- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Article Written By Praveen Dashrath Bandekar On Village Kadchi Diwali
प्रवीण दशरथ बांदेकरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
काल – परवापर्यंत किती छोट्या छोट्या तरीही नितांत सुंदर गोष्टी दिवाळीच्या या चार – पाच दिवसांशी जोडलेल्या होत्या. हळूहळू कधी हे सगळं संपत जाऊन त्याची जागा झगमगाटी दिव्यांनी, कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांनी, कर्कश संगीताने आणि जल्लोषी इव्हेंटनी घेतली, हे सांगता येणं कठीण. भूतकाळाचं बोट धरून बसणारे जगण्याच्या शर्यतीत मागे पडतात, हे मान्य असलं, तरी माझ्या मनात मात्र लहानपणी गावात अनुभवलेली ती मंगलमय दिवाळीच रुतून राहिली आहे…
दिवाळी जवळ येऊ लागली की बाबांची प्रकर्षाने आठवण येते. गेल्या काही वर्षांपासून ते दिवाळीला काही उरले दिवस असताना शहरातल्या माझ्या घरी येत असत. खास नातवंडांना आकाशकंदील बनवून द्यायला म्हणून. येताना गावाकडूनच ते आकाशकंदील बनवायचं बहुतेक सगळं साहित्य घेऊन यायचे. विशेषतः तासून गुळगुळीत केलेल्या बांबूच्या काठ्या, रंगीत कागद वगैरे. खरं तर, आता बाजारात हवे तसले छान छान आयते तयार केलेले आकाशकंदील विकत मिळतात.
आता पूर्वीसारखी धावपळ करायची काय गरज आहे? हे असं आम्ही कितीही सांगितलं, तरी त्यांना पटत नसे. त्यांचं म्हणणं होतं, काळ कितीही बदलला, तरी आपण पारंपरिक सण परंपरेप्रमाणेच साजरे करायचे. बाजारातल्या आयत्या वस्तू तुम्ही हवं तर अन्य दिवशी वापरा, पण सणासुदीला घरचंच सगळं हवं. केवळ आकाशकंदीलच नव्हे, तर चकल्या, करंज्या, लाडू वगैरे सगळे फराळाचे पदार्थही घरीच बनवावेत, असा त्यांचा आग्रह असे. वयोमानानुसार शेती करणं त्यांना जमत नव्हतं. आमची जमीन त्यांनी कुणाला तरी खंडाने शेती करायला सोपवली होती. बाकी तुला काय हवं ते पीक घे, पण एखादा तरी कोपरा पारंपरिक देशी वाणाच्या तांदळाचा करायला हवा, असं त्याला त्यांनी बजावून सांगितलं होतं. हे देशी तांदूळ पेजेसाठी आणि पोह्यांसाठी. आपल्या हक्काच्या शेतात पिकलेल्या याच पहिल्या भाताचे पोहे करून घेऊन त्यांनी सोबत आणलेले असत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे पोहे फराळात वापरले जावेत, यासाठी त्यांचा आग्रह असे.
बाबांचंही बरोबर होतं. कोकणात दिवाळी म्हणजे आणखी दुसरं तरी काय असतं? पहाटे उठून घरीच बनवलेलं उटणं लावून अभ्यंगस्नान केलं, शेतातल्या भातापासून बनवलेले हे पोहे खाल्ले, अंगणातल्या तुळशी वृंदावनासमोर ‘गोविंदा गोविंदा’ ओरडत कारिटं फोडली नि नरकासुराचा प्रतिकात्मक वध केला की झाली साजरी दिवाळी. फार फार तर पणत्या नि आकाशकंदील जोडीला. पण, एरवी गणपतीचा उत्सव साजरा करताना जो उत्साह असतो, घराघरांतून जी लगबग, जो बोवाळ सुरू असतो, तसं फारसं काही दिसत नाही, हेही खरं. अर्थात, बाकी काही नसलं, तरी दिवाळसणाशी जोडलेल्या काही प्रथा – परंपरा मात्र आजही काटेकोरपणे पाळल्या जातात. एकीकडं फोफावलेल्या बाजार संस्कृतीने सगळ्या सणांचं मूळ स्वरूपच पार उलटंपालटं करून टाकलं आहे. सण साजरा करण्यामागचं गांभीर्य, प्रयोजन, नैसर्गिक उत्स्फूर्तता हरवत चालली आहे. त्याचवेळी दुसरीकडे, परंपरांमागचा इतिहास माहीत नसला, तरी काही गोष्टी मात्र निव्वळ मागील पानावरून पुढे ढकलत नेल्या जात आहेत.
