जागतिक विपश्यनाचार्य महाथेरो भदंत आशिन ओट्टामाथारा यांचा कान्हेरी लेण्यांना ऐतिहासिक भेट

0
1
जागतिक विपश्यनाचार्य महाथेरो भदंत आशिन ओट्टामाथारा यांचा कान्हेरी लेण्यांना ऐतिहासिक भेट

जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य आदरणीय महाथेरो भदंत डॉ. आशिन ओट्टामाथारा (म्यानमार) काल दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी महाराजा महाविहार म्हणजेच मुंबईतील कान्हेरी लेणी पाहण्यासाठी आले होते, प्राचीन काळातील आदरणीय भिक्खू संघ कसे या लेणीतून वास्तव्य करत असत व कशी त्यांची दिनचर्या असायची हे समजून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी अनुभवण्यासाठी आदरणीय भदंतांनी संपूर्ण दिवस लेणीवर व्यतीत केले , आदरणीय भिक्खू संघ लेणीवर फक्त दोन तासच थांबणार आहेत व त्या दोन तासात तुम्हांला संपूर्ण लेणी समजून सांगायची आहे असे आयोजकांकडून सुचित करण्यात आले होते पण प्रत्यक्षात मात्र तसं काही घडलं नाही आदरणीय भिक्खू संघ संपूर्ण दिवसभर लेणी समजून घेत लेणीवरच होते.
गोराई इथल्या ग्लोबल पॅगोडाला भेट देण्याचे पुर्व नियोजित कार्यक्रम आदरणीय महाथेरो भदंत डॉ. आशिन ओट्टामाथारा यांनी रद्द करून लेणीवरच थांबले होते, तीन ठिकाणी ते ध्यान साधनेत रत झाले होते एकदा मुख्य चैत्यगृहात दुसऱ्यांदा लेणी क्रमांक ४१ च्या वर व शेवटी नव्वद क्रमांकाच्या लेणीच्या वरच्या पठारावर.

जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य आदरणीय महाथेरो भदंत डॉ. आशिन ओट्टामाथारा यांचा प्रवेश जेव्हा मुख्य चैत्यगृहात झाला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव धीरगंभीर आभा संथगतीने पडणारी पावले तसेच त्यांच्यावर धरलेली छत्रावली व त्यांच्या मागून चालत येणारा भिक्खू संघ हा सर्व भारावून टाकणारा प्रसंग शब्दबद्ध करण्यास कठीण जात आहे , सांगायचे झाले तर लेणी परिसरातील संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते व काही काळ आम्ही सर्व जण गत काळ हरवून गेलो होतो.

