माझ्या हिश्श्याचे किस्से: कैफ भोपालींची कमाल अमरोहींशी होती घनिष्ट मैत्री, केवळ त्यांच्या सिनेमांसाठीच लिहायचे गाणी

0
24
माझ्या हिश्श्याचे किस्से:  कैफ भोपालींची कमाल अमरोहींशी होती घनिष्ट मैत्री, केवळ त्यांच्या सिनेमांसाठीच लिहायचे गाणी


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी मी कमर जलालाबादी आणि आनंद बक्षी यांच्याविषयी लिहिले होते. त्यानंतर अनेकांनी मेसेज, मेलद्वारे तसेच व्यक्तिगत चर्चेतून, तुम्ही इतर गीतकारांबद्दलही लिहा, असे मला सुचवले. त्यामुळे मी विचार केला की, आपल्याच भोपाळ शहरातील उत्तम कवी, गीतकार आणि ‘चलो दिलदार चलो, चाँद के पार चलो..’ यासारखी अविस्मरणीय गाणी लिहिणाऱ्या कैफ भोपाली यांच्यापासूनच त्याची सुरूवात करावी.

मला आठवतंय, जेव्हा मी सुभाष घईजींचे सासरे अख्तर फारूखी साहेबांना भेटलो आणि त्यांना मी भोपाळचा आहे, असे सांगितले तेव्हा ते उभे राहिले अन् मला मिठी मारली. म्हणाले, ‘तू माझे प्रिय मित्र, शायर कैफ भोपाली यांच्या गावचा आहेस!’ त्यांनी मला पुढे सांगितले की, मी कमाल अमरोही साहेबांकडे प्रॉडक्शनमध्ये काम करायचो. कैफ साहेब गाणी लिहिण्यासाठी भोपाळहून यायचे, तेव्हा तिथे माझी ड्यूटी लागायची.

कमाल साहेब म्हणायचे, अख्तर, तू दुसरे कोणतेही काम करु नकोस. ऑफिस, स्टुडिओ सगळे विसरून जा. तुला फक्त एकच काम करायचेय, ते म्हणजे कैफ साहेबांची बडदास्त ठेवणे. त्यांच्यासाठी जेवणाची उत्तम व्यवस्था कर. रात्री त्यांना चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जा. बस, फक्त त्यांना खूश ठेव. कारण कैफ साहेब मनमौजी स्वभावाचे होते आणि ते केवळ कमाल अमरोहींसाठीच गाणी लिहायचे.

माझी कैफ साहेबांसोबत चांगली मैत्री आहे, हे इंडस्ट्रीतील लोकांना समजल्यावर शंकर जयकिशन, मदन मोहन, सलिल चौधरी, अनिल विश्वास, बी. आर. चोप्रा, यश आनंद, रामानंद सागर असे त्यावेळचे मोठमोठे दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक मला म्हणायचे की, कैफ साहेबांसोबत आमची भेट घालून द्या, आम्हाला त्यांच्याकडून गाणी लिहून घ्यायची आहेत. पण, कैफ साहेब स्पष्ट नकार द्यायचे. ते म्हणायचे की, सिनेमांची गाणी लिहिणे हे माझे काम नाही. मी शायर आहे आणि कमाल माझा मित्र आहे, म्हणून फक्त त्याच्यासाठी गाणी लिहून देतो.

कमाल अमरोहींना कैफ साहेब अनेकदा थट्टेने म्हणायचे की, तू आपले नाव चुकीच्या पद्धतीने लिहितोस. तुझे नाव असायला पाहिजे कमाल अमरोहवी आणि लिहितो मात्र अमरोही. त्यावर कमाल साहेब हसून उत्तर द्यायचे, मी नेहमी काही तरी वेगळे करतो. त्यामुळे आपले नावही वेगळ्या पद्धतीनेच लिहितो.

अख्तर साहेबांनी मला सांगितले की, मद्य किंवा मद्यपींना कुणी नावे ठेवली तर कैफ साहेबांना वाईट वाटायचे. एकेदिवशी सायंकाळी काम संपले, अंधार पडू लागला होता. आम्ही सगळे परत निघण्यासाठी कमाल स्टुडिओच्या गेटवर उभे होतो. त्याचवेळी तिथे मळलेले, फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अशा अवतारातील एक भिकारी आला. तो थेट कमाल साहेब आणि कैफ साहेबांजवळ आला. त्यांच्याकडे पाहून म्हणाला, ‘साहेब, खायला काही नाही. जेवायला थोडे पैसे द्या.’ तो हे बोलला आणि त्याचवेळी त्याच्या तोंडातून देशी दारुचा खूप घाण भपकारा आला.

