कबीररंग: सुखिया ढूँढत मैं फिरूँ…

0
22
कबीररंग: सुखिया ढूँढत मैं फिरूँ…


हेमकिरण पत्की10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपण सर्वजण कुठलं तरी सुख शोधत असतो. शारीरिक भुकेच्या तृप्तीतील सुख, बौद्धिक प्रतिसादातून मिळणारं सुख, सत्कर्म करण्यातलं तसंच ज्ञानसंपन्न होण्यातलं सुख, आपण कलावंत असू तर उत्कट अनुभूतीतलं सुख शोधत असतो. आपण जाणता – अजाणता आजन्म सुखाच्या शोधात असतो. आपलं मन सतत सुखाची मागणी का करत असतं? सुखप्राप्तीची सुप्त इच्छा आपल्या मनात का असते? का या इच्छेसाठी आपण कष्ट वेचतो? हे सुख आहे तरी काय? त्याचा उगम कसा होतो? असे प्रश्न आपण मनाला कधी विचारत नाही म्हणूनच कदाचित जे मन सतत सुखामागे धावतं, त्याला सुखामागून सावलीसारखं येणारं दुःखही भोगावं लागणारंच, हे आपल्याला उमजत नाही.

दुःखापासून आपलं मन मोकळं ठेवायचं असेल, तर सुखनिर्मितीची प्रक्रिया आपल्याला जाणून घ्यावी लागेल. कबीरांनी ती आहे तशी जाणून घेतली आहे. या जाणण्यातलं अवघं शहाणपण आपल्या काळजाच्या ओंजळीत ठेवलं आहे. कबीर म्हणतात…

सुखिया ढूँढत मैं फिरूँ,

सुखिया मिलै न कोय।

जा के आगे दुख कहूँ,

पहिले ऊठै रोय।।

या जगात सुखी माणसाचा शोध घेत मी खूप फिरलो. पण कुणीही सुखी माणूस मला भेटला नाही. ज्या माणसाजवळ मी माझं दुःख सांगायचो, तो स्वतःच्याच दुःखानं रडू लागायचा. कबीरांचा अनुभव सुखमूलक समाजरचनेला समजून घेणारा आहे; पण त्यांच्या निरीक्षणात एखादाही सुखिया येत नाही. समाजाची सुखाची संकल्पना – व्याख्या वेगळी आहे आणि कबीरांची वेगळी आहे. समाज आणि कबीर यांचं सुखनिर्मितीचं केंद्र वेगळं आहे. खरं सुख एखाद्या वस्तू अथवा व्यक्तीवर जीवापाड केलेल्या प्रेमातून निर्माण होतं. हेच प्रेमसुख दुःखाच्या विरुद्धार्थी असलेल्या सुखासारखं नसतं. प्रेमसुख असतं तेव्हा दुःख नसतं. सुख-दुःखाचा भेद नसलेल्या साक्षीभावातून कबीर जगातल्या सुखी माणसांचा शोध घेतात. या शोधामागं असलेली त्यांची अनुभूती आपल्याला अंतर्मुख करते. खऱ्या सुखाच्या आशयाचा उजेड आपल्या मनात पसरवते.

वेगवेगळे देश पहावेत, देशांतील माणसांची मनं जाणावीत, त्यांच्या प्रकट विचार-विकारांना समजून घेत समाज निरखावा, हीच कबीरांची आध्यात्मिक दृष्टी आहे. या दृष्टीनं ते माणसाच्या सुखमूलक वृत्तीचा वेध घेतात…

देश दिशान्तर मैं फिरूँ,

मानुष बडा सुकाल।

जा देखै सुख उपजै,

वाका पडा दुकाल।।

कबीर म्हणतात, सर्व देशांत साऱ्या दिशांना मी फिरून पाहिलं, सर्वत्र माणसांची नुसती रेलचेल आहे. परंतु, ज्याला पाहताच सुख निर्माण होईल, अशांचाच आज दुष्काळ आहे. माणसाचा चेहरा पाहिल्यावर त्याच्या संतुष्ट वृत्तीचं दर्शन घडत नाही. त्याच्या आतल्या मनातील प्रसन्नता दृष्टीत प्रतिबिंबित होत नाही. अशीच सारी माणसं इथं – तिथं सर्वत्र दिसतात. सुखरूपता कुठं नजरेला पडत नाही. समाज संपर्कातून घडलेल्या समाजदर्शनात कबीर माणसांच्या वृत्तीची नोंद करतात : रस्तोरस्ती माणसं पुष्कळ आहेत; पण दृष्टी सुखानं ओथंबून येईल, असा एखादाही माणूस आढळत नाही.

कबीरांच्या काळजातील अमाप आस्थेला जाणून घेतलं, तर खऱ्या सुखाला पारखा असलेला माणूस आपल्या ध्यानात येतो. मग आपणही असेच खऱ्या सुखाला पाठमोरे तर नाहीत ना, असे आपल्या वृत्तीचे नि:शब्द चिंतन करू लागतो. कबीरांच्या तळमळीतलं खरेपण आपल्या काळजात ओलावा निर्माण करतं.

जा सुख को मुनीवर रटै,

सुर नर करै विलाप।

सो सुख सहजै पाइया,

सन्तों संगति आप।।

मुक्तीमध्ये असीम सुख असतं. ऋषीमुनी रात्रंदिवस त्या मुक्तीसाठी जप करत बसतात. परंतु, ज्या सुखासाठी ते अश्रू ढाळतात, ते मुक्तीचं सर्वश्रेष्ठ सुख साधुसज्जनांच्या संगतीमुळं सहज प्राप्त होतं.

आपण एखादा सुंदर मेघ पाहतो. स्वच्छ आकाशाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट दिसणारा डोंगर पाहतो. झाडाची नुकतीच फुटलेली लालस पालवी पाहतो. चित्ताला नि:स्तब्धता देणारा दिव्य, वैभवशाली सूर्यास्त पाहतो. हे सारं पाहताना आपल्याला मीपणाची जाणीव नसते, देखणेपणाचे भानही नसते. पाहणारा मी त्याक्षणी कुणी उरतच नाही. मीपणाशी जोडलेल्या समस्या, काळजी, चिंता विलय पावलेल्या असतात. हेच ते अनायास लाभलेले मुक्तीमधले असीम सुख! इंद्रिय संवेदनेतून उत्पन्न झालेल्या दर्शन, स्पर्श, संग आणि वासनेच्या पलीकडचे. हेच सुख शाश्वत असते आणि म्हणूनच सर्वश्रेष्ठही!

क्षणिक सुखाची समाप्ती करायची असेल, तर इंद्रियजन्य सुखाच्या पलीकडचं निरखावं लागतं. साधुसज्जनांच्या संगतीतलं एकलं अवधान वृत्तीत उतरून घ्यावं लागतं. तेव्हाच सहज सुखाची साधना फळाला येते. कबीरांचा हा निर्देश गुंतल्या मनाला मुक्त करणारा आहे.

(संपर्क : ९४०३७६८८९१, hemkiranpatki@gmail.com)



Source link