Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रनेटस्ट्रीम: पर्मनंट रूममेट्स : तरुण जोडप्याचे बहुपेडी चित्रण

नेटस्ट्रीम: पर्मनंट रूममेट्स : तरुण जोडप्याचे बहुपेडी चित्रण

नेटस्ट्रीम: पर्मनंट रूममेट्स : तरुण जोडप्याचे बहुपेडी चित्रण

[ad_1]

समीर गायकवाड3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘पर्मनंट रूममेट्स’मधील एक दृश्य.

‘पर्मनंट रूममेट्स’चा तिसरा सीझन अॅमेझॉन प्राइमवर आला आहे. या सीझनची कथा मिकेश (सुमीत व्यास) आणि तानिया (निधी सिंग) यांच्याभोवती फिरते. दोघांनीही चांगल्या भविष्यासाठी कॅनडामध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतलेला असतो. तानिया परदेशात स्थायिक होण्यास तयार असते, तर मिकेश त्यास फारसा उत्सुक नसतो. त्यामुळे त्यांच्या नात्यात वादाची परिस्थिती निर्माण होते. हे दोघे तडजोडीच्या टप्प्यावर पोहोचतात की त्यांचे बिनसत चाललेले नाते अधिक गहिऱ्या बाजूकडे झुकते, हे सिरीजमध्येच पाहणे इष्ट!‘पर्मनंट रूममेट्स’ची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे.

त्यामुळेच प्रेक्षकांचे प्रेम पाहून या मालिकेची कथा काळाबरोबर पुढे सरकत राहिली आहे. याचा पहिला सीझन २०१४ मध्ये रिलीज झाला होता. त्यात मिकेश आणि तानिया या तरुण जोडप्याची प्रेमकथा होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली. अनेकार्थाने ती कित्येक तरुण जोडप्यांच्या खऱ्या आयुष्याच्या अगदी जवळ जाणारी अशी होती. २०१६ मध्ये दुसरा सीझन आला तेव्हा त्यात कौटुंबिक नाट्य, रोमान्स आणि कॉमेडीचा बेस्ट तडका दिलेला होता. दुसऱ्या सीझनपासून ही मालिका पारंपरिक बॉलीवूड एंटरटेनरच्या साच्यामध्ये परिवर्तित झाली.

सात वर्षांनंतर आता आलेला या सिरीजचा तिसरा सीझन या जोडप्याचा प्रवास पुढे घेऊन जातो. हे दोघेही मुंबईत एकत्र आयुष्य जगत असले, तरी आता परदेशात स्थायिक होण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर येऊन थबकलेले असतात. ही घटना त्यांच्या दीड दशकापासूनच्या मुंबईतल्या वास्तव्यादरम्यानच्या आंतरिक प्रेम आणि स्थायिक जीवनाला आव्हान देणारी ठरते. मिकेश आणि तानियाची पात्रे त्याच आत्मविश्वासाने वावरतात. त्यांचा वावर रंजक आणि मोहक असल्याने प्रेक्षकाशी नाळ बांधून ठेवण्यास बऱ्यापैकी यशस्वी ठरतो. श्रेयांश पांडे दिग्दर्शित ही पाच भागांची मालिका म्हणजे भावनांच्या बलून्ससारखी आहे.

आजच्या पिढीतल्या तरुण जोडप्यांना भेडसावणारी आव्हाने यात ठळकपणे दिसतात. दुसऱ्या सीझनपेक्षा यामध्ये दोघांतले दाम्पत्य – विवाद काहीसे कमी झाले असले, तरीही कथेत असे अनेक प्रसंग घडतात, ज्यात ते हमरातुमरीवर येतात. त्यातूनही एक वेगळंच मनोरंजन होतं! पात्रे जसजशी परिपक्व होत जातात, तसतसे त्यांचे दैनंदिन प्रश्न काहीसे अधिक खोलवर मांडता येऊ शकतात, त्यातून कथा आणखी फुलवता येते. पण, या एकाच गोष्टीची इथे उणीव भासते.