कमाल साहेब त्याला फटकारत म्हणाले, ‘तुझ्याकडे खायला पैसे नाहीत, पण दारु प्यायला मात्र आहेत. दारुडा कुठला. चल, जा इथून.’ हे ऐकून कैफ साहेबांना वाईट वाटले आणि त्यांनी त्याचवेळी एक शेर ऐकवला…

शाइस्तगान-ए-शहर

मुझे ख्वाह कुछ कहें,

सड़कों का हुस्न है

मिरी आवारगी के साथ।

ही १९९१ मधली गोष्ट आहे. माझी लिखाणाची सुरूवात होत होती. साजिद नाडियादवालासाठी मी ‘चांद चकोरी’ नावाची एक प्रेमकहाणी लिहित होतो. मी साजिदला सांगितले की, आपण कैफ साहेबांकडून गाणी लिहून घेऊ. त्यानेही होकार दिला. त्यावेळी तिथेच असलेले लेखक फैज साहेब म्हणाले की, कैफ साहेब तर कमाल अमरोहींशिवाय कुणासाठीही गाणी लिहित नाहीत. मी म्हणालो की, मीसुद्धा भोपाळी आहे, त्यांना लिहिण्यासाठी राजी करेन. मी भोपाळला जाणारच आहे, त्यांचा होकार घेऊनच परत येईन.

मी भोपाळला पोहोचलो. एअरपोर्टवरून घरी पोहोचलो. समोर टेबलावर वृत्तपत्र ठेवले होते. त्याच्या पहिल्या पानावर कैफ भोपाली यांचा तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्यासोबतचा फोटो छापला होता. कैफ भोपालींची तब्येत अत्यंत गंभीर असल्याची बातमी होती. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते. तो फोटो पाहिल्यावर मला खूप दु:ख झाले. त्यांची प्रकृती सुधारावी, म्हणून मी प्रार्थना केली. सायंकाळी रेडिओ स्टेशनवर ऑल इंडिया मुशायरा होता.

मी तिथे पोहोचलो. त्या ठिकाणी मोठमोठे शायर आले होते. शेरी भोपाली मुशायऱ्याचे संचालन करत होते. अचानक काही हालचाल सुरू झाली. पाहिले तर कैफ साहेबांना तिथे आणण्यात आले होते. मी थक्क झालो. त्यांना तीन-चार तक्क्यांचा आधार देऊन बसवण्यात आले. त्यांचे वजन खूपच कमी झालेले होते. शेरी साहेब म्हणाले, ‘हा कैफ वयाने माझ्यापेक्षा खूप लहान आहे. आपण सगळे त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करु. मी खूप जगलोय, आता याला जगायचंय आणि खूप उत्तमोत्तम शेर ऐकवायचेत..’

तिथे असलेल्या सर्वांना वाटत होते की, कैफ साहेब या अशा आजारी अवस्थेत कसे काय शेर सादर करणार? पण, कैफ साहेबांच्या समोर माइक ठेवण्यात आला आणि त्यांनी शायरी एेकवत अशी मैफिल रंगवली की ते आजारी आहेत हेही लोक विसरुन गेले. लोक फर्माइशवर फर्माईश करत होते आणि कैफ साहेब गझला, शेर ऐकवतच होते. मला वाटते तो कैफ साहेबांचा अखेरचा मुशायरा होता. ते या जगातून निघून गेले, पण त्यांचे शब्द चिरंतन आहेत. त्यांची कन्या परवीन कैफ ही खूप उत्तम शायरा आहे. ती कैफ साहेबांचे नाव आणि काम पुढे नेत आहे. कैफ भोपालींच्या आठवणीत ‘शंकर हुसैन’ सिनेमातील हे गाणे ऐका…

अपने आप रातों में

चिलमनें सरकती हैं

चौंकते हैं दरवाजें

सीढ़ियां धड़कती हैं…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link