Thursday, September 17, 2026
Homeफलटणस्वर्गीय मोहनराव नाईक निंबाळकर (बापू) यांची आज जयंती

स्वर्गीय मोहनराव नाईक निंबाळकर (बापू) यांची आज जयंती

समाजकारण, सहकार आणि विकासाच्या कार्यातून निंबळकसह पूर्व फलटण भागावर उमटविला ठसा

फलटण | प्रतिनिधी :- निंबळक, ता. फलटण येथील राजे गटाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय मोहनराव विठ्ठलराव नाईक निंबाळकर (बापू) यांची आज, १७ सप्टेंबर रोजी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त निंबळकसह फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिक, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांकडून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येत आहे.

काही माणसे स्वतःसाठी जन्मतच नसतात, तर ती समाजाच्या उद्धारासाठी जन्म घेतात. या विचाराचे उदाहरण म्हणजे स्वर्गीय मोहनराव नाईक निंबाळकर (बापू) होत. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांतून एखादी आदर्श व्यक्ती कशी असावी, याची प्रचिती येत होती.

निंबळक गावातील विविध जाती, धर्म आणि पंथातील नागरिकांना बरोबर घेऊन त्यांच्या कल्याणासाठी काम करण्याची परंपरा नाईक निंबाळकर कुटुंबीयांमध्ये आजही जोपासली जात आहे. समाजसेवेचे हे व्रत सुरूच असून निंबळक गावच्या विकासामध्ये नाईक निंबाळकर घराण्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

स्वर्गीय मोहनराव विठ्ठलराव नाईक निंबाळकर (बापू) यांचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी निंबळकच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात योगदान असलेल्या नाईक निंबाळकर घराण्यात झाला. सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक सहकार महर्षी कै. विठ्ठलराव राजेजीराव नाईक निंबाळकर हे त्यांचे पिताश्री. त्यांच्याकडून मोहनबापूंना राजकारण आणि सहकाराचे संस्कार व मार्गदर्शन मिळाले. या संस्कारांच्या बळावर त्यांनी सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले.

आपल्या कार्यकर्तृत्वातून गावाच्या विकासाला गती देण्याचे त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील सामाजिक, राजकीय, कृषी, शिक्षण, सहकार, कला, साहित्य, योगाभ्यास आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

निंबळकच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार क्षेत्र हे महत्त्वाचे साधन असल्याचे बापूंना ज्ञात होते. त्यामुळे त्यांनी १९९१ मध्ये श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना निंबळक येथे केली. पतसंस्थेच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांशी संपर्क वाढवून गरजू व्यक्तींना उद्योगधंद्यासाठी मार्गदर्शन तसेच प्रसंगी अर्थसहाय्य करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले.

त्यांच्या प्रयत्नांतून या पतसंस्थेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेचे निंबळक येथील मुख्य कार्यालय तसेच फलटण येथे स्वमालकीच्या प्रशस्त इमारतीतील सुसज्ज कार्यालय कार्यरत आहे. पवारवाडी, ता. फलटण येथील शाखाही कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार आणि बचतगटातील महिलांना अर्थसहाय्य करून रोजगारनिर्मितीसाठी मदत केली जाते.

गावच्या विकासाच्या परिघाबाहेर जाऊन तालुक्याच्या ठिकाणी विविध क्षेत्रांत काम करत असतानाही बापूंनी गावातील सर्वसामान्य माणसाची साथ कधी सोडली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. मैत्री जपणारा आणि माणुसकीचे नाते सांभाळणारा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वपूर्ण पैलू होता.

युवकांपासून अबालवृद्धांपर्यंत माणुसकीचे नाते जपण्यात बापू अग्रेसर होते. त्यांनी विविध संस्थांमध्ये निंबळक परिसरातील अनेक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. “एका तरुणाला नोकरी देणे म्हणजे एक कुटुंब उभे करणे,” ही भावना त्यांनी जपली.

“निंबळक म्हणजे मोहनबापू” हे समीकरण संपूर्ण तालुक्याला परिचित होते. त्यामुळे निंबळक परिसरात कोणताही निर्णय घेताना अथवा विकासाची योजना राबविताना मोहनबापूंचे मार्गदर्शन घेतले जात होते. आपल्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेत त्यांनी राजकारण आणि समाजकारण केले. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कायम राहिली.

आई-वडिलांपासून तसेच बहीण-भावांकडून मिळालेला समाजकारणाचा वारसा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेला. श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक तसेच श्रीमंत रामराजे सहकारी वाहतूक संस्था यांसारख्या तालुकास्तरीय सहकारी संस्थांचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. राजकीय क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले.

काही माणसे ओंजळीतील सुगंधी फुलांसारखी असतात. त्यांच्या क्षणभराच्या सहवासानेही आयुष्य सुगंधित होते. अशा व्यक्तिमत्त्वांपैकी बापू एक होते. त्यांच्या प्रेरणेने, योग्य मार्गदर्शनाने आणि आधारामुळे अनेक कुटुंबांना प्रगतीची दिशा मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि आधाराचा लाभ झालेल्या अनेकांनी आजही त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बापूंच्या मार्गदर्शनामुळे जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला; मात्र हा विजय पाहण्यासाठी बापू हवे होते, अशी भावनिक आठवण सौ. वैशाली संदिप कांबळे, जिल्हा परिषद सदस्या यांनी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरातील महिला बापूंच्या सहकार्याने जिल्हा परिषदेची सदस्य झाली, याचा आनंद बापूंना झाला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

१५ ऑक्टोबर रोजी बापूंच्या निधनाची वार्ता कानावर पडली आणि काळजाचा ठोका चुकला. त्यांच्या निधनाने निंबळकसह अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली.

स्वर्गीय मोहनराव नाईक निंबाळकर (बापू) यांच्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला, हृदयस्पर्शी नेतृत्वाला आणि आदर्शवत कार्याला निंबळकसह पूर्व फलटण भाग कधीही विसरणार नाही. बापू आज आपल्या मध्ये नसले तरी त्यांचे विचार, कार्य आणि मार्गदर्शन कायम स्मरणात राहणार आहे.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय मोहनराव नाईक निंबाळकर (बापू) यांच्या पवित्र स्मृतींना त्रिवार अभिवादन.

— सौ. वैशाली संदिप कांबळे, जिल्हा परिषद सदस्या

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments