[ad_1]
आदूबाळ3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
विकास स्वरुप
पूर्णवेळ लेखक जगात एकंदर कमीच असतात. किंबहुना कित्येकदा लेखनाशिवाय अन्य कोणत्या तरी व्यवसायात मुरलेले लोक लिहायला लागतात, तेव्हा त्यांच्या लेखनाला निराळीच लज्जत येते. इंग्रजीत जॉन ग्रिशम हे एक असं नाव आहे. ते मूळचे वकील. वयाच्या चाळीशीत कादंबरी लिहायला लागले आणि आज ‘लीगल थ्रिलर्स’चे (वकिली व्यवसायावर आधारित रोमहर्षक कादंबऱ्या) प्रथितयश लेखक आहेत. भारतीय साहित्यातही अशी अनेक उदाहरणं आहेत.
भारतातील एक मोठा वर्ग म्हणजे सनदी अधिकाऱ्यांचा. रसाळ शैलीत लिहिणारे विश्वास पाटलांसारखे लेखक मराठीत आहेत. इंग्रजीत लिहिणाऱ्या भारतीय लेखकांमध्ये शशी थरूर, उपमन्यू चटर्जी अशी अनेक नावं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे विकास स्वरूप. विकास स्वरूप यांची आणखी एक ओळख आहे. ‘स्लमडॉग मिलिअनेअर’ हा ऑस्करविजेता चित्रपट ज्या कादंबरीवर बेतला होता, ती मूळ कादंबरी विकास स्वरूप यांची आहे!
अतिशय मनोवेधक, वाचकांना बांधून ठेवणारी कथानके हे स्वरूप यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. अशा या तरबेज कथाकाराचा जन्म १९६३ मध्ये अलाहाबादेत (सध्याचं प्रयागराज) झाला. पेशाने ते नोकरशहा आहेत – भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Service) या अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या सनदी सेवेत ते आहेत. या सेवेतील स्वरूप यांची सफर १९८६ मध्ये, म्हणजे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी सुरू झाली. परराष्ट्र सेवा म्हणजे भारताचे वेगवेगळ्या देशांत असणारे संबंध सुदृढ करण्यासाठी तेथे असणारे दूतावास सांभाळणारी सेवा आहे. या सेवेतील अधिकारी मुत्सद्दी (Diplomat) असतात. आपल्या सेवाकाळात स्वरूप हे अमेरिका, इंग्लंड, तुर्कस्तान, जपान अशा देशांमध्ये राजदूतपदी नेमले गेले होते. कुशाग्र बुद्धिमत्ता, मानवी स्वभावाचं सूक्ष्म आकलन, अनेक परकीय भाषांमध्ये प्रावीण्य आणि विविध संस्कृतींशी घनिष्ठ परिचय हा राजदूताच्या कामाचा भाग असतो. या सर्वांचा स्वरूप यांच्या लेखनावर प्रभाव पडला.
स्वरूप यांची पहिली कादंबरी ‘क्यू अँड ए’ २००५ मध्ये प्रकाशित झाली. ‘स्लमडॉग मिलिअनेअर’ याच कादंबरीवर आधारित होता. याचा नायक आहे ‘राम मोहम्मद थॉमस’ नावाचा एक अल्पशिक्षित तरुण वेटर. तो ‘कौन बनेगा करोडपती’सारखा एक ‘क्विझ शो’ जिंकतो आणि लगोलग त्याच्यावर लबाडी करून जिंकल्याचे आरोप होतात. पण, आपल्या आयुष्यात घडलेल्या विविध घटनांमधून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळत गेली, हे राम सांगत जातो. नियतीवर विश्वास आणि चिवटपणा या अगदी खास ‘भारतीय’ मूल्यांबद्दल ही कादंबरी भाष्य करते. चमकदार कथानकाच्या माध्यमातून ती ‘माणुसकी’ या मूलभूत मूल्याची मांडणी करते.
स्वरूप यांची दुसरी कादंबरी “सिक्स सस्पेक्ट्स’ २००८ मध्ये प्रकाशित झाली. वरकरणी ही एक खून – तपास – कथा आहे. एका मोठ्या राजकारण्याच्या रंगेल मुलाचा खून होतो. सहा आरोपींना अटक करतात. सहाही जणांकडे पिस्तूल सापडतं. मग स्वरूप एकेक आरोपीच्या भूतकाळात शिरतात. आरोपी आणि खून झालेल्या व्यक्तीच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकतात. त्याला खून का करावासा वाटला असेल, तशी संधी होती का, याचा शोध घेतात. समकालीन भारतात अगदी खोलवर, हाडांपर्यंत मुरलेल्या सामाजिक विषमतेवर आणि भ्रष्टाचारावर केलेली ही करकरीत टिप्पणी आहे.
स्वरूप यांची तिसरी कादंबरी ‘द अॅक्सिडेंटल अप्रेंटिस’ २०१३ मध्ये प्रकाशित झाली. सपना सिन्हा ही त्या कादंबरीची नायिका दिल्लीतील एका इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या शो रूममध्ये काम करणारी एक सामान्य विक्रेती असते. तिच्या आयुष्याला अचानक एक जबरदस्त कलाटणी मिळते. भारतातील एक अग्रगण्य उद्योगपती तिला आपल्या उद्योग समूहाची सीईओ बनण्याची ऑफर देतो. अट एकच असते – त्या उद्योगपतीने स्वतः निर्माण केलेल्या सात परीक्षा पास करायच्या. त्या ‘जीवनाच्या पुस्तका’वर आधारित असणार म्हणे! स्वरूप यांच्या अगोदरच्या कादंबऱ्यांसारख्याच याही कादंबरीत कथानकाची अनपेक्षित वळणं, रोमहर्षक कलाटण्या आहेत. पण, अंतस्थ सूर आयुष्याच्या (आणि पर्यायाने मानवाच्या) क्षणभंगूरतेवर भाष्य करण्याचा आहे.
स्वरूप यांच्या लेखनाची तुलना समीक्षकांनी चार्ल्स डिकन्स आणि रोहिंग्टन मिस्त्री यांच्याशी केली आहे. प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देत यश ओढून आणणारे नायक – नायिका हा या तिघांच्या लिखाणातील समान धागा म्हणायला हवा. पण, ही तुलना अर्थातच अपूर्ण आहे. स्वरूप भारतीय कथानके लिहीत असले, तरी त्यांच्या पेशामुळे त्यांनी पाहिलेले मानवी अनुभव, कहाण्या आणि सामाजिक – राजकीय पटांचा प्रभाव त्यांच्या लेखनावर आहे. ‘द अॅक्सिडेंटल अप्रेंटिस’नंतर स्वरूप यांची कादंबरी प्रकाशित झालेली नाही. २०१५ पासून ते भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून काम करत होते. कदाचित या अत्यंत महत्त्वाच्या पदामुळे त्यांना लेखनाला वेळ मिळत नसेल. २०२१ मध्ये ते निवृत्त झाले. आता ते लेखनाला वेळ देऊन नवी कादंबरी लिहितील, अशी आशा माझ्यासारख्या अनेक चाहत्यांच्या मनात आहे. तसंच होवो!
संपर्कः aadubaal@gmail.com
[ad_2]
Source link
