माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा तुषार कपूरने चित्रपटाचे पैसे घ्यायला नकार दिला होता…

0
24
माझ्या हिश्श्याचे किस्से: जेव्हा तुषार कपूरने चित्रपटाचे पैसे घ्यायला नकार दिला होता…


  • Marathi News
  • Opinion
  • When Tusshar Kapoor Refused To Accept The Film Money… | Divya Marathi Rumi Jaffrey Article On Actor Tusshar Kapoor

रूमी जाफरी13 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘मुझे कुछ कहना है’ चित्रपटातील ‘इस प्यार को मैं क्या नाम दूं’ या सुपरहिट गाण्यातील एका दृश्यामध्ये तुषार कपूर. 

जीतूजी म्हणाले, ‘मी दर आठवड्याला हरे रामा हरे कृ ष्णाजवळच्या श्री मुक्तेश्वर मंदिरात जातो. आधी मी जेव्हा जायचो, तेव्हा लोक म्हणायचे, ते बघा जितेंद्र आले.. आज मी मंदिरात जात होतो तेव्हा तिथं काही तरुण मुलं – मुली उभी होती. मला पाहून त्यांच्यात कु जबूज झाली.. ते बघा.. तुषार कपूरचे वडील आलेत!

गेल्या सोमवारी अर्थात २० नोव्हेंबरला तुषार कपूरचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी तुषारला फोन केला, तेव्हा येत्या रविवारी त्याच्याविषयीच लिहावे, असा विचार मनात आला. तर मग आज ‘माझ्या हिश्श्याच्या किश्श्यां’मध्ये तुषार कपूरबद्दल…

१९९१ मध्ये माझ्या ‘रंग’ या चित्रपटाचे काम सुरू होते. त्यामध्ये जीतूजी अर्थात जितेंद्र देखील होते. जीतूजींंना मी सिनेमाची कथा ऐकवायला गेलो, तेव्हापासूनच त्यांना माझ्याविषयी विशेष स्नेह वाटू लागला. त्यावेळी जुहूमधील त्यांचे नवे घर नुकतेच पूर्ण झाले होते. मला आणि त्यांना वेळ असेल, तेव्हा मी त्यांच्या घरी जात असे. बहुतेक वेळा रात्री गप्पागोष्टी आणि जेवण झाल्यावर घरी परतण्यासाठी मला तिथून रिक्षा मिळत नसे. त्यावेळी त्यांचा ड्रायव्हर शंकर मला गाडीतून घरी सोडत असे. त्यावेळी एकता व तुषार दोघेही लहान होते आणि मला रूमी अंकल म्हणून हाक मारायचे. तुषार लहानपणापासूनच थोडासा इंट्रोव्हर्ट, काहीसा लाजाळू होता, तर एकता मात्र खूप स्मार्ट होती. ही गोष्ट साधारण १९९९ ची असावी. एक दिवस मला जीतूजींचा फोन आला की, तुषार लंडनहून शिक्षण पूर्ण करून परतला आहे. आता त्याला तू डेव्हिडचा असिस्टंट म्हणून कामाला लावून दे. मी डेव्हिड साहेबांशी बोललो तर त्यांनी नकार दिला. ते म्हणाले, सध्या माझ्याकडे असिस्टंट आहेत. कुणी सोडून गेला तर त्याला लावून घेऊ. काही दिवसांनी जीतूजींंचा मला पुन्हा फोन आला. मी डेव्हिड साहेबांना म्हणालो की, तुम्हाला माहितीय, माझे आणि जीतूजींंचे किती घनिष्ठ संबंध आहेत.. तुम्ही प्लीज तुषारला हाताखाली ठेवून घ्या. हवं तर त्याला आऊटडोअरला नेऊ नका, पगारही देऊ नका. पण मुंबईतील शूटिंगला हजर राहू द्या.. त्यानंतर डेव्हिड साहेबांनी होकार दिला आणि तुषार शूटिंगच्या ठिकाणी जाऊ लागला.

