Wednesday, August 12, 2026
Homeसाताराजन-सामान्यांचा,रयतेचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू - महावीर भालेराव

जन-सामान्यांचा,रयतेचा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू – महावीर भालेराव


फलटण : शोषित,पिढित,वंचित समूहा बरोबरच जनसामान्यांच्या हक्कांची काळजी घेणारा राजा म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांकडे पाहतो. त्यांनी कायम जनसामान्यांच्या, रयतेच्या न्यायी हक्कांसाठी लढा दिला.त्यांच्या न्याय हक्कांसाठी अनेक प्रकारच्या कायदेशीर तरतुदी करून त्यांचे हक्क जपण्याचे काम केले.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवली. प्रस्थापितांशी संघर्ष करीत असताना इथल्या सामान्य माणसाशी त्यांनी कधीच आपली नाळ तुटू दिली नाही. त्यांनी कधीही राजेशाही मिरवू दिली नाही आणि मिरवली ही नाही. म्हणूनच त्यांना लोकराजा म्हणून ओळखले जाते. असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे अध्यक्ष महावीर भालेराव यांनी केले. ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सभागृह कोळकी फलटण या ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत होते.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका शाखेचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार कार्याला अभिवादन करून ते म्हणाले,”रयतेचा राजा छत्रपती शाहू महाराज यांना आपण लोकराजा, राजर्षी या उपाध्यांनी ओळखतो. खऱ्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी व्यक्तिमत्व असून त्यांचे विचार व कार्य इथल्या बहुजन समाजाला दिशा देणारे आहे. त्यांच्या जयंतीदिनी आपण त्यांच्या विचार व कार्याचा जागर करून सामाजिक समतेसाठी प्रयत्न करूया. “
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान व त्यांच्यामध्ये असणारा स्नेह याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले राजर्षी शाहू महाराजांचे व्यक्तिमत्व हे परिवर्तनाची चळवळ गतिमान करणारे आहे. कला, क्रीडा, साहित्य, संगीत, कृषी, शिक्षण आणि बऱ्याच बाबतीत आदर्शवत आहे. त्यांनी या सर्वच क्षेत्रांमध्ये कोल्हापूरचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. सक्तीचा शिक्षणाचा कायदा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात करून 50 टक्के आरक्षण देशात देऊन सर्वप्रथम आरक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. म्हणूनच आपण त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो.त्यांनी जातीप्रथेचे समूळ उच्चाटन केले. राधानगरी सारखे धरण निर्माण करून कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना ‘सामाजिक समतेचे आधारस्तंभ’ म्हणून संबोधतात. त्यांचे विचार व कार्य पुढे घेऊन जाऊन समताधिष्ठित समाजाचे स्वप्न साकार करूया.”असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेचे कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग सांगून त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आव्हान केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष बजरंग गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेचे कