Sunday, September 13, 2026
Homeसाताराठोसेघर धबधबा: निसर्गाच्या चमत्काराचे पर्यटनकेंद्र

ठोसेघर धबधबा: निसर्गाच्या चमत्काराचे पर्यटनकेंद्र

सातारा: ठोसेघर धबधबा हा कास पुष्प पठारासह साताऱ्याच्या निसर्ग सौंदर्याचे महत्त्वाचे आकर्षणकेंद्र बनला आहे. पावसाचा जोर ओसरताच पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून आणि परदेशातूनही पर्यटक ठोसेघरच्या मनमोहक धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

सातारा जिल्ह्याला निसर्गसंपन्नतेचे अनमोल वरदान लाभले आहे. ठोसेघर धबधबा, कास पठार, वजराई धबधबा, आणि सडा वाघापूरचा उलटा धबधबा ही पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे आहेत. परंतु, ठोसेघर धबधब्याचे अद्वितीय सौंदर्य पर्यटकांना अधिकाधिक मोहून टाकते.

मुसळधार पावसामुळे काही काळ ठोसेघर बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा पर्यटकांचा ओघ वाढत आहे. विशेषतः वर्षा सहली, कौटुंबिक सहली आणि ग्रुप ट्रिप्ससाठी ठोसेघर धबधबा हिट ठरत आहे. याठिकाणी येणारे पर्यटक निसर्गाच्या सौंदर्यात रममाण होतात आणि धबधब्याच्या समोर फोटो काढून आठवणींमध्ये हा अनुभव जपतात.

उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्या संकल्पनेतून ठोसेघरमध्ये सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर पर्यटकांच्या फोटोची धूम पाहायला मिळते. याशिवाय, प्री-वेडिंग शूट्ससाठीही ठोसेघर एक प्रसिद्ध स्थळ झाले आहे. येथे कास पठारासारख्या फुलांच्या विविध प्रजाती पर्यटकांच्या आनंदात भर घालतात.

पर्यटकांच्या सोयीसाठी येथे प्रसाधनगृह, वृद्धांसाठी विश्रामगृह, कपडे बदलण्यासाठी खास व्यवस्था, आणि ठोसेघरची माहिती देणारा चलचित्र हॉल उपलब्ध आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटी गार्डही नेमले गेले आहेत, ज्यामुळे ठोसेघरला भेट देणाऱ्या पर्यटकांचे समाधान आणि आनंद दिसून येतो.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments