कबीररंग: तन को जोगी सब करै, मन को करै न कोय…

0
17
कबीररंग:  तन को जोगी सब करै, मन को करै न कोय…


हेमकिरण पत्की2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कबीरांची दृष्टी ईश्वरावर परम प्रेम करणाऱ्या संतांची आहे. ही दृष्टी ईश्वरप्रेमाला बाधक ठरणाऱ्या ढोंगी साधूंच्या वृत्तीतील विचार-विखार सजगपणे उघड करून समाजासमोर मांडते आणि त्या पलीकडं जाऊन सर्व जीवमात्रांतील प्राणतत्त्व एक असल्याचंही साधकांना दाखवते. कबीरांचा विशेष असा आहे की, ते साधूंच्या उक्ती आणि कृतीतील, राहणी आणि विचारसरणीतील आणि दृश्य तना-मनातील भेद अत्यंत तीव्रतेनं आपल्या या दोह्यांतून व्यक्त करतात. अशा वेळी भरपिकातील तणाची कापणी करणाऱ्या कोयत्याची धार त्यांच्या शब्दांना येते.

ढोंगी साधूंच्या दांभिकपणाची, खोटेपणाची, मान मिरवण्याच्या वृत्तीची, समाजात अनर्थ निर्माण करणाऱ्या बुद्धीची चीड त्यांच्या शब्दांतून, प्रतिकांतून आणि कथनाच्या रीतीतून आपल्यापर्यंत पोहोचते. आपण जसे नाहीत तसं जाणीवपूर्वक दाखवण्याच्या वृत्तीचा सखोल अभ्यास करून ती दूर सारल्याशिवाय अध्यात्माच्या वाटेवरून कुठलाही साधक चालू शकत नाही, हे कबीरांचं हिताचं सांगणं आहे. ते म्हणतात…

मन मैला तन ऊजरा,

बगुला कपटी अंग।

तासो तो कौवा भला,

तन मन एकहि अंग।।

आपण पाहतो की, बगळ्याचा रंग पांढरा शुभ्र असतो. तळ्यांतल्या एका ओल्या खडकावर निश्चल बसून त्याचं डोळे मिटून चाललेलं ध्यान हे खरं ध्यान नसतं. शांत तळ्यातली एखादी मासळी पाण्याच्या पृष्ठभागावर आली की निमिषार्धात ती चोचीत धरून गिळता यावी, यासाठीच हे त्याचं ध्यानाचं ढोंग असतं.

खऱ्या ध्यानात असं ढोंग नसतं, स्वार्थ साधण्यासाठीचा अभिनय नसतो. बगळा वरून दिसायला पांढरा असला, तरी त्याचा हेतू शुद्ध नसतो. त्याचं मन स्वार्थीपणानं मळलेलं असतं. कबीर म्हणतात, या ढोंगी बगळ्यापेक्षा आत-बाहेरून एकच रंग असलेला कावळा बरा. कारण त्याच्या तना-मनाच्या रंगांत अंतर नसतं. एकाच रंगासारखी त्याची वृत्ती आतून-बाहेरून एकच असते. दोन पक्ष्यांच्या या रंगभेदातून दिसणं आणि असणं यातला फरक कबीर किती परिणामकारकतेनं व्यक्त करतात!

तन को जोगी सब करै,

मन को करै न कोय।

सहजै सब सिधि पाइये,

जो मन जोगी होय।।

कबीर म्हणतात, तथाकथित साधू आपला वेष बदलतात. गळ्यात, मनगटावर रुद्राक्षांच्या माळा घालतात. कपाळावर, दंडावर भस्माचे पट्टे ओढतात. हे या साधूंचं बाह्यदर्शन असतं. ते आपल्या देहाच्या दृश्याकारासाठी स्वतःला क्लेशही करून घेतात. व्रतं, उपवास करतात आणि प्रसंगी कंदमुळं खाऊन राहतात. कमीत कमी सुख-सोयींचा आधार घेऊन देह जगवतात. देहाच्या इच्छा शम-दमानं नियंत्रित करण्यात कधी कधी यश मिळवतात. अशा साधूंना फक्त देहभाव उमजलेला असतो. पण, मनोगती कळली नाही तर भक्तिभाव उमजत नाही, असं मार्मिक सूचन कबीर करतात.

मनोगती कळणाऱ्या साधूंना सर्व सिद्धी प्राप्त होतात, सर्व सुखं लाभतात. पण, त्यासाठी त्यांना एखाद्या योगी पुरूषाची संगती लाभावी लागते. तरच त्यांचं तन आणि मन सहज अनासक्त होऊन जीवन मंगलमय होतं. ढोंगी साधूंच्या जीवनाविषयीची ही निरीक्षणं नोंदवताना, त्यांचे वृत्ती-विशेष कथन करताना साधकानं कोणती काळजी घ्यायची, याबाबत कबीर अत्यंत तळमळीनं सांगतात…

भेष देख मत भूलिये,

बूझि लीजिये ज्ञान।

बिना कसोटी होत नहि,

कंचन की पहचान।।

आपल्या आसपास कितीतरी ढोंगी साधूंचा, स्वघोषित साक्षात्कारी पुरुषांचा, चमत्कारी बाबांचा, संमोहित करणाऱ्या तथाकथित गुरुंचा आणि इंद्रिय सुखांची क्षणजीवी प्रलोभनं दाखवणाऱ्या संधिसाधूंचा वावर आहे. मन भ्रांतीत हरवलं जाऊ शकण्याच्या या काळात आपण खरं साधुत्व कसं शोधणार? त्याचे खरे मापदंड कसे ठरवणार? खूप कठीण आहे हे! कारण आपल्या रोजच्या जगण्यातील व्यथा-वेदनांचा विसर पाडणारा कुणी तथाकथित साधू आपल्याला जवळचा वाटू शकतो. पण, हे वाटणं भ्रामक असू शकतं.

कबीर म्हणतात, आपल्याला आदर्श वाटणाऱ्या अशा साधूंना अनुसरण्यापूर्वी सोन्याप्रमाणेच त्यांची परीक्षा करायला हवी. सोन्याच्या शुद्धतेची पारख करणारं साधन आपल्याला ज्ञात असायला हवं. सोन्याचं वस्तुनिष्ठ मूल्य आपण जाणल्याशिवाय त्याचं धातू असणं त्याचा रंग, भावात्मक मूल्य आणि त्याच्या दागिन्यांची सुंदरता आपल्या दृष्टीला उमजेल कशी? सोनं हा शब्द म्हणजे सोनं नसतं.

कबीरांना सुचवायचंय की, फक्त शब्दांतून संमोहित करणाऱ्या साधूंपासून खऱ्या साधकांनी सदैव सावधान असलं पाहिजे. ही शब्दांपलीकडची सावधानता अनमोल आहे. कारण तीच ‘असत’च्या अनुभवातून ‘सत’चं दर्शन हृदयात पोहोचवणारी आहे.

(संपर्कः hemkiranpatki@gmail.com)



Source link