बांबूच्या काठ्यांचा आकाशदिवा, शेतातल्या भाताचे बनवलेले पोहे, नरकासुराच्या नावाने फोडण्यात येणारी कडू कारिटाची फळं, उकड्या तांदळाच्या पिठाचे गूळ घालून केलेले लाडू अशा सगळ्या गोष्टी या संस्कृती नि परंपरेपेक्षाही आमच्या निसर्गाशी, भौगोलिक पर्यावरणाशी, आर्थिक परिस्थितीशी जोडल्या गेलेल्या आहेत. दिवाळीच्या आसपास भातकापणीचा हंगाम सुरू होतो. साहजिकच, घरात आलेल्या नव्या भाताचे कांडलेले ताजे ताजे पोहे, नव्या तांदळाची खीर, तांदळा-गुळाचे लाडू, पोह्यांचा चिवडा, नारळाच्या खोबऱ्याची चुनकापं, हीच कोकणातल्या दिवाळीची पारंपरिक पक्वान्नं. आता काळ बदलला, आर्थिक सुबत्ता आली, फराळाचे असंख्य पदार्थ घराघरांतून बनू लागले. बाजारातही तयार मिळू लागले. तरीही, आपल्या शेतातल्या भाताऐवजी बाजारातून आणलेले का असेनात, पहिल्या दिवशी फराळाच्या पदार्थांसोबत पोहे मात्र अजूनही कायम आहेत.
नरकासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून रानातली कडू कारिटं फोडण्याची परंपराही आजही पाळली जात असली, तरी मोठमोठ्या आकारांचे नरकासुराचे गवत, कागद, बांबू वगैरे वापरून बनवलेले पुतळे भल्या पहाटे जाळायची नवीनच प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. सीमेलगतच्या गोमांतकातून ही प्रथा दक्षिण कोकणाच्या दिशेने सरकली. अलीकडे तर नरकासुराच्याही कानठळ्या बसवणाऱ्या ढोलांसह मिरवणुका, जोडीला फटाके, हिंस्त्र आरडाओरड, नाचगाणी अशा आधुनिक गोष्टींची जोड नरकासूर वधाच्या प्रथेला मिळाली आहे. गावोगाव नरकासूर स्पर्धा भरवून त्यांना प्रायोजित करणारे राजकीय प्रतिनिधीही वाढले आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे इतकं वाढत गेलं आहे की, लोकांना हल्ली दिवाळी म्हणजे नरकासूर दहनच वाटू लागलं आहे. तेच मुख्य आकर्षण. बाकीच्या गोष्टी फिजूल.
खरं तर, काल – परवापर्यंत किती छोट्या छोट्या तरीही नितांत सुंदर गोष्टी दिवाळीच्या या चार – पाच दिवसांशी जोडलेल्या होत्या. वसूबारसेच्या निमित्तानं ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या? राम आणि सीतेच्या…’ असं गाणं म्हणत गोठ्यातल्या गाईगुरांची पूजा करणं, त्यांना नटवून सजवून गोडधोड खिलवणं, गोठ्याच्या एका कोपऱ्यात शेण आणि कारिटं वापरून गाई – बैल – वासरांसहित गोठ्याची प्रतिकृती बनवणं, हा सगळा कार्यक्रम विलक्षण आनंदाचा भाग असायचा. आमच्या गावाला लागून असलेल्या डोंगररानांतून बिबट्या, वाघुटांसारख्या हिंस्त्र पशूंचा वावर असायचा. त्यांच्यापासून गाईगुरांचं रक्षण व्हावं म्हणून घराघरांतून गोडाधोडाच्या नैवेद्याचं एक पान या वन्यजीवांच्या नावानं नदीकाठावर ठेवलं जायचं. हा एक प्रकारचा संतुष्टीकरणाचा विधी होता.
