Laser lights banned during Ganeshotsav in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात गणेश उत्सव कालावधीत लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत गणेश मुर्ती आगमन, घरगुती गणेश मुर्ती विसर्जन मिरवणुक तसेच इतर कार्यक्रमादरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने डोळ्याचा पडदा तसेच बुबळाला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून आयोजित मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा शो किंवा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्यये 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईट वापरास प्रतिबंध केला आहे. दुसरीकडे, साताऱ्यातही ज्येष्ठ नागरिकांनी डिजेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. डीजेसह होणारी मिरवणूक ही अंत्ययात्रा असून त्याला काहीही करून बंदी आणावी, अशी मागणी ज्येष्ठ सातारा पोलिसांना निवेदन देत मागणी केली आहे.
उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र
दरम्यान, कोल्हापुरात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. या मिरवणुकांमध्ये गणेश उत्सव मंडळांकडून लेझर, लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणूक बघण्याकरीता आलेल्या भाविकांच्या डोळ्यावर लेझर लाईट पडल्याने व्यक्तींचा डोळ्याचा पडदा तसेच बुबळाला इजा झाल्या होत्या. गणेश उत्सव कालावधीत विसर्जन मिरवणूक तसेच इतर कार्यक्रमा दरम्यान लेझर लाईट डोळ्यावर पडल्यास व्यक्तीच्या डोळ्याचा पडदा तसेच बुबुळाला इजा होवू शकते. यासाठी हा आदेश देण्यात आला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील, असेही या अधिसुचनेत नमुद करण्यात आले आहे.
डॉल्बी, डीजे, लेझर लाईट बंद करण्याची मागणी
दुसरीकडे, सातारा शहराला ‘पेन्शनधारकांचे शहर’ म्हणून ओळखले जाते, कारण तेथे निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने राहतात. काही दिवसांवरच सार्वजनिक उत्सव,मिरवणुकांमध्ये डॉल्बी, डीजे आणि लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि नागरिकांना अनेक समस्या भेडसवु लागल्या आहेत. डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक, हृदयविकारग्रस्त रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे सातारातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉल्बी, डीजे, लेझर लाईट बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी सह पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा