
SEBI Warns Investors On Gold: ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि अॅप्स सोन्यात गुंतवणूक करण्यास ‘डिजिटल गोल्ड’ किंवा ‘ई-गोल्ड’ हा एक सोपा पर्याय म्हणून देत आहेत. पण याबाबत आता सावधगिरीचा इशारा दिला जात आहे. डिजिटल गोल्ड उत्पादनांचे नियमन सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे केले जात नाही. यामुळे संपूर्ण क्षेत्रात धोका अधिक आहे.
…म्हणून सावध राहण्याची गरज
डिजिटल सोन्यातील यूपीआयद्वारे गुंतवणूक 100% पेक्षा जास्त वाढली आहे. अनेक कंपन्या 99.9% शुद्धता असलेले सोने तिजोरीत साठवल्याचे दावे करतात, परंतु या दाव्यांचे ऑडिट केले जात नाही आणि गुंतवणूकदारांना सोने प्रत्यक्षात त्यांच्या नावाने खरेदी केले गेले आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही कागदपत्रं मिळत नाही. जर प्लॅटफॉर्म बंद झाले किंवा दिवाळखोर झाले तर गुंतवणूकदारांचे पैसे बुडू शकतात, असा इशारा सेबीकडून देण्यात आला आहे.
डिजिटल सोने म्हणजे काय?
डिजिटल सोने (Digital Gold) म्हणजे प्रत्यक्ष सोन्याची मालकी न घेता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोने खरेदी करण्याचा, साठवण्याचा आणि विक्री करण्याचा एक आधुनिक आणि सोयीस्कर मार्ग आहे, असं सोप्या भाषेत सांगता येईल. या प्रक्रियेमध्ये, ग्राहकांकडून खरेदी केलेल्या सोन्याच्या प्रमाणात (ग्रॅममध्ये) वास्तविक (भौतिक) सोने सुरक्षित व्हॉल्टमध्ये (vault) किंवा तिजोरीत साठवले जाते.
डिजिटल सोन्याची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे काय सांगितली जातात?
सुरक्षितता: प्रत्यक्ष सोने घरी ठेवल्याने चोरीची किंवा नुकसानीची भीती असते. डिजिटल सोन्यामध्ये, ग्राहकांचे सोने व्यावसायिक तिजोरीत पूर्ण विम्यासह सुरक्षित ठेवले जाते.
लवचिकता: ग्राहकांच्या गरजेनुसार अगदी कमी प्रमाणातही (उदाहरण: 0.5 ग्रॅम किंवा एक हजार रुपये किंमत) सोने खरेदी करू शकता.
पारदर्शकता: खरेदी-विक्रीचे दर बाजारातील सोन्याच्या सध्याच्या किमतीशी जोडलेले असतात, ज्यामुळे व्यवहारात पूर्ण पारदर्शकता राहते.
तरलता: डिजिटल सोने ग्राहक कधीही, कुठेही सहजपणे विकू शकता आणि त्याचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात मिळवू शकता.
भौतिक वितरणाचा पर्याय: काही प्रोव्हायडर ग्राहकांच्या गरजेनुसार जमा झालेले डिजिटल सोने प्रत्यक्ष सोन्याच्या नाण्यांच्या किंवा बारच्या स्वरूपात घरपोच मिळवण्याचा पर्याय देतात.
हे व्यवहार कोणत्या प्लॅटफॉर्मवरुन होतात?
हे व्यवहार सामान्यतः MMTC-PAMP (सरकारी आणि स्विस भागीदारी) किंवा ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑल (SafeGold) सारख्या प्रतिष्ठित प्लॅटफॉर्मद्वारे केले जातात. अनेक वित्तीय ॲप्स, पेमेंट वॉलेट्स (उदा. Google Pay, PhonePe) आणि ब्रोकरेज कंपन्या या सेवा देतात.
(टीप – ही महिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)








