेत होते, रमले होते. साहेब कल्पेशच्या बायकोकडं बघता क्षणीच रमले होते. त्यांना विनिता मनापासून आवडली होती. त्यांना विनिता आवडलीय हे कल्पेशलाही लक्षात आलं होतं, पण तो काही बोलू शकत नव्हता. आमदारांना विनिता आवडली होती, तरी ते सध्या काही बोलू शकत नव्हते. अटक होण्याची चिंता डोक्यात होती. विनिताला आमदारांच्या मनात काय चालू आहे, हे कळत होतं. बाईच्या जातीला लगेच कळतं. पण, ती बिचारी काय बोलणार?
आमदाराने खूप लोकांकडून वशिला लावला. मंत्र्याने कोटीत रक्कम घेतली आणि आमदाराशी तडजोड केली. दोन दिवसांनी आमदार घरी गेले. पण, कल्पेशला विसरले नाहीत. खरं सांगायचं तर विनिताला विसरले नाहीत. कल्पेश नसताना त्यांच्या विनिताशी भेटी चालू झाल्या. आमदारांना नेहमी नेहमी यायचं, तर घर प्रशस्त पाहिजे. आमदारांनी चांगला फ्लॅट घेऊन दिला कल्पेशला. आमदार घरी येणार असले की, कल्पेश काहीतरी काम काढून बाहेर जायचा. आधी शेजारीपाजारी, मग कॉलनी, मग सगळ्या शहराला गोष्ट कळली. लोकांना वाटत होतं की, कल्पेशने विनिताला भरीस पाडलं. पण, कल्पेश आणि विनिता या विषयावर कधीही बोलले नाहीत. सगळं मूक संमतीने घडत गेलं. दोघांपैकी कुणीही विषय काढला नाही, म्हणून वाद होण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. हळूहळू कल्पेश एवढा विश्वासातला झाला की, आमदार त्याच्या नावाने गुंतवणूक करू लागले. जमिनी घेऊ लागले. मग कल्पेशला त्यांनी कागदोपत्री बिल्डर बनवलं. पण, कल्पेश त्यात एवढा रमला की धंद्यात कुठच्या कुठं निघून गेला. साहेबांची गुंतवणूक कित्येक पटीने वाढत होती. त्यांना चिंता नव्हती. पण, अडचण अशी होती की, कल्पेशची महत्त्वाकांक्षाही कितीतरी पटीने वाढत होती. साहेबांना न सांगता तो परस्पर जमिनी घेत होता. लोकांना ब्लॅकमेल करत होता. साहेबांना माहीत नसलेली गुंतवणूक पण वाढली होती. आमदार त्यात लक्ष घालत नव्हते. त्यांचं लक्ष विनिताकडेच. पण, एक दिवस आमदाराच्या पायाखालची जमीन सरकली.
सत्ताधारी पक्षाकडून कल्पेश विधानसभेला उभा राहणार, अशी बातमी आली. आमदार भानावर आले. आपण फार मोठी चूक करून बसलो, हे त्यांच्या लक्षात आलं. कल्पेश आपल्या उपकाराची अशी परतफेड करेल, असं त्यांना वाटलं नव्हतं. कल्पेशला जाब विचारायची गरज पडली नाही. बातमी एकदम खात्रीशीर होती. आमदाराच्या पीएने कल्पेशला विचारलं. कल्पेश म्हणाला, ‘मग काय करू? घरात काही काम उरलं नाही. मतदारसंघात तरी काम करतो..’
आमदार रागात दिवसभर शिव्या देत होते कल्पेशच्या नावानं. पण, तेवढ्यानं काम भागणार नव्हतं. सगळ्या ओळखी वापरत आमदाराने योजना बनवली. कल्पेशच्या घरी आयकर खात्याची धाड पडली. कल्पेशने एवढी अमाप माया गोळा केली होती की, त्याला कसलाच हिशेब नव्हता. आजवर त्याने स्वतःही कधी हिशेब केला नव्हता. सगळं आमदाराचा सीए बघायचा. पण, आता सगळ्या गोष्टीचं उत्तर कल्पेशला द्यायचं होतं. आयकर खात्याचे लोक बारीक बारीक प्रश्न विचारत होते.
पाकीटमाराला बोलावं तसं बोलत होते. कल्पेशला पैसे कुठून आले, कुठं गेले काही नीट सांगता येत नव्हतं. विनिता आतल्या खोलीत ढसाढसा रडत होती. कल्पेशला लक्षात आलं होतं खेळ संपलाय. तो शांत बसला. पराभव मान्य केल्यासारखा. अटक टाळता येणार नव्हती. पण, आमदाराची इच्छा होती नवरा – बायको दोघांना अटक झाली पाहिजे. आयकर खात्याच्या लोकांनी आता विनिताची चौकशी सुरू केली. पण, एवढा वेळ रडणारी विनिता अचानक शांत झाली. खंबीर झाली. आयकरवाले म्हणाले, ‘पैसे कुठून आले?’ विनिता म्हणाली, ‘गेले पाच वर्ष आमदारसाहेबांबरोबर संबंध आहेत. सगळ्यांना माहितीय.
आमदार साहेब भेटी देतात. तोच पैसा आहे सगळा. नवरा तोच पैसा गुंतवत गेला. आणि हे साम्राज्य उभं केलं. आमदारांचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. विसरायचे पण नाही. म्हणून साहेब किती वेळा आले, किती पैसे दिले सगळा हिशेब डायरीत लिहिलाय. आणि व्हिडिओ पण बनवलेत. कोर्टात देते. सगळे अवाक् झाले. कल्पेशसुद्धा. आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी, कल्पेशकडं काहीही सापडलं नाही, अशी नोंद केली. पुन्हा कुणी चौकशीला फिरकलं नाही. आमदारसाहेब पण नंतर कधीच त्या एरियात दिसले नाहीत.
(संपर्क – jarvindas30@gmail.com)







