Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रकबीररंग: उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला...

कबीररंग: उड जायेगा हंस अकेला, जग दर्शन का मेला…

[ad_1]

हेमकिरण पत्की2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

या जगात आलेला प्रत्येक जण कधी न् कधी या जगाचा कायमचा निरोप घेतो. येणं त्याच्या हातात नसतं, तसंच जाणंही. ‘येण्या-जाण्या’मधला काळ या जगाचा निरोप घ्यायच्या दबावाखाली आपण व्यतित करतो का? की या जगाचा आपल्याला कायमचा निरोप घ्यायचा आहे, ही घटनाच स्पष्टपणे उमजत नाही आपल्याला? असं प्रश्नांकित होणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण या जगात येताना आपण ज्या भौतिक गोष्टी घेऊन आलेलो असतो, त्यातली एकही गोष्ट जगाचा कायमचा निरोप घेताना आपल्यासोबत येत नसते. आपल्या साऱ्या इच्छा, इंद्रियसुखाचं कारण होणारा देह, मनाच्या सगळ्या कल्पना, अवघ्या चेतनेशी एक होऊन राहिलेला आपला जीव अखेर अचेतन होऊन पडतो. तो आता पाहण्या-बोलण्यासारखा राहिलेला नसतो. एकूण अस्तित्वाच्या संदर्भात आपल्या जीविताचं नष्ट होणं आपल्याला खरेपणानं उमजतं का? आपल्या जाण्यानंतरही हे विराट अस्तित्व चेतन राहणार असतं, याचा बोध देहाच्या, देहभावाच्या नश्वरतेत आपल्याला होतो का? बहुदा नाही. कबीरांना यासाठीच केवळ माणसाच्या देहाची नश्वरता अधिक गडद करावी वाटते. देहाचं नष्ट होणं पाहून त्याच्यापलीकडचं त्याच्या जाणिवेत येईल, हा भरवसा कबीरांना वाटतो. ‘उड जायेगा हंस अकेला..’ या करूणेनं ओथंबलेल्या पदात आपल्याला याची अनुभूती येते. कबीर म्हणतात…

उड जायेगा हंस अकेला,

जग दर्शन का मेला।

जैसे पात गिरे तरुवर के,

मिलना बहुत दुहेला।

ना जानूं किधर गिरेगा,

लग्या पवन का रेला।

उड जायेगा हंस अकेला…

या देहातला प्राणपक्षी – हंस उडून जाईल. देह… देह म्हणून राहणार नाही; तो निर्जीव होईल. हा साधा पक्षी थोडाच आहे? तो ‘हंस’आहे! त्याच्याकडं विवेक आहे. हा प्राणपक्षी चेतन-अचेतनातला फरक जाणतो. देह निश्चेष्ट होताना तो अचेतनाचा आसरा सोडून उडून जाईल… अवघ्या अस्तित्वाच्या चेतनेशी पुन्हा एकजीव होईल. हे सारं घडताना जग हा देखावा पाहात राहील. ते काहीच करू शकणार नाही. देहाचं नाशवंत असणं अधोरेखित करण्यासाठी कबीर परिचित प्रतिकाच्या भाषेतून बोलतात. झाडाची पानं देठांतून गळून भुईवर पडतात. त्या पानांची त्या झाडाशी पुन्हा गाठ पडणं असंभव असतं. त्या पानांना देठांतून गळताना आपण कुठं पडू हे ठाऊक नसतं. ती वाऱ्याच्या अधीन असतात. देह परवश असतो, तो असा. एक केवळ अस्तित्वाचीच सत्ता असते. ती जाणता आली किंवा नाही जाणता आली, तरी हंस उडून जातो…

जब होवे उमर पूरी,

जब छुटेगा हुकूम हुजुरी।

जम के दूत बडे मजबूत,

जम से पडा झमेला।

उड जायेगा हंस अकेला…

कबीरांचं हृदय देहाचं नाशवंत असणं जाणून करुणेनं भरून येतं. ते म्हणतात, कुणाचं आयुष्य कधी पूर्ण होईल, कधी पिकून येईल ते मृत्यूदेवतेला ठाऊक! त्याचा आदेश जारी झाला की, माणसाला अंमलबजावणी करावी लागते. नाकारायचं स्वातंत्र्य माणसाकडं नाही. अखेरचं म्हणणं मांडायची, जीवभावाचं निवेदन सादर करायची संधी त्याला नाही. यमाचे दूत समोर उभे राहिले की, त्यानं केवळ मागून चालत जायचं. कुठलीही तक्रार करायची नाही. अस्तित्वाच्या आणीबाणीचा हा गाभा निःशब्द सहनशीलतेसह जाणून देहातला प्राणाचा हंस उडून जाईल…

दास कबीर हर के गुण गावे,

वाह हर को पारण पावे।

गुरू की करनी गुरू जायेगा,

चेले की करनी चेला।

उड जायेगा हंस अकेला…

हे माणसाचं जीवन अनिश्चित आहे, असुरक्षित आहे. इथली घटना मनाच्या इच्छेच्या कक्षेतली नसते. मग ही आपल्या जगण्याची पराधीनता जाणून ईश्वराधीन व्हावं. प्राण हरण करणाऱ्या हरिचे गुण गावेत. त्याच्याच प्रेमळ अनुसंधानात राहून शाश्वताचा पार गाठायचा पुरता यत्न व्हावा. एवढी साधना या जन्मात व्हावी, असं कबीर सुचवताहेत. गुरू आपल्या कर्मानुसार या भौतिक जगाचा कायमचा निरोप घेतील आणि शिष्य आपल्या कर्मानुसार निरोप घेईल. मात्र, दोघांच्याही देहांच्या पिंजऱ्यांतून हा प्राणाचा हंस पक्षी उडून जाणार आहे…आणि हा एकमेव बोध जीवलोकात कायमचा राहणार आहे. तोच मृत्यूच्या सान्निध्यात आपल्याला आत्मस्थ करणार आहे. कबीरांचं हे प्रेमपूर्ण कथन किती हृदयस्पर्शी आहे!

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments