
समीर गायकवाड12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
अलीकडेच मुबी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘नो बिअर्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. जागतिक कीर्तीचे इराणी दिग्दर्शक जाफर पनाही यांनी यात स्वतःचीच भूमिका साकारलीय. एक चित्रपट निर्माता तुर्कीमध्ये एका सिनेमाचे दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याला सीमेजवळील इराणी गावात राहण्यास भाग पाडले जाते. एकीकडे युरोपला पलायन करण्याची कथा सादर करण्यासाठी त्यातली स्टार कास्ट जीवतोड प्रयत्न करते, तर दिग्दर्शक मात्र गावातील स्थानिक घोटाळ्याच्या केंद्रस्थानी अडकलेला असतो, असा या चित्रपटाचा छोटासा स्टोरी प्लॉट आहे. जाफर पनाही यांनी तीन दशकांच्या कारकिर्दीत आत्म-प्रतिबिंबित कथाकथनाच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवलंय. सरकारच्या कठोर बंधनातही ते लढत राहिले. कलाकारांच्या नव्या पिढीला आता तोच लढाऊ बाणा ते शिकवत आहेत. एखाद्याच्या कलाकृतीचे सादरीकरण करताना दडपशाहीला बळी पडू नये, याची प्रेरणा पनाही देतात. राजकीय, कलात्मक धैर्याचे ते चिरस्थायी पुरस्कर्ते राहिले आहेत.
‘नो बिअर्स’ सिनेमातील एका दृश्यात चित्रपट निर्मात्याच्या जीवनातील वास्तवाची कटुता झाकण्यासाठी त्याला एका व्यवस्थित, आरामदायी, सुखांताच्या मुखवट्यामध्ये सादर केले आहे. वास्तवाचे स्वरूप आणि त्याचे सच्चेपण यावर मार्मिक भाष्य केले आहे. पनाही कथानिवेदक म्हणून समोर येत असले, तरी ते स्वतःच्या मर्यादा तपासण्यात गुंतलेले दिसतात. जगण्याची लढाई हरलेल्या लोकांच्या जीवनातून सत्याचा पाठलाग करून तो काल्पनिक टोकापर्यंत पोहोचवणे, हे नैतिक आहे का, असा प्रश्न चित्रपटादरम्यान प्रकर्षाने समोर येतो. हा चित्रपट दोन ट्रॅकमध्ये विभाजित आहे. पहिल्या ट्रॅकमध्ये दिसते की, तुर्कीमध्ये एक चित्रपट शूट केला जात आहे, ज्यामध्ये पनाही स्वतः दिग्दर्शक आहेत. ही एका जोडप्याची कथा आहे.
झारा (मीना कवानी) आणि बख्तियार (बख्तियार पंजी) युरोपला स्थलांतरित होऊ पाहतात, परंतु संकटात सापडतात. पतीने आपल्या पत्नीसाठी पासपोर्ट घेतला आहे, पण स्वतःसाठी नाही. तरीही तो तिला युरोपला निघून जाण्याचा आग्रह धरतो. शक्य तितक्या लवकर तिच्या मागोमाग येण्याची खात्री तो देतो. साहजिकच, झारा त्याच्याशिवाय जाण्यास नकार देते. दुसरा ट्रॅक थेट चित्रपट निर्मात्याला फॉलो करतो, कारण हा चित्रपट हीच त्याच्या कामाची एक वैशिष्ट्यपूर्ण नस आहे. इराण सरकारने त्याच्यावर सीमा ओलांडण्यास बंदी घातल्यापासून तुर्की – इराण सीमेजवळील जबान गावातून काम करताना तो त्याच्या क्रूच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. या प्रसंगांचे चित्रण विलक्षण आहे.
