नेटस्ट्रीम: द रेल्वे मेन : अनाम नायकांची अज्ञात कहाणी

0
20
नेटस्ट्रीम: द रेल्वे मेन : अनाम नायकांची अज्ञात कहाणी


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Articles Netstream Write By Sameer Gaikwad On Railway Men

समीर गायकवाड8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

यशराज फिल्म्सने ‘द रेल्वे मेन’च्या निर्मितीद्वारे ओटीटी स्पेसमध्ये प्रवेश केला आहे. जगातील सर्वात भीषण औद्योगिक आपत्ती मानल्या जाणाऱ्या भोपाळ गॅस दुर्घटनेत जीव वाचवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर ही सिरीज आधारित आहे. नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘द रेल्वे मेन’मध्ये के. के. मेनन, माधवन, दिव्येंदू आणि बाबिल खान प्रमुख भूमिकेत आहेत. २ डिसेंबर १९८४ च्या रात्री भोपाळमधील युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड कंपनीच्या प्लांटमध्ये ही घटना घडली होती. हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या नि तरीही प्रसिद्धीपरान्मुख राहिलेल्या रिअल लाइफ हिरो असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे बलिदान अत्यंत नेटक्या पद्धतीने समोर आणल्याबद्दल या सिरीजचे निर्माते विशेष कौतुकाला पात्र आहेत.

युनियन कार्बाइडच्या कामगारांमधील योग्य प्रशिक्षणाचा अभाव, प्लांटमधील खराब, तकलादू सुरक्षा यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार ही या दुर्घटनेची मुख्य कारणे होती. सिरीजमध्ये या बाबींवर अगदी लख्ख प्रकाश टाकला गेलाय. ज्या पद्धतीने औद्योगिक आपत्तीची ही प्रलयंकारी घटना घडली, तिचे चित्रण अगदी भयावह आहे. आपल्या आजूबाजूला काय चालले आहे, हे देखील भोपाळच्या लोकांना माहीत नसल्यामुळे ते आपापसात भांडू लागतात, त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढत जातो. माणसं पटापट मरु लागतात. अनेक निष्पाप जीवांना अक्षरशः तडफडत प्राण गमवावे लागल्याचे पाहताना कोणत्याही सहृदयी व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्याशिवाय राहात नाहीत.

सिरीजमधील सर्वच मुख्य कलाकारांचा अभिनय जबरदस्त आहे. या सगळ्यात के. के. मेननने आपल्या अनोख्या व्यक्तिमत्वाच्या सहाय्याने स्टेशनमास्तरच्या भूमिकेत जान ओतलीय. लोकांना वाचवण्यासाठी तो शक्य ते सारे प्रयत्न करतो. त्याची धडपड त्याच्या भूमिकेत उठून दिसते, त्याची हतबलता अंगावर येते. ‘मिर्झापूर’फेम दिव्येंदू आणि बाबिल खान यांनीही आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत के. के. मेननला चांगली साथ दिलीय. मात्र, या सिरीजमध्ये बरेच सबप्लॉट आहेत. त्यापैकी बहुतेक उपकथानके आणखी व्यवस्थित हाताळायला हवी होती. तसे न झाल्याने काही ठिकाणी एपिसोडची लांबी वाढल्याचा फील येतो. काही सबप्लॉटचे शेवटही योग्य नाहीत. काही दृश्यांना अधिक नाट्यमयरित्या रंगवण्यात आले आहे. कदाचित इमोशनल अपीलसाठी हे केले गेले असावे. परिणामी त्या भूमिकांचे रंग उठून दिसतात, मात्र दुर्घटनेचे गांभीर्य वेगळ्या स्तरावर गेल्याने तिचा प्रभाव काहीसा ओसरत राहतो. अशी थोडीफार गफलत झालेली असूनही ही सिरीज आवर्जून पाहण्यासारखी आहे.

काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘चेर्नोबिल’ या इंग्रजी वेब सिरीजमध्ये रशियातील चेर्नोबिल अणुभट्टीच्या विस्फोटामुळे घडलेल्या दुर्घटनेचा दाहक नि वेधक धांडोळा घेतला होता. प्रेक्षकांची मती गुंग करण्याची ताकद त्यात होती. ‘द रेल्वे मेन’ ही सिरीज त्या दर्जाची आहे, तिची मांडणी रंजक आणि प्रभावी आहे. तिची गती वेगवान असती, तर चेर्नोबिलच्या तोडीस तोड अशी तिची गणना झाली असती. तरीही एक उत्कृष्ट प्रयत्न म्हणूनच या सिरीजची नोंद होईल. वायआरएफ एंटरटेन्मेंटने या मालिकेवर मुक्तहस्ते खर्च केला आहे, हे सिनेमॅटोग्राफीतून जाणवत राहते. एखाद्या हिंदी सिरीजसाठी इतकी उच्चतम निर्मिती मूल्ये क्वचित दिसतात. यशराजने केलेला खर्च आश्चर्यकारक नि क्रांतिकारक म्हणावा लागेल, कारण ही सिरीज हिट झाली, तर विविध निर्मात्यांजवळची तिजोरी खुली होऊन आगामी काळात आणखी काही भव्य दिव्य सिरीज फ्लोअरवर जाऊ शकतात. या सिरीजमधील सेट अप्रतिम झाले आहेत. त्यातून गतकाळ अगदी ताकदीने उभा केला गेलाय. त्या कालखंडातील छोटे छोटे बारकावेही सेटमध्ये टिपले आहेत.

शिव रवेल यांचे दिग्दर्शन असलेली ही पहिलीच सिरीज. अनुभवी दिग्दर्शकाची सफाई त्यांच्या टचमध्ये आहे. भोपाळ वायू दुर्घटनेबद्दल विस्तृत संशोधन करुन त्यावर मेहनत घेतल्याचे स्पष्ट जाणवते. मूळ घटना खरे तर अत्यंत भयावह आणि दाहक होती. मात्र, तिचेच वास्तव आणि टोकदार स्वरूप सरकार आणि माध्यमांनी कधीच समोर येऊ दिले नाही. त्यामुळे ही घटना अधिकाधिक प्रभावी वाटावी, यासाठी यात व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिकार वापरत काही भूमिका डार्क शेडेड केल्या आहेत. या दुर्घटनेतील क्रौर्य, भय आणि भीषणता हे सर्व नेमकं कसं समोर आणायचं, हा पेच कायमच राहिलाय. कदाचित त्याचे उत्तर या सिरीजमध्ये दडले असावे. म्हणूनच असे सादरीकरण अनिवार्य वाटत असावे. मात्र, ते फारसे खटकत नाही, ही जमेची बाजू! आपला जीव धोक्यात असताना इतरांच्या प्राणरक्षणासाठी अंतःकरणापासून झटणाऱ्या सामान्य भारतीय माणसांची ही श्वासरंजित भयग्रस्त गोष्ट पहिल्या एपिसोडपासून मेंदूचा कब्जा घेते. दुर्घटनेपश्चात घडलेल्या राजकीय हिणकसतेचा, सामन्यांना मिळालेल्या तुटपुंज्या नुकसान भरपाईच्या साठमारीचा, दीर्घकाळ कवित्व चाललेल्या न्यायालयीन लढाईतून हाती आलेल्या फसवणुकीचा आणि भकास झालेल्या भविष्याचा वेधही घेतला असता, तर सिरीजला आणखी मोठा कॅनव्हास लाभला असता. ही कमी असूनही ही सिरीज ‘मस्ट वॉच’ झालीय. ती पाहून झाल्यावरही यातील काही इमेज डोक्यात खिळे ठोकून रुतून बसाव्यात तशा बसतात. विशेषत: आपल्या तान्ह्या बाळाला दूध पाजताना मरण पावलेली आई विसरता येत नाही… ‘द रेल्वे मेन’ला त्यासाठी सॅल्यूट!

(संपर्क – sameerbapu@gmail.com)



Source link