शिस्तीच्या बळावर श्रीमंत मालोजीराजे शेती संकुलाची यशस्वी वाटचाल!

0
14
शिस्तीच्या बळावर श्रीमंत मालोजीराजे शेती संकुलाची यशस्वी वाटचाल!

फलटण, दि. २९ : शिस्तीच्या भक्कम पायाावर उभा असलेला श्रीमंत मालोजीराजे शेती संकुल आज राज्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. केवळ माध्यमिक शेती विद्यालयाने सुरू झालेली ही शैक्षणिक वाटचाल आज उद्यानविद्या आणि कृषी महाविद्यालयाच्या रूपाने विस्तारित झाली आहे, याचे श्रेय प्राचार्य अरविंद निकम यांच्या नेतृत्वातील शिस्तप्रिय आणि गुणवत्ता आधारित व्यवस्थापनाला असल्याचे गौरवोद्गार श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयाचे प्राचार्य संजय वेदपाठक, उपशिक्षक वसंत यादव आणि प्रयोगशाळा सहाय्यक जगन्नाथ (भाऊ) कापसे यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक चव्हाण होते.

या प्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम, नियामक मंडळ सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, शरदराव रणवरे, रणजीत निंबाळकर, प्राचार्य यु.डी. चव्हाण, एस.डी. निंबाळकर, नितीन भोसले, सुरेशराव तावरे, महादेवराव माने, निलेश कापसे, वामनराव यादव, पत्रकार अरविंदभाई मेहता, सुभाष भांबुरे, दादासाहेब चोरमले, शंकरराव बर्गे, प्रगती कापसे, शाम कापसे, राजेंद्र कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलात सातत्याने गुणवत्ता टिकवली जात असून त्याचे परिणाम म्हणूनच या संकुलातील विद्यार्थी राज्यभर विविध क्षेत्रात यश मिळवत आहेत. त्यांनी प्राचार्य वेदपाठक, उपशिक्षक यादव आणि भाऊ कापसे यांच्यासह सर्व सेवकांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले की, “भाऊ कापसे यांनी शैक्षणिक संस्थेत तसेच जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्य करताना संयम, शिस्त आणि जनसेवा यांचे मूर्तिमंत उदाहरण दिले. त्यांचा अनुभव संस्थेसाठी भविष्यातही उपयुक्त ठरेल.”

माजी आमदार दीपकराव चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षकांचे कार्य केवळ पुस्तकी शिक्षणापुरते न ठेवता विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणारे असल्याचे अधोरेखित केले. चांगल्या कामाचे श्रेय संस्थेला आणि कुटुंबालाही समाधान देते, असे सांगत त्यांनी सेवापूर्ती झालेल्या तीनही व्यक्तींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य अरविंद निकम यांनी तीनही कर्मचाऱ्यांचे कार्य गौरवत त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्था यापुढेही घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रारंभी उपप्राचार्य काळे सर यांनी स्वागत, तर दिवसे सर यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. राजश्री शिंदे व शिल्पा इंगवले यांनी सूत्रसंचालन केले.