पनाहींचे सिनेमे बहुतांशी आशावादी दिशेने जातात. त्यांच्या ‘ऑफसाइड’ या सिनेमाचा क्लायमॅक्स विसरता येत नाही. २००६ मध्ये इराणचा संघ फुटबॉलचा सामना जिंकून विश्वचषकासाठी पात्र ठरतो, तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी तेहरानचे पोलिस अधिकारी महिला फुटबॉल चाहत्यांसोबत रस्त्यावरील नाचगाण्यात सामील झाल्याचे त्यात दाखवले होते. याउलट ‘नो बिअर्स’ हा अर्ध्या प्रवासात अंधार करणारा, उदास करणारा स्वर भासतो. पनाहींचा मागोवा घेणारा घनबर (वाहिद मोबस्सेरी), त्याचा घरमालक आणि स्वयंपाक करणारी म्हातारी यांच्या छोट्या प्रसंगांमधून चित्रपट पुढे जातो. त्यातून परंपरा आणि अंधश्रद्धांचे काटेकोर अनुकरण करत असलेल्या समुदायाचे चित्र पडद्यावर साकारते.
शेरीफच्या नेतृत्वात गावातील वडीलधारी मंडळी चित्रपट निर्मात्याची निंदा करण्यास तत्पर असतात आणि गावातील नववधू गोझाल (दर्या आले) हिला तिच्या जुन्या प्रियकरासोबत घेतलेले छायाचित्र त्याच्याकडे असावे, अशी शंका आल्याने ते त्याला पकडतात. यामुळे गावात खळबळ उडते. पनाहींच्या चौकशीच्या फेऱ्या सुरू होतात. सुरूवातीला ते खोडून काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या लक्षात येते की, येथेही पाळत ठेवण्याचे जाळे कार्यरत आहे. तो सीमेवरून रात्रीचा प्रवास देखील करतो, ज्याची परिणीती अखेर भयानक शेवटात होते.
पनाहींविषयी शत्रुत्व वाढवणारे भयंकर अनुमान काढू देणे, हे या चित्रपटाचे वेगळेपण आहे. एरवी चित्रपट निर्माता स्वतःच्या प्रतिमाशक्तीची चाचणी घेण्याची परवानगी देतात, असं कुठं पाहण्यात येत नाही. यात एक महत्त्वाचे वाक्य आहे… ‘आपली भीती इतरांना सक्षम करते!’ या भीतीचा आणि त्या अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या धमकीचा वापर परंपरा / अंधश्रद्धेच्या नावाखाली बळजबरी करण्यासाठी केला जाणे, हे सत्त्व पनाहींच्या छाननीच्या टोकाशी आहे. पनाही जेव्हा गुप्त भेटीदरम्यान सीमावर्ती प्रदेशाजवळील परिसराचे सर्वेक्षण करतात, तेव्हा त्यांच्यासोबत असलेला सहायक संचालक रेझा त्यांना, ‘सीमारेषा कुठं आहे?’ असे विचारत ते नेमके सीमेवरच उभे आहेत, याकडे लक्ष वेधतो. पनाही क्षणात माघार घेतात अन् सावधपणे मागे सरकतात. पुढं चित्रपट एका भयंकर वळणावर येतो. स्वतःचं भलं व्हावं असं वाटत असेल, तर पळून जा, असा सल्ला त्यांना दिला जातो. तेव्हा पलायनाऐवजी ते तिथेच थांबण्याचा पर्याय निवडतात. या निर्णयाला अधोरेखित करणाऱ्या घटना व्यक्तिश: पनाहींच्या कारकिर्दीत अनेकदा घडल्या आहेत. त्यांच्यासारखी व्यक्तिस्वातंत्र्याची व्याख्या क्वचित कुणी करू शकेल. स्वतःचं अपराधीपण न लपवता समोरच्या व्यक्तीला आत्मपरीक्षण करण्यास ते भाग पाडतात, हे त्यांचे मोठे यश! किमान यासाठी तरी हा चित्रपट पाहिला पाहिजे.
(संपर्क : ९७६६८३३२८३, sameerbapu@gmail.com)





