
सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी तापू लागली आहे. सर्व बाजार समित्यांसाठी विक्रमी 913 अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी या अर्जांची त्या त्या तालुक्यांच्या सहायक निबंधक कार्यालयांमध्ये छाननी करण्यात आली. या अर्ज छाननीत 88 अर्ज बाद झाले आहेत, तर लोणंद बाजार समितीत हरकत दाखल झालेले पाच अर्ज निकालासाठी प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता 820 अर्ज शिल्लक राहिले असून, माघारीनंतरच किती उमेदवार मैदानात राहणार हे निश्चित होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, कोरेगाव, फलटण, वडूज, कराड, मेढा, पाटण व लोणंद या बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्व बाजार समित्यांसाठी मिळून 913 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये सातार्यात 61, वाई 38, कोरेगाव 155, फलटण 121, वडूज 177, कराड 80, जावली 121, पाटण 60 व लोणंद बाजार समितीत 100 अर्ज दाखल झाले होते. अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी या अर्जांची तालुक्याच्या सहायक निबंधक कार्यालयात छाननी करण्यात आली.
उमेदवारी अर्जाला सूचक अनुमोदक नसणे, जात पडताळणी प्रमाणपत्र न जोडणे, आर्थिक दुर्बलच्या निकषात न बसणे, सातबार्यावर नाव नसणे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडणार्यांच्या विकेट या छाननीत पडल्या आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच या इच्छुकांना मैदानातून बाहेर पडावे लागले आहे. अर्ज छानणीत सातारा बाजार समितीत सोसायटी मतदार संघातील 4 व ग्रामपंचायतमधील 2 असे 6 अर्ज बाद झाले. वाईमध्ये सोसायटीमधील 1 व ग्रामपंचायतमधील 4 असे 5 अर्ज बाद झाले आहेत. कोरेगावमध्ये सोसायटीमधील 17, ग्रामपंचायतीमधील 7 असे 24 अर्ज बाद झाले आहेत. फलटणमध्ये सोसायटीमधील 8 व ग्रामपंचायत मतदारसंघातील 4 असे 12 अर्ज बाद झाले. वडूजमध्ये सोसायटीमधील 9 व ग्रामपंचायतमधील 5 असे 14 अर्ज बाद झाले. कराडमध्ये सोसायटीमधील 1 व ग्रामपंचायतमधील 1 असे दोन अर्ज बाद झाले. मेढयामध्ये सोसायटीमधील 14, ग्रामपंचायतीमधील 9 आणि व्यापारी मतदारसंघातील 1 असे 24 अर्ज बाद झाले आहेत. लोणंदमध्ये एक अर्ज बाद झाला असून 5 अर्जांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यावर सुनावणी होवून निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. पाटण बाजार समितीमध्ये एकही अर्ज अवैध ठरला नाही. अर्ज छाननीनंतर 9 बाजार समित्यांच्या सोसायटी मतदारसंघासाठी 507, ग्रामपंचायत मतदारसंघासाठी 214, व्यापारी मतदारसंघासाठी 70 आणि हमाल-मापाडी मतदारसंघासाठी 29 अर्ज शिल्लक राहिले आहेत.







