
फलटण / प्रतिनिधी : फलटण नगरपालिकेत लोकप्रतिनिधींनाच बसण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याची धक्कादायक परिस्थिती समोर येत आहे. विशेषतः विरोधी पक्षातील शिवसेना नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी किंवा मतदारांशी संवाद साधण्यासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नगरपालिकेत शिवसेनेचे एकूण ९ नगरसेवक निवडून आले असून १ सदस्य स्वीकृत आहे. या सर्वांमध्ये फक्त एक नगरसेवक अनुभवी असून उर्वरित ८ नगरसेवक प्रथमच निवडून आलेले आहेत. या नवोदित नगरसेवकांमध्ये ५ महिला आणि ३ पुरुष यांचा समावेश आहे. बहुतांश नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आल्याने कामकाज समजून घेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांना काम करण्यासाठी आवश्यक सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
नगरपालिकेत नागरिक दररोज विविध समस्यांसाठी लोकप्रतिनिधींना भेट देत असतात. मात्र विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडे बसून नागरिकांचे प्रश्न ऐकण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी स्वतंत्र केबिन अथवा सामूहिक दालन नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. एका शिवसेना नगरसेवकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनाच जर बसण्यासाठी जागा उपलब्ध नसेल, तर नागरिकांच्या समस्या मांडल्या जाणार कशा आणि त्यावर मार्ग कसा निघणार? असा सवाल आता नागरिकांकडूनही उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे फलटण नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.
दरम्यान, विरोधी शिवसेना नगरसेवकांकडून स्वतंत्र सामूहिक केबिन देण्याची मागणी करण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत अधिकृत पातळीवर नेमकी मागणी करण्यात आली आहे का, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नाही. जर मागणी करूनही केबिन उपलब्ध करून दिली जात नसेल, तर तो सत्ताधारी पक्षाचा मनमानी कारभार ठरेल, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
त्यामुळे नागरिकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडणे शक्य व्हावे यासाठी विरोधी शिवसेना नगरसेवकांना तातडीने स्वतंत्र सामूहिक केबिन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
मुख्य मुद्दे :
फलटण नगरपालिकेत विरोधी शिवसेना नगरसेवकांना स्वतंत्र केबिन नाही
९ निवडून आलेले व १ स्वीकृत सदस्य
८ नगरसेवक प्रथमच निवडून; ५ महिला, ३ पुरुष
नागरिकांशी संवाद साधताना अडचणी
सामूहिक केबिन देण्याची मागणी प्रलंबित







