- Marathi News
- Opinion
- Divya Marathi Rasik Purvani Samkal Likhan By Mahendra Kadam On Magic Of Branded
महेंद्र कदम8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
साधेपणा ही केवळ जीवनशैली नसून समतेच्या दिशेने जाणारी विचारशैली आहे. दिवाळखोरपणाला पायबंद घालत, जगणं समृद्ध करणारा साधेपणा हा एका अर्थाने भारताचा ब्रँड आहे. साधेपणा म्हणजे गरिबी नव्हे. साधेपणा म्हणजे तडजोड नव्हे. साधेपणा म्हणजे बळजोरी नाही. आयुष्याला आकार देत निराशेपासून दूर ठेवणारी ती वृत्ती आहे. विविध संप्रदाय, संतपरंपरा, विचारवंत ते बाबा आमटे यांच्यासारखे थोर समाजसेवक अशी मोठी परंपरा साधेपणाच्या ब्रँडच्या रूपाने आजही आपल्याला दिशा दाखवते आहे.
मला आजही आठवते, गावाकडच्या प्रत्येक घरात एकाच ताग्यातलं कापड घेऊन टेलरकडे बेतून सगळ्यांना सारखे कपडे शिवले जायचे. त्यात श्रीमंत – गरीब दोघंही असायची. एकाला हलकी आणि दुसऱ्याला भारी असं चित्र नव्हतं. शर्ट, धोतर अथवा नवी साडी आणली, तर त्याच्या नवेपणाची घडी मोडण्यासाठी शेजाऱ्यापाजाऱ्याला घालायला दिली जायची. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात कुणीही कुणाचे कपडे घालायचे. यातून एक सहानुभाव निर्माण व्हायचा. माणसं माणुसकीचं अंथरुण घालत जायची. त्या काळातही दारिद्र्य होते. दातावर मारायला पैसा नसायचा, तरी माणसं एकमेकांना धरून असायची. आपल्याला काही मिळत नाही, हा भाव नसायचा. तडजोडीत आनंद असायचा. अलीकडं हे चित्र राहिलं नाही. श्रीमंत आणि गरीब अशी दरी वाढत जाताना दोन्ही वर्गातून साधेपणा हद्दपार होत चालला आहे.
एकीकडं प्रचंड दारिद्र्य, तर दुसरीकडं ब्रँडेड, मॉल संस्कृती असा दोन टप्प्यांत आजचा भारत विभागला गेला आहे. एकीकडे आत्महत्या, तर दुसरीकडं समृद्ध हैदोस, एकीकडं मुलांच्या लग्नाचा प्रश्न, तर दुसरीकडं जबाबदारी नको म्हणून मुलंच नकोत, एकीकड प्रचंड बकालपण, तर दुसरीकडं संपन्नता असं विरोधाभासाचं संस्कृतिचित्र आहे. भारत प्रारंभापासून राजेशाही आणि साधेशाही अशा दोन पातळ्यांवर वावरत, विकसित होत होता तेव्हा राजेशाहीने आपापली संस्थाने जपताना, ती वाढवताना साधेपणाला शक्य तितका हात देण्याची काळजी घेतली. नाथ, महानुभाव, वारकरी आदी संप्रदाय हे साधेपण जपत आले. त्यांनी दैनंदिन गरजा कमी करून समृद्ध जगण्याचा मार्ग दाखवला. हजारो वर्षांची परंपरा असणारी वारी साध्या राहणीमानाचा, कमी गरजांचा आणि समानतेच्या तत्त्वज्ञानाचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. दोन कपड्यांचे जोड, एक सतरंजी, चादर, पावसात भिजू नये म्हणून प्लास्टिकचा कागद, ताट – वाटी आणि पाण्याची बाटली अशा एका पिशवीतल्या संसारावर वारकऱ्यांची महिनाभराची शेकडो किलोमीटरची पायी वारी पूर्ण होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे सूत्र अंगीकारून महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना, एक नवी दिशाही दिली होती. त्याचे प्रतीक म्हणून आजही आपल्या देशाचे नेते चरखा चालवताना दिसतात.
राजेशाही, ब्रँडेड भारतात मात्र आज प्रचंड विषमता आली आहे. प्रत्येकाला ब्रँडेड वस्तू हवी आहे आणि त्याला ब्रँडेड व्हायचीही घाई झाली आहे. त्यासाठी तो सगळी मूल्ये पायदळी तुडवतो आहे. आपल्याला हवा तो ब्रँड मिळायला हवा, यासाठी कॉलेजात पोरं चोऱ्या करायला लागली. एकमेकांचे अपहरण करू लागली. ही चंगळवादी संस्कृती बदलण्याची कुणाचीच मानसिकता नाही. त्यामुळं डुप्लिकेट वस्तूतही ‘ब्रँड’ आलेला आहे. वापरून फेकून द्या, हे तत्त्वज्ञान प्रभावी ठरू लागले आहे. ब्रँडच्या नावाखाली अनावश्यक वस्तूंचा भरणा होऊन घराचे घरपण संपत चालले आहे. मूलभूत गरजांपेक्षा चैनीच्या आणि टिकावू नव्हे, तर टाकावू वस्तूंच्या खरेदीकडे कल वाढला आहे.
एकदा वर्षभरातच मोबाइल हँग व्हायला लागला म्हणून मी शोरूमला गेलो, तेव्हा तो दुकानमालक म्हणाला, ‘तुम्हाला फोर जी हवं तर मोबाइल बिघडणाच. बिघडल्याशिवाय नवा कसा घेणार? कंपनीचा फायदा कसा होणार? नोकियानं हा विचार केला नाही म्हणून ती मागं पडली..’ हे प्रातिनिधिक चित्र आहे. थोड्या काळातच वस्तूंचे सुटे भाग बंद करून, ती वस्तू टाकून देवून नवा ब्रँड घ्यायला भाग पाडतात. यातून एक नवी मानसिक विषमता जन्माला आली आहे. याला आपण बळी पडत चालल्याने कुटुंबसंस्था मोडकळीस आली आहे.
या सगळ्यांतून मानसिक बकालपणाची बेफिकिरी जन्मली. जपण्याचा विचार करायचा नाही. नव्या ब्रँडसाठी जुन्याची हेळसांड करणाऱ्या नव्या पिढीचे विस्कळीतपणा हे तत्त्वज्ञान बनले आहे. त्यांना आज समतेचा आणि साधेपणाचा आग्रह धरणारे मार्क्स, म. गांधी नको आहेत. परंतु, या ब्रँडेड बकालपणाची निर्थकता लक्षात येईल, तेव्हा एक वर्तुळ पूर्ण होऊन साधेपणा आणि समानतेच्या रूपात असणाऱ्या, शाश्वत अशा ब्रॅण्डेड मार्क्स – गांधी विचारांकडेच आपल्याला परत जावे लागेल.
(संपर्क- mahendrakadam27@gmail.com)