चैत्यगृहात सर्व भिक्खू संघ पठन करण्यासाठी स्तूपाच्या अगदी जवळ बसले होते व चैत्यगृहात बांधलेल्या दोरीच्या बाहेर उपासक वर्ग बसला होता व त्यांच्या मागे शेवटी मी जाऊन बसलो होतो पण आयोजकांकडून सदानंद मोहिते यांनी आवाज देऊन पुढे येऊन बसण्यासा सांगितल्यानंतर पुढे बसलो, गाथांचे पठण झाल्यानंतर तो प्रत्यक्षात प्रसंग येऊन ठाकला होता आता मला आदरणीय महाथेरो भदंत डॉ. आशिन ओट्टामाथारा यांना इंग्रजीतून लेणी समजून सांगायची होती , आदरणीय भदंत महाथेरोंना आधी वंदन केले व गुडघ्यावर बसूनच त्यांना लेणी समजून सांगाण्यास सुरुवात केली त्यांच्या चेहर्‍यावर असलेले सात्विक भाव धीरगंभीर चर्येने काही क्षणांसाठी डगमगलो पण थोडक्यातच स्वतःला सावरलं आणि हरवलेला सूर गवसावे त्याप्रमाणे लेणीचे एक एक पैलूंवर बोलायला सुरुवात केली.
तासाभराचा भोजन दानाचा कार्यक्रम आटोपून प्रमुख लेण्या समजून सांगत जी गोष्ट निरखून बघण्याची इच्छा होई तिथे तिथे भदंत टॉर्च मारून ते बघून घेत होते , कुतूहल जिज्ञासा या सर्व संमिश्र भावना त्यांच्यात तरळत होत्या त्या सर्व मला स्पष्ट जाणवत होत्या , सर्वात शेवटी त्यांना निर्वाण भूमीची माहीती दिली ती पावन भूमी देखील त्यांनी बघण्याची इच्छा प्रदर्शित केली , तिकडे जाण्यास अडचण आहे वैगरे सांगून झाले पण काही उपयोग झाला नाही ते हळू हळू त्या दिशेने त्यांनी चालायला सुरुवात केल्यानंतर मात्र मला पुढाकार घेणे क्रमप्राप्त होते म्हणून सर्वात पुढे लिड करण्यासाठी डोंगर उतरायला सुरुवात केली इकडची बाजू निर्मनुष्य असल्याने बिबट्यांचा वावर असतो म्हणून सर्वात आधी तिकडे जाऊन खातरजमा करून घेत सर्वांना हळू हळू निर्वाण भूमीच्या परिसरात आणले इथे अरहंतांच्या पवित्र शारीरिक धातूवर निर्माण केले स्तूप पाहून सर्व आदरणीय भिक्खू संघ प्रसन्न झाले होते सर्वांचे चेहरे अगदीच प्रफुल्लित झालेले दिसत होते सर्वांनी गुडघ्यावर बसून प्राचीन काळातील आदरणीय अरहंतांच्या पावन स्मृतींना वंदन केले व पुन्हा वर डोंगर माथ्यावर पोहोचायला सुरुवात केली.
निरोप घेतांना मी आदरणीय महाथेरो भदंत डॉ. आशिन ओट्टामाथारा यांना एकच प्रश्न विचाला तुमचा अनुभव कसा होता हे सर्व पाहून काय वाटतं ? ते स्मित हास्य करत फक्त येवढेच म्हणाले “इट वाॅझ अमेझींग”.
माझ्यासाठी कालचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला होता कारण आदरणीय महाथेरो भदंत डॉ. आशिन ओट्टामाथारा हे जागतिक कीर्तीचे प्रख्यात विपश्यनाचार्य आहेत व म्यानमारला १५० विपश्याना केंद्र व वृध्दाश्रम असून संपूर्ण जगात त्यांचे १०० विपश्याना केंद्र आहेत अशा महान विभुतींच्या सोबत संपूर्ण दिवस त्यांना लेणी समजून सांगण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली होती, त्यांच्या सोबत भदंत साधनानंद महाथेरो, भदंत शांतीरत्न, भंदत लामा आणि भिक्खुणी संघ हे देखील उपस्थित होते.
आचार्य सुगत शांतेय हे देखील सोबत होते.
बुध्दीस्ट कल्चरल असोसिएशनच्या माध्यमातून आदरणीय भदंतांना आमंत्रित करण्यात आले होते व बुध्दीस्ट कलचर्ल असोसिएशनचे व लोकजन शक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आयुष्यमान रविभाऊ गरुड सर यांनी लेणी चळवळीला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार तसेच आमच्या संपूर्ण टीमचे कौतुक करत आम्हाला सम्यक संबुध्द यांची प्रतिमा आदरणीय भदंतांच्या हाताने देऊन सन्मानित केले या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उत्तर मुंबईचे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड सर या प्रसंगी उपस्थित होते.

मला आणि माझ्या सोबतच्या सर्वांनाच जे पूण्य अर्जित करण्याची अतिशय महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथम लेणी चळवळीतले राकेश कांबळे यांचे अगदीच मनापासून धन्यवाद कारण त्यांच्यामुळेच आम्हाला आदरणीय भदंतांना लेणी समजावून सांगता आली तसेच आयुष्यामान गाडे सर व टीम म्हणून काल ज्यांचे सहकार्य मिळाले ते अर्जुन काटे , व्यस्ततेमुळे काल प्रत्यक्षात उपस्थित राहू न शकलेले Vivek Waghmare व माझ्या सोबत सतत सावली सारखे वावरणारे Yash Khune आणि Siddharth Gaikwad यांचे देखील मनःपूर्वक धन्यवाद.

सूरज रतन जगताप

लेणी अभ्यासक