बेरोजगारीचं भीषण वास्तव! पुण्यात नोकरीसाठी हजारोंचा महापूर

0
30
बेरोजगारीचं भीषण वास्तव! पुण्यात नोकरीसाठी हजारोंचा महापूर

🔹 सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओने उघड केली गंभीर परिस्थिती

पुणे – नोकरीच्या शोधात तरुण मोठ्या प्रमाणावर आपली शहरं सोडून बाहेर पडत आहेत. मात्र, वाढत्या बेरोजगारीमुळे नोकरी मिळवणं अधिक कठीण बनत चाललं आहे. याचाच प्रत्यय पुण्यातील एका घटनेत आला आहे. यूपीएस कंपनीने केवळ १०० पदांसाठी भरतीची जाहिरात दिली होती, पण ४ ते ५ हजार उमेदवार मुलाखतीसाठी हजर झाले!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. कंपनीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या असून, हातात बायोडेटा घेऊन तरुण-तरुणी संधीच्या प्रतीक्षेत उभे आहेत. ही परिस्थिती पाहून अनेकांनी वाढती बेरोजगारी आणि लोकसंख्येचा विषय चर्चेत आणला आहे.

तरुणांना मोठी स्पर्धेची जाणीव

व्हिडीओत एक व्यक्ती उमेदवारांना सांगताना दिसत आहे की, “हातातील नोकरी सोडू नका, कारण बाहेर प्रचंड स्पर्धा आहे.” या घटनेने बेरोजगारीच्या संकटाची गंभीरता अधोरेखित केली आहे.

नेटिझन्सही यावर प्रतिक्रिया देत आहेत. “एका नोकरीसाठी हजारोंचा महापूर! अवघड आहे तरुणांचं,” अशी कमेंट काहींनी केली आहे, तर काहींनी याला “बेरोजगारीचं भीषण वास्तव” म्हणून हाक दिली आहे.

बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर

गेल्या काही वर्षांत शिक्षण घेऊनही नोकरी मिळवणं कठीण झालं आहे. बेरोजगारीचा वाढता दर हा देशासाठी मोठा प्रश्न बनला आहे. या परिस्थितीवर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात आणखी गंभीर संकट उभं राहू शकतं.