देश – परदेश: चला, ज्ञानाचा नवा रस्ता धरा…

0
18
देश – परदेश:  चला, ज्ञानाचा नवा रस्ता धरा…


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Let’s Take The New Path Of Knowledge | Dnyaneshwar Mule Article

ज्ञानेश्वर मुळे12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

प्रवास हा बहुआयामी असतो. तो काही ना काही शिकवतोच. ‘चराति चरतो भग:’ असे म्हणतात. म्हणजे, चालणाऱ्याचे भाग्य चालते. शिक्षणाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पर्यटन. पर्यटनात इतिहास, संस्कृती, कला, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र इतकेच काय, काव्य आणि नाट्यही भेटते.

प्रवास करणे हे माझ्या अनेक वेडांपैकी एक आहे. प्रवास खऱ्या अर्थाने नेहमीच्या, रुळलेल्या जीवनक्रमाला नवा अर्थ देतो. प्रत्येकाच्या जीवनाचा एक प्रवास असतो. पण, काहींच्या वाटेला प्रवास हेच जीवन येते. पायाला भिंगरी म्हणावे की भिंगरीला पाय हे समजू नये, इतका माझा प्रवास होतो. गेल्या सहाएक दशकांमध्ये पृथ्वी पालथी घातली आहे, पण अजून तो ‘प्रवासी किडा’ किंवा ‘आतला जिप्सी’ स्वस्थ बसू देत नाही. गेल्या तीन आठवड्यांत मी हैदराबाद, नेपाळची राजधानी काठमांडू आणि स्वर्गीय सौंदर्याचे दर्शन घडवणाऱ्या आपल्या राज्यातील सिंधुदुर्गला भेट दिली आहे. या प्रवासात मला काय दिसले? मी काय अनुभवले, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कोणताच प्रवास व्यर्थ नसतो, तो काही ना काही शिकवतोच. हैदराबाद हे भारतातील प्रमुख शहरांपैकी एक. आज हे शहर इतर शहरांना मागे टाकताना स्पष्ट दिसते. बेंगळुरु आणि पुणे या दोन शहरांना स्वत:चे वाहतुकीचे प्रश्न सोडवता आले नाहीत. हैदराबाद शहरात मला या दोन शहरांसारखी वाहतुकीची जीवघेणी कोंडी दिसत नाही. तिथेही असे काही भाग असतील, मात्र मला हैदराबादेत नेहमीच्या रस्त्यावर सतत चांगलाच अनुभव आला. विशेष म्हणजे, या शहराने प्रगत देशांना लाजवेल असा रिंग रोड बनवला आहे. कुठेही खाचखळगे नसलेला हा रस्ता बाहेरुन येणाऱ्या आणि तिथून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला खूप सोयीस्कर आणि कार्यक्षम वाटल्याशिवाय राहात नाही.

हैदराबाद हे आयटी आणि विशेषत: स्टार्टअपच्या बाबतीत देशात अग्रस्थानी आहे. या वेळेस मी ‘कौटिल्य स्कूल ऑफ डिप्लोमसी’ या गीतम विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूटमध्ये सेमिनारसाठी गेलो होतो. आपल्या देशात मेडिकल आणि आयटी या शाखांवर प्रकाशझोत असल्याने मानव्य विभागाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. समाजशास्त्र, अर्थशास्त्राप्रमाणेच खरे तर विज्ञानाच्या विविध शाखांकडेही लोक फारशा आदराने पाहात नाहीत. या पार्श्वभूमीवर कूटनीती, विदेश धोरण, मानवी हक्क, वातावरण बदल वगैरे महत्त्वाच्या विषयांचे तज्ज्ञ अनेकदा शोधूनही मिळत नाहीत. ‘डिप्लोमसी’शिवाय भारताला जागतिक क्षेत्रात डंका वाजवता येणार नाही. या क्षेत्रातील थिंक टँकचा अभाव शासनाची धोरणे जगभर नेण्यात अडसर ठरत आहे. तेलंगणात नवीन आलेल्या सरकारचे माझ्या संपर्कात आलेल्या अनेकांनी स्वागतच केले, पण भ्रष्टाचाराच्या बाबतीत प्रत्येकानेच चिंता व्यक्त केली. हे तर संपूर्ण भारताचे दुखणे आहे.

नेपाळच्या दोन दिवसांच्या यात्रेतही त्या देशाच्या मानसिकतेविषयी आणि कार्यपद्धतीविषयी बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. चीन – नेपाळ संबंधांविषयी आमच्या सेमिनारमध्ये कुणीही गौरवाचा किंवा निंदेचा शब्द काढला नाही. मात्र, विचारल्यानंतर सर्वांनी सांगितले की, चीन फक्त राजकीय पक्षांना, शासनाला किंवा संस्थांनाच मदत करतो असे नव्हे, तर त्यांचा नेपाळी विद्यार्थ्यांवरही रोख आहे. त्यांना मेफत शिक्षण, चिनी भाषेचे प्रशिक्षण, शिष्यवृत्त्या अशी अनेक प्रलोभने दाखवली जात आहेत. पण, भारत आणि अमेरिकेतील शिक्षण संस्थांच नेपाळी तरुणांना भुरळ पाडतात. नेपाळी शासन चीनची आर्थिक मदत घेत असले, तरीही ते चीनच्या प्रेमात पडलेले नाहीत, हे मला पदोपदी दिसले. नेपाळमधील भारताची मुळे ही पाच एक हजार वर्षांच्या सांस्कृतिक संबंधांमुळे अत्यंत खोल आहेत.

पशुपतीनाथ हे ‘राष्ट्रीय’ दैवतच नेपाळच्या भारताशी असणाऱ्या प्रगाढ संबंधांचे सुंदर प्रतीक आहे. चारी बाजूंनी भूक्षेत्र असल्याने नेपाळचे भारतावर पुरेपूर अवलंबित्व आहे. किंबहुना, नेपाळच्या नाड्या अनेक अर्थाने भारताच्या हातात आहेत. आर्थिक असो, सामाजिक असो वा सांस्कृतिक ; भारत – नेपाळ संबंधांच्या तुलनेत आजही चीन- नेपाळ संबंध उथळ आहेत. तेथील प्रवासादरम्यान दोन गोष्टी वारंवार चर्चेत आल्या.

एक : नेपाळमधील राजकीय अस्थिरता. १५ वर्षांत १६ सरकारे ही राजकीय किंमत नेपाळसारख्या अविकसित देशाला परवडणारी नाही. या समस्येवर नेपाळ मार्ग काढत नाही, तोवर भ्रष्टाचार संपणे शक्य नाही. आणि तोपर्यंत नेपाळची प्रगतीही अशक्य आहे. दोन : नेपाळमधील युवक देश सोडून जात आहेत. मुख्य म्हणजे, देशातील प्रचंड बेरोजगारीला कंटाळून ते मिळेल तिथे नोकऱ्या शोधताहेत. म्हणावी तशी कुशलता किंवा शैक्षणिक पात्रता नसल्याने बहुतेक युवक मिळेल त्या नोकऱ्या अल्प पगारावर करतात. दुसरीकडे, नेपाळच्या मुलींना अवैधरित्या बाहेर पाठवण्याचे प्रकारही सुरू आहेत. त्यावर या क्षणी तोडगा दिसत नाही. शेती कशीतरी चालते, उद्योग-व्यवसाय नाहीत. या कोंडीवर मात करण्याबरोबरच अमेरिका आणि चीनचा प्रभाव व रोहिंग्यांचे मोठ्या प्रमाणात झालेले आगमन या गोष्टी आव्हान म्हणून नेपाळला सतावत राहणार आहेत.

तिसरी भेट मी दिली ती सिंधुदुर्ग जिल्ह्याला. मालवणच्या राजकोटला भेट देऊन शिवछत्रपतींना मुजरा केला. त्या पुतळ्याला कलात्मकता, भव्यता किंवा महाराजांना साजेशी मुद्रा यापैकी काहीच नसल्याची चर्चा करत गाडीत बसलो. दुसऱ्या दिवशी हा पुतळा पडल्याची खबर आली. ती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली. ‘महाराष्ट्र तुमच्या कृपेला अजिबात पात्र नाही. माफ करा..’ असे मनोमन बोललो. सिंधुदुर्ग हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. शेजारच्या गोव्यात पर्यटकांनी कहर केला आहे. पण, तुलनेने इथले किनारे सुंदर आणि वर्दळविरहित आहेत. इथली वृक्षराजी नजरेला सुखावते. इथले स्वच्छ आकाश, अप्रतिम सूर्योदय आणि सूर्यास्त, मजबूत किल्ले, कडेकपारी.. सर्वच मनाला भावणारे आहे. पण, पर्यटनाचा विकास करताना निसर्ग टिकवण्याचे आव्हान मात्र पेलावे लागणार आहे. उत्तर गोव्यातील अनियंत्रित विकासाची लाट हळूहळू आरोंद्यापासून आत घुसू पाहतेय.

प्रवास हा असा बहुआयामी असतो. ‘चराति चरतो भग:’ असे म्हणतात. म्हणजे, चालणाऱ्याचे भाग्य चालते. शिक्षणाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पर्यटन. पर्यटनात इतिहास, संस्कृती, कला, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र इतकेच काय, काव्य आणि नाट्यही भेटते. त्यामुळे चला तर मग, प्रवासाला निघा.. ज्ञानाचा नवा रस्ता धरा… (संपर्क- dmulay58@gmail.com)



Source link