या सीझनमध्ये फारसे काही बदललेले नाही. पहिल्या दोन्ही सीझनप्रमाणेच मिकी अद्यापही तन्नूचा प्रेमळ जोडीदार दाखवलाय. सुमीत व्यास आणि निधी सिंग हे दोघेही त्यांच्या भूमिकेत शोभून दिसतात. दोघांची केमिस्ट्री हे या मालिकेचे मुख्य आकर्षण आहे. सहकलाकारांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. शिशिर शर्मा आणि आयेशा रझा मिश्रा यांनी तानियाचे वडील आणि मावशीच्या भूमिकेत उत्कृष्ट काम केले आहे. शिबा चड्ढा यांनी मिकीच्या आईची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारली आहे.

दीपक मिश्रा खूप बकबक करणाऱ्या मित्राच्या भूमिकेत आहे. पुरुषोत्तमजींच्या भूमिकेतील त्यांचे वन – लायनर हसायला लावतात. सचिन पिळगावकर यांनीही एका खुशमिजाज शेजाऱ्याची भूमिका चोख बजावली आहे. त्यामुळे ‘पर्मनंट रूममेट्स’ ही सिरीज तिच्या चाहत्यांसाठी एक आकर्षक आणि आनंददायक अनुभव ठरते. अशा परिस्थितीत मिकी आणि तान्याला पुन्हा एकदा बघू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. याचा चौथा सीझन येणार असेल, तर लेखक, दिग्दर्शक यांनी काही मेहनत घेणे क्रमप्राप्त आहे. कारण त्याशिवाय आजच्या पिढीतील चाळिशीत पोहोचलेल्या मध्यमवयीन दाम्पत्याची खरी कहाणी समोर येणार नाही. असो.

‘पर्मनंट रूममेट्स’सारखीच मूळची मल्याळम भाषेतील आणखी एक युगलकथा ‘मास्टर पीस’ या मालिकेत आहे. डिस्नी हॉटस्टारवर मराठी, बंगालीसह सात भाषांत हिचे स्ट्रीमिंग आहे, हे विशेष. रिया आणि बिनॉय या जोडप्यामध्ये सातत्याने भांडण होत राहते, मात्र त्यांचे पालक त्यांच्या संसाराच्या मैदानात उतरल्यावर पाचोळा उडावा तसे भांडणाचे वादळ विरून जाते. पाच भागांच्या या मल्याळम वेबमध्‍ये एका तरुण युगलातील वाद अगदी सहजतेने आणि हलक्याफुलक्या पद्धतीने सुटताना दाखवलेत. अहंकारातून सुरू होणारी कथा रूसव्याफुगव्याची वळणे घेत विनोदी अंगाने फुलत जाते. दोन कुटुंबांमधल्या इर्ष्येने आणि इतर नको त्या घुसखोरीमुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे होते.

त्‍यांच्‍यामध्‍ये जनरेशन गॅपमुळे गैरसमज वाढतो. ‘मी’पणातून येणारे गैरसमज, दोन पिढीतले अंतर आणि नात्यात फुकट सल्ला देण्याची हौस यांमुळे साध्या गैरसमजाचे रूपांतर विस्फोटक भांडणात होऊन दोन कुटुंबांसाठी ते कसे विनाशकारी ठरू शकते, हे या सिरीजमध्ये मांडलेय. नित्या मेनन आणि शराफुद्दीन यांची कामे भन्नाट झाली आहेत. एक उत्तम उपहास आणि विडंबनामुळे ही सिरीज तरली आहे. डोक्याला फारसा ताप न देता आजच्या पिढीतील युवा दाम्पत्याच्या जीवनातले भावनिक आलेख खूप छान रेखाटले आहेत. एपिसोडची संख्या कमी करण्याच्या नादात त्यांची लांबी जास्त ठेवल्याने ते अखेरीस लांबल्यासारखे वाटतात. हा दोष वगळता ही एक चांगली भट्टी जमलेली यंग लव्ह स्टोरी आहे.

(संपर्क- sameerbapu@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments