फलटण शहरात थरार! संशयिताचा हवेत गोळीबार, एकजण पसार

0
11
फलटण शहरात थरार! संशयिताचा हवेत गोळीबार, एकजण पसार

फलटण :-  फलटण शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस उघडपणे समोर येत असताना, मंगळवारी संध्याकाळी गिरवी नाका परिसरात चकमकीसारखी घटना घडली. वीणा नंबर प्लेट लावलेल्या मोटरसायकलवरून फिरणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी थांबवले असता, त्यातील एकाने थेट हवेत गोळी झाडत पलायन केले, तर दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पुढे आली आहे.

याआधी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांच्या राहत्या घरी भरदिवसा चोरी होऊन तब्बल सात लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. त्या घटनेनंतरही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रचंड प्रश्न उपस्थित झाले होते.

शहरातील नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाबद्दल प्रचंड असंतोष असून, चोरट्यांनी अक्षरशः शहर आणि ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. गोरगरीब जनतेला लुटणाऱ्या टोळ्यांनी आता चक्क गोळीबार करून पोलिसांना थेट आव्हान दिल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेनंतर फलटण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.