वारीमध्ये काळाची झडप; नीरा नदीत स्नानासाठी गेलेल्या १५ वर्षीय वारकऱ्याचा पाण्यात बुडून अपघात

0
15
वारीमध्ये काळाची झडप; नीरा नदीत स्नानासाठी गेलेल्या १५ वर्षीय वारकऱ्याचा पाण्यात बुडून अपघात

अकलूज  १ जुलै:  जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी नीरा नदीकाठी एक दुर्दैवी घटना घडली. संतांची भक्ती आणि आस्था मनात घेऊन वारीत सहभागी झालेला एक १५ वर्षीय गोविंद कल्याण फोके नावाचा बाल वारकरी नदीत स्नानासाठी गेल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.

गोविंद हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावचा रहिवासी असून तो आपल्या आजी परेगा प्रभाकर खराबे यांच्यासोबत वारीमध्ये सहभागी झाला होता. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी व अकलूजला जोडणाऱ्या नीरा नदीवरील बंधाऱ्यात तो आंघोळीसाठी उतरला होता. मात्र अचानक आलेल्या प्रवाहाच्या वेगामुळे तो नदीच्या भोवऱ्यात अडकला आणि पाहता पाहता पाण्याच्या गर्भात समाविष्ट झाला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या मोरगाव येथील होमगार्ड जवान राहुल अशोक ठोंबरे यांनी आरडाओरड ऐकून क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. त्यांनी दोन वेळा गोविंदला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याचा जोर आणि प्रवाहाच्या अनियंत्रित वेगामुळे त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. यामध्ये होमगार्ड स्वतःही एका बाजूला फेकले गेले, तर गोविंद नदीच्या प्रवाहात वाहून गेला.

या घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक अभिजीत कणसे यांनी सांगितले की, “सदर मुलगा अद्याप सापडलेला नाही. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस शोधकार्य करत आहेत.”

“माझा नातू माझ्यासमोर पाण्यात गेला…”
हे दृश्य गोविंदच्या आजीसाठी अत्यंत काळजाचा ठरले. “आमची ही दुसरी वारी होती. आंघोळीसाठी आम्ही दोघं नदीकाठी गेलो. तो पाण्यात गेला आणि अचानक त्याचा आवाजच बंद झाला. मी जोरात आरडाओरड केला. काहींनी उड्या मारल्या, पण अजून तो सापडलेला नाही,” असे सांगताना आजीचा आक्रोश गहिवरून टाकणारा होता.

वारीच्या भक्तिमय वातावरणात ही घटना काळजाला चटका लावणारी असून, यामुळे वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुढील काही तास नीरा नदीच्या परिसरात शोधमोहीम राबवली जाणार आहे.