- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Special Article By Srirang Gaikwad | Dhananjay Powar DP | Atharva Sudame | Prasad Gawde Mangesh Kakad | Reelsstar YouTuber
डॉ. श्रीरंग गायकवाड8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
प्रदेश, रीतिरिवाज, संस्कृती यांनुसार दर १२ कोसांवर भाषा बदलते. मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या तिच्या अनेक बोलीभाषा आहेत. समाजमाध्यमांमुळे आता या बोलींना डिजिटल रुपात नव्याने उजाळा मिळाला आहे. आणि तो देण्याचे काम केले आहे, अनेक मराठी ‘रील्स बहाद्दरांनी’!
कोकणचा रानमाणूस : प्रसाद गावडे
रिल्सच्या माध्यमातूनही प्रबोधन, जनजागृती करता येते, हे दाखवून देणारा रीलस्टार म्हणजे प्रसाद गावडे. कोकणातील निसर्गाचा ऱ्हास रोखण्यासाठी आणि कोकणाचे गावपण राखण्यासाठी प्रसादने कंबर कसली आहे. त्यासाठीची लोकजागृती तो त्याच्या ‘कोकणी रानमाणूस’ या यूट्यूब चॅनलवरून तसेच समाजमाध्यमांच्या इतर प्लॅटफॉर्मवरून करत आहे. इंजिनिअर असलेल्या प्रसादने नोकरी सोडून कोकणातील आपल्या गावात शाश्वत विकास आणि इको टुरिझमच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची वाट धरली.
आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याने कोकणातील पर्यावरण आणि पर्यटनाबाबत कधीही समोर न आलेली माहिती देण्यास सुरुवात केली. कोकणातील निसर्गसौंदर्य, प्रेमळ माणसे, आरोग्यदायी जीवनशैली, संस्कृती यांचे वर्णन प्रसादच्या मालवणी भाषेत ऐकून शहरी माणसांना पुन्हा गावाकडच्या मातीच्या गंधाची आठवण झाली. यामुळे कोकणात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. पर्यटनस्थळांची माहिती देतानाच प्रसाद पर्यावरण संवर्धनाचे भान देतो. स्थानिकांचे निसर्गाभिमुख जीवन अनुभवावे, त्यांच्या शेतातील कोकणी मेवा खरेदी करावा, यासाठी तो प्रयत्न करत आहे. प्रसादच्या यूट्यूब चॅनलला सुमारे चार लाख सबस्क्रायबर, तर साडेपाच कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.
स्थळ पुणे : अथर्व सुदामे
टोमणे, शालजोडी, तिरकस, चोखंदळ असे शब्द ऐकले की आपोआप ‘पुणे’ आठवते. याचीच आठवण करून देणारे समाजमाध्यमांवरील ‘स्थळ पुणे’ आणि त्याचा निर्माता अथर्व सुदामे. मनसेचे राज ठाकरे यांनी अथर्वचे जाहीर कौतुक केले आणि तो आणखीच प्रकाशझोतात आला. पुणेकर म्हणून जे जे काही असते, ते ते अथर्वच्या अंगात ठासून भरले आहे. त्यामुळे त्याचे पुणेरी बोलीतील रील्स प्रचंड व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर त्याला १३ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर आहेत, तर यूट्यूबवर ९ लाख सबस्क्रायबर आहेत. त्यानेही कोरोना काळातच व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. लहानपणी कार्टूनही न पाहिलेला अथर्व उत्तम विनोदी रील्स बनवतो. त्याने युट्यूबवरील एका सिरीजमध्येही काम केले आहे. विशेष म्हणजे, अथर्वच्या रील्समध्ये बहुतेक मराठी सिनेकलाकार दिसतात. तसेच हिंदी कलाकारही आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्याच्या व्हिडिओत आवर्जून हजेरी लावताना दिसतात.
