Tuesday, August 11, 2026
Homeसाताराखामगाव दुर्घटना : एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी केबलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल; निष्काळजीपणामुळे दुर्घटना...

खामगाव दुर्घटना : एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी केबलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल; निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष

खामगाव दुर्घटना : एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी केबलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल; निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष

फलटण | प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालेल्या हृदयद्रावक घटनेप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संबंधित केबलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात निष्काळजीपणे टाकलेल्या केबलच्या लोखंडी सपोर्ट वायरमुळे ही भीषण दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

दि. ८ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास खामगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली होती. घरासमोर पडलेल्या लोखंडी तारेचा विजेचा शॉक लागून सतीश ऊर्फ पिसुरडया किसन शिंदे (वय ४५), गंगू सतीश शिंदे (वय ४०), सचिन सतीश शिंदे (वय २६) आणि आरती सतीश शिंदे (वय २४) या चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.

घटनेनंतर शीतल सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची सखोल पाहणी करून तांत्रिक तपास सुरू केला.

तपासादरम्यान संबंधित घरावरून निष्काळजीपणे केबल टाकण्यात आल्याचे उघड झाले. केबलला आधार देण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी सपोर्ट वायर घरासमोर खाली पडली होती. त्या तारेचा संपर्क आल्याने चौघांनाही विजेचा तीव्र शॉक बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.

या निष्कर्षाच्या आधारे केबलचालक तात्यासो चंदर लांडगे (रा. खामगाव, साखरवाडी, ता. फलटण) याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेसाठी अन्य कोणाचा निष्काळजीपणा किंवा जबाबदारी आहे का, याचाही पोलीस तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी या प्रकरणातील गुन्हा दाखल झाल्याची माहिती देत, तपासाच्या आधारे पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments