
फलटण | भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फलटण नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभात नगराध्यक्ष श्री. समशेरशिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
समारंभानंतर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष म्हणाले की, प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानाची ताकद, लोकशाही मूल्ये आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये यांची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे.
यावेळी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सर्व शहीदांना, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांना अभिवादन केले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून उभे राहताना हा सन्मान वैयक्तिक नसून फलटणकरांनी लोकशाहीवर दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फलटण शहराचा सर्वांगीण, समताधिष्ठित व शाश्वत विकास हेच आपल्या कार्यकाळाचे मुख्य ध्येय राहील, असे त्यांनी सांगितले.
शहराच्या विकासासाठी स्वच्छता व आरोग्य सेवांना प्राधान्य, दर्जेदार रस्ते व भक्कम पायाभूत सुविधा, तरुण व महिलांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी, पारदर्शक प्रशासन तसेच कोणताही भेदभाव न करता सर्वसमावेशक विकासावर भर देण्याची ग्वाही नगराध्यक्षांनी दिली.
फलटण हे केवळ शहर नसून प्रत्येक नागरिकाची ओळख व अभिमान आहे, असे सांगत शहराच्या प्रगतीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
समारोप करताना प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांनी संविधानाचे पालन करणे, शहर स्वच्छ ठेवणे, कायद्याचा सन्मान करणे आणि फलटणला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले.