मंगाजी : मंगेश काकड
दुटांगी धोतर, उंच दिवालाची टोपी, अक्कडबाज मिशा आणि सतत ‘ओ पप्पा…’ म्हणत सतावणारा त्यांचा इरसाल कार्टा, अशा दोन भूमिका साकारत उत्तर महाराष्ट्रातच नव्हे, तर समाजमाध्यमांवरून सर्वत्र प्रसिद्ध झालेला मंगाजी ऊर्फ मंगेश काकड. सिव्हिल इंजिनिअर, थिएटर आर्टिस्ट आणि शेतकरी असणाऱ्या मंगाजीला इन्स्टाग्रामवर साडेनऊ लाख लोक फॉलो करत आहेत. मंगेश लहानपणापासून मराठी सिनेकलाकारांची मिमिक्री करायचा. पुढे हीच कला त्याला समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून गेली.
मंगेश नाटकांमधून कामे करतो. प्रायोगिक रंगभूमीवरील ‘बट बिफोर लिव्ह’ या गाजलेल्या नाटकाचे त्याने महाराष्ट्रभर अनेक प्रयोग केले आहेत. ‘पुनश्च हनीमून’ या नाटकात तो सध्या काम करत आहे. शेती सांभाळून, समाजमाध्यमांद्वारे मंगेशने कलेशी नाते जपले आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’चे अवधूत गुप्ते, ‘भाडिपा’ची कॅनेडियन कलाकार पॉला आणि इतर अनेक सिनेकलाकारांसोबत धोतर-टोपीवाल्या मंगाजीचे रील्स पाहायला मिळतात. मंगेशच्या ‘मंगाजी’च्या निमित्ताने समाजमाध्यमांवर लोकांना नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील बोली अनुभवायला मिळत आहे.
डीपी दा : धनंजय पोवार
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सर्वजण घरात अडकून पडले होते, तेव्हा त्यांना समाजमाध्यमांवरून रांगड्या कोल्हापुरी भाषेत, आपल्या खट्याळ स्वभावाने खळखळून हसवणारा ‘डीपी दा’ अर्थात इचलकरंजीचा धनंजय पोवार सर्वदूर परिचित झाला. इचलकरंजीत पवार फॅमिलीचा फर्निचरचा मोठा व्यवसाय आहे. तोही लॉकडाऊनमध्ये बंद ठेवावा लागला. त्या वेळी टाइमपास म्हणून धनंजयने घरातच मोबाइलवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि बघता बघता तो प्रत्येक मराठी माणसाच्या मोबाइलमध्ये दिसू लागला.
त्याची आई, वडील, पत्नी, बहीण, दुकानातील कर्मचारी हे जणू प्रत्येकाला आपल्या घरातील सदस्य वाटू लागले. सुरुवातीला विरोध करणारे धनंजयचे वडीलही नंतर त्याच्या व्हिडिओमध्ये दिसू लागले. धनंजयचे मांसाहारावरचे प्रेम, पत्नी, आई, बहीण यांच्या काढलेल्या खोडी यातून लोकांचे मनोरंजन होते. विनोदातून कौटुंबिक एकोप्याचा संदेश जावा, असा प्रयत्न तो करतो. धनंजयच्या यूट्यूबच्या चॅनलचे सुमारे ९ लाख सबस्क्रायबर आहेत, तर त्याचे व्हिडिओ ७० कोटी लोकांनी पाहिले आहेत. ‘डीपी दा’च्या या रील्समुळे रांगड्या कोल्हापुरी मराठी बोलीचा परिचय शहरातील तरुण पिढीलाही होत आहे.
याशिवाय; विनायक कोळी, प्राजक्ता कोळी, नील सालेकर, सिद्धांत सरफरे, करण सोनावणे, मृणाल दिवेकर, डॅनी पंडित, प्रसिका अर्थात प्रसाद आणि दीपिका, सौरभ घाडगे, वृषाली जवळे, सुशांत घाडगे, शुभम जाधव, श्रवण क्षीरसागर, शंतनू रांगणेकर, नीलराज कदम, निखिल धाडवे, तेजस गायकवाड, मनमीत पेम, अंकिता वालावलकर असे अनेक मराठी एन्फ्लुएन्सर्स आपापल्या बोलीभाषांसह मनोरंजन विश्वावर राज्य करत आहेत. मराठीला समृद्ध करताना आपली संस्कृती घडवण्यात आणि टिकवण्यात या सगळ्या मंडळींचे मोठे योगदान आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही
(संपर्क – dnyanabatukaram@gmail.com)