रात्रीच्या नीरव शांत वेळी वाघेश्वर आणि वाघजाई देवी नदीत विहार करायला येतात, भूक लागली की हे नैवेद्य खाऊन संतुष्ट होतात आणि गाईगुरांना इजा न पोचवण्याचं वचन देतात, अशी लोकश्रद्धा. असंच संतुष्टीकरण गावातून वाहणाऱ्या नदीमायचंही केलं जायचं. त्यासाठी नरक चतुर्दशीच्या आदल्या रात्री गंगामैय्याची आरती गाऊन नदीच्या पात्रात पेटते दिवे सोडायचा सार्वजनिक कार्यक्रम असायचा. नदीचं हे संतुष्टीकरण तिनं आमच्या शेता – कुणग्यांचं, आयाबहिणींचं रक्षण करावं, तिच्या पोटात वास करणाऱ्या आसरांनी कुणाला त्रास देऊ नये, कुणाला बाहेरची कसली बाधा होऊ नये, या लोकधारणेतून केलं जायचं. नारळाच्या करवंटीत ठेवलेल्या त्या छोट्या आकाराच्या तेवत्या पणत्या वाहत्या पाण्यातून आपल्या भवतीचा चिमूटभर अंधार उजळवीत दूर जाऊ लागल्या की, दिसणारं दृश्य अतिशय रम्य आणि विलोभनीय असे. लहानपणी अनुभवलेली ती दृश्यं आजही विसरता येत नाहीत. तिन्ही सांजेनंतर अंगणाच्या पेळेवर, घराच्या पायऱ्यांवर ठेवलेल्या तेवत्या पणत्याही वाढत्या काळोखाच्या पार्श्वभूमीवर नितांत सुंदर दिसत. त्यांच्या जोडीला बांबूच्या काठ्यांना रंगीत कागद लावून केलेले, दारात टांगलेले आकाशदिवेही त्यांच्या पोटातली पणती सांभाळत मंदपणे चमकत असायचे. आमच्याकडची दिवाळी म्हटली तर ही इतकीच. पण, तिच्यासाठीही गणपती गेल्यापासून वेध लागलेले असायचे.
हळूहळू कधी हे सगळं संपत जाऊन त्याची जागा झगमगाटी दिव्यांनी, कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांनी, तितक्याच कर्कश संगीताने आणि नरकासूर स्पर्धा, दीपावली शो टाइम, दिवाली फेस्ट नाइट यांसारख्या जल्लोषी इव्हेंटनी घेतली, हे नेमकेपणाने सांगता येणं कठीण. बदल हा सृष्टीचा नियमच आहे, सारं काही अनित्य आहे, भूतकाळाचं बोट धरून बसलेले जगण्याच्या शर्यतीत मागे पडतात, हे सगळं मान्य असलं, तरी माझ्या मनात मात्र लहानपणी गावात अनुभवलेली ती मंगलमय दिवाळीच रुतून राहिली आहे. ती दिवाळी कदाचित गुराढोरांबरोबर शेतीभातीत राबणाऱ्या कष्टकरी वाडवडिलांची, सगळ्या प्रकारचे अभाव असलेली ‘दीन दीन दिवाळी’ अशी असेल. पण, तुकोबांच्या शब्दांत सांगायचं झालं तर… तेचिं असे माझ्या जीवाचे जीवन, विठ्ठल निधान सांपडले… असं मनात यावं इतकं सुरेख ‘विठ्ठल निधान’ सापडलेले ते दिवाळीचे दिवस होते, हे मात्र नक्की.
(संपर्क – samwadpravin@gmail.com)







