महेंद्र कदम24 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
जगातील सगळ्या धर्मांकडून आणि पुरुषसत्तेकडून कमी – अधिक प्रमाणात स्त्रियांचे शोषण होत आले आहे. त्याचे कारण स्त्री ही स्वयंभू होती. तिची स्वतंत्र संस्कृती आणि जीवनशैली होती. जगभर तिच्या या संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही दिसतात. विविध आदिवासी समाजांमध्ये स्त्रियांना असलेले स्वातंत्र्य, त्यांच्यातील समानतेचे तत्त्व आजही महत्त्वाचे आहे. या संस्कृतीवर नंतर पुरुषांनी आपला ताबा मिळवून त्यास धर्माचे रूप देताना, तिला दुय्यम स्थान दिले. देव-धर्म, रुढी- प्रथांच्या नावाने प्रचंड शोषण केले. तिला सगळ्या प्रकारच्या कोंदणात बसवून अधिकाधिक गुलाम करण्याचा डाव गेली हजारो वर्षे जागतिक पातळीवर सुरू आहे.
अगदी अमेरिकेच्या भूतपूर्व अध्यक्षांपासून ते आपल्यातील तथाकथित प्रतिष्ठितांपर्यंत अनेक जण तिचा केवळ भोगवस्तू म्हणून उच्चार करीत आले आहेत. युद्धात, दंगलीत, जातीय लढ्यात तिचा वापर केला जातो. बलात्कार, खून करून खच्चीकरण केले जाते. असे असले, तरी ती मोडून पडत नाही, ठामपणे उभी राहते. आजही विविध प्रथा, उत्सव अथवा लोकपरंपरा यांच्या माध्यमातून तिने तिची स्वतंत्र वृत्ती जपून ठेवली आहे. आराध्याची गाणी, स्त्रियांच्या उत्सवातील विधी, तमाशा, भारुड आदी विविध प्रकारांत त्या मुक्तपणे व्यक्त होतात. त्यातून देवाचे, राजाचे थेट मानुषीकरण करून त्यातली भीती काढून टाकतात.
तमाशातील मावशी कृष्णाला सामान्य माणसाचे रुप देते. अनेक स्त्रीगीतांतून ती देव, राजा, नवरा, सासर यांचे शोषण किती वाईट आहे, हे मुक्तपणे सांगते तेव्हा तिच्या अभिव्यक्तीला विद्रोहाची आणि समानतेच्या मागणीची धार आलेली असते. भलेही या विधींना धर्माचे रूप असले, तरी मुक्तीचा आनंद घेवून त्या जगण्याचा प्रयत्न करीत असतात.
जसे की, ‘नवरा हा उशाखालचा नाग आहे, त्याच्या तोंडी विष आहे’ अथवा ‘नवरा म्हणू नये आपला आणि साप म्हणू नये धाकला’ असं स्त्री म्हणते तेव्हा त्यातून वेदना, विद्रोह व्यक्त झालेला असतो. देवीच्या भक्त होऊन अनेक स्त्रिया मुक्तीच्या वाटेने जात असतात. म्हणून तर त्यांच्या परंपरेत नद्यांना पती नसला, तरी त्या सुवासिनी मानल्या जातात.
या सगळ्यांना जुनं म्हणून फेकून देताना आणि तथाकथित आधुनिकपण स्वीकारत जाताना आपण काय हरवून बसलो आहोत, कुठे जाणार आहोत, हे आजच्या स्त्रीने समजून घेणे गरजेचे आहे. सिनेमाचे, जाहिरातीचे अथवा कोणत्याही सार्वजनिक उपक्रमाचे क्षेत्र घेतलं, तर काय दिसतं? प्रत्येक सिनेमात, जाहिरातीत स्त्री केवळ देखणी आणि हिरो नावाच्या बलदंड पराक्रमी पुरुषाला मोहित करण्यासाठीच आलेली असते. आकर्षक आणि भोग्य वस्तू म्हणूनच तिचे प्रदर्शन केले जाते. बाकी तिच्या उपजत शहाणपणाचा आणि विद्रोहाचा फारसा वापर केला जात नाही. पुरुषी मानसिकता येथे सतत कार्यरत असते. सौंदर्य हा स्त्रीचा पराक्रम आहे, असे बिंबवले जाते.
तिच्या या प्रकारच्या सादरीकरणाला आपण स्वातंत्र्य, आर्थिक उन्नती, समानता, स्त्री- सक्षमता असेही म्हणू शकतो. तरीही तिला ज्या पद्धतीने दुय्यमत्व दिले जाते, ते लक्षात घेता आजच्या स्त्रीने अधिक जागरूक होणे गरजेचे आहे. गुंथर सोंथायमर म्हणतात, ‘लोकधर्म स्वत:च्या आचाराचे स्पष्टीकरण देत नसतो. तो जगला जातो. तो कृतीत असतो. मात्र, हा लोकधर्म सत्ताधीशांना, धर्म- जातीच्या ठेकेदारांना अडचणीत आणतो, तेव्हा त्याला लिखित रूप देताना सोयीने बदल केले जातात. ते थेट कधी धर्माच्या नावाने, कधी मुलामा देऊन सुबक कोंदणात सादर केले जातात. भारतीय परंपरेत तर हे नेहमीच केले गेले आहे. तिला गुलाम केले की, अनेक गोष्टी साध्य करता येतात. अशावेळी मंगेश डबराल यांच्या ओळी आठवतात…
प्रेम करती स्त्री ठगी जाती है रोज़
उसे पता नहीं चलता बाहर क्या हो रहा है
कौन ठग रहा है, कौन है खलनायक
पता नहीं चलता कहाँ से शुरू हुई कहानी
दुनिया को समझती है वह
गोद में बैठा हुआ बच्चा
निकल जाती है अकेली सड़क पर
देखती है कितना बड़ा फैला शहर
सोचती है मैं रह लूँगी यहाँ कहीं।
त्यामुळे स्त्री सार्वजनिक जीवनात अग्रेसर झाली असली, तरी तिला सावध पावले टाकण्याची गरज आहे.
संपर्कः mahendrakadam27@gmail.com