डेव्हिड साहेबांकडे सगळे असिस्टंट तुषारपेक्षा सीनियर होते आणि तुषार ‘स्टारकिड’ असल्यामुळे सगळे जणू रॅगिंग करायचे. त्यामुळे मी डेव्हिड साहेबांचा असिस्टंट असलेल्या माझ्या छोट्या भावाला – जामी जाफरीला, नेहमी तुषारला आपल्यासोबत ठेवत जा, असे सांगितले. एक दिवस आम्ही ‘चल मेरे भाई’चे शूटिंग करत होतो. पॅकअप झाल्यावर मी गाडीत बसून जायला निघालो तेव्हा दिसले की, एकट्याला गाडी चालवत जावं लागेल म्हणून तुषार आपल्यासोबत येण्यासाठी प्रत्येकाला विनंती करत होता. मी तुषारला म्हणालो, चल, मी येतो तुझ्यासोबत. मी ड्रायव्हरला गाडी आमच्या मागे घ्यायला सांगितली आणि मी तुषारच्या शेजारी बसलो. तो ड्रायव्हिंग करू लागला आणि मी त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. मी त्याला विचारलं, तू एवढं चांगलं शिक्षण घेऊन आला आहेस, आता पुढं काय करायचा विचार आहे? तुषार म्हणाला, काही दिवस दिग्दर्शन आणि निर्मिती शिकून घेईन, मग एकतासोबत काम करेन. मी म्हणालो, सगळ्या हीरोंची मुले हीरोच बनतात, तुला हीरो व्हावं, इतर हीरोंच्या मुलासारखा अभिनय करावा, असं वाटत नाही का? तुषार थोडा लाजला अन् म्हणाला, ‘आयुष्यात तशी संधी मिळाली, तर प्रयत्न नक्की करेन.’ मला आठवतंय, मी त्याच्याशी बोलत होतो तो रमजानचा दिवस होता. आणि माझ्या कुटुंबातील सारे जण घराच्या खाली रस्त्यावर उभे राहून ईदचा चंद्र दिसण्याची प्रतीक्षा करीत होते. तुषारने मला तिथेच, त्यांच्याजवळ उतरवले आणि तो निघून गेला. त्याचवेळी चंद्र दिसला आणि मी दुआँ मागितली.

त्याच दरम्यानची ही गोष्ट आहे. वाशुजी आणि सतीश कौशिक ‘मुझे कुछ कहना है’ नावाचा चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. या चित्रपटासाठी आम्ही बॉबी देओलला विचारले होते. पण तो काही उत्तर देत नसल्यामुळे वेळ वाया जात होता. त्यावेळी मी वाशुजींंना फोन केला आणि ‘तुमच्या सिनेमासाठी हीरो मिळाला,’ असं सांगितलं. त्यांनी विचारलं, ‘कोण?’ मी उत्तरलो, ‘तुषार कपूर’. त्यावर ते म्हणाले, ‘हा कोण आहे?’ मग मी त्यांना तुषार हा जीतूजींचा मुलगा असल्याचे सांगितले. वाशुजी म्हणाले, ‘पण जीतूजी त्यांचा मुलगा आपल्याकडं सोपवतील?’ मी म्हणालो, ‘त्यांना विचारून बघायला काय हरकत आहे? त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांना विचारतो.’ त्यावर वाशुजी म्हणाले की, ठीक आहे. मला थोडा विचार करू दे.

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही शूटिंग करत होतो. तुषार माझ्यासमोर उन्हात क्लॅप घेऊन उभा होता. त्यावेळी वाशुजींंचा मला पुन्हा फोन आला. म्हणाले, मी रात्रभर विचार करत होतो. तुषारबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी म्हणालो, आपल्याकडच्या भूमिकेसाठी तुषार एकदम फिट आहे. त्याचा चेहरा खूप बोलका आहे. निरागस, इंट्रोव्हर्ट आहे. आपल्या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी तो अगदी योग्य हीरो आहे, जो चित्रपटाच्या क्लायमॅक्सपर्यंत हिरोईनला ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे,’ हे सांगू शकत नाही. आणि तुम्हीच विचार करा.. तुषार जीतूजींचा मुलगा आहे, कुणी सामान्य मुलगा नाही.

माझे बोलणे ऐकून वाशुजींनी तुषारला भेटायला पाठवा, असे मला सांगितले. मी लगेच माझ्या लहान भावाला- जामीला सांगितले की, शूटिंग संपताच तुषारला वाशुजींकडे भेटण्यासाठी घेऊन जा. पण, संध्याकाळी जामी कामात खूपच गुरफटला आिण टुटू शर्मा जे आमचे मित्र आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचे पती आहेत, त्यांनी तुषार आणि वाशुजींंची भेट घालून दिली. बस. त्यानंतर जो सिनेमा बनला, तो तुम्हा सर्वांसमोर आहेच. ‘मुझे कुछ कहना है’ खूप हिट झाला. मला आठवतेय, हा सिनेमा सुपरहिट झाला, तेव्हा जीतूजींंनी फोन करून मला ‘बालाजी’च्या ऑफिसमध्ये बोलावले होते. मी गेलो त्यावेळी त्यांनी मला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. काय झाले? असे मी विचारल्यावर ते म्हणाले, रूमी, काय सांगू? आज मी इतका खुश आहे की मी मंदिरात जाऊन आलो आणि पहिल्यांदा तुला फोन केला. त्यावर मी पुन्हा विचारले की, पण असं झालंय तरी काय? त्यावर ते म्हणाले, ‘मी दर आठवड्याला हरे रामा हरे कृष्णाजवळच्या श्री मुक्तेश्वर मंदिरात जातो. आधी मी जेव्हा जायचो, तेव्हा लोक म्हणायचे, ते बघा जितेंद्र आले.. आज मी मंदिरात जात होतो तेव्हा तिथं काही तरुण मुलं – मुली उभी होती. मला पाहून त्यांच्यात कुजबूज झाली.. ते बघा.. तुषार कपूरचे वडील आलेत! मी त्याच क्षणी देवाचे आभार मानले. आज लोक मला माझ्या मुलाच्या नावावरून ओळखू लागलेत, याचा मला खूप आनंद झालाय!’ जीतूजींंच्या या शब्दांवरून मला ताहिर शहीर यांचा एक शेर आठवतोय… अज़ीज़ – तर मुझे रखता है वो रग – ऐ जाँ से, ये बात सच है मिरा बाप कम नहीं माँ से। असो. त्यानंतर तुषारने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले. मला आठवतंय, २००८ मध्ये मी ‘लाईफ पार्टनर’ हा सिनेमा तयार करत होतो आणि तुषार कपूरला या सिनेमात घेतले होते. त्यावेळी अब्बास मस्तान यांनी आपल्या सेक्रेटरीमार्फत तुषारला पैशाबद्दल विचारले तेव्हा नकार देत तो म्हणाला, ‘मी या सिनेमाचे पैसे नाही घेऊ शकत, कारण रूमीजी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.’ अब्बास मस्तान म्हणाले की, असे नाही करता येणार, तुम्हाला काहीतरी घ्यावेच लागेल. तेव्हा तुषार म्हणाला की, तुम्हाला जे द्यायचं असेल ते द्या. पण पैशाविषयी ना मी बोलेन, ना माझा सेक्रेटरी… ही असते एका चांगल्या माणसाची ओळख… जो आपल्याला केलेेली मदत लक्षात ठेवतो अन् नातेही निभावतो. तुषारची ही विनयशीलता, ऋजुता मी कधीच विसरू शकणार नाही. आज तुषारची आठवण निघाली आहे म्हणून ‘मुझे कुछ कहना है’ या त्याच्या त्याच्या पहिल्या सिनेमातील अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेले सुपरहिट गाणे… ‘इस प्यार को मैं क्या नाम दूँ..’ अवश्य ऐका. स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा.

(बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक)



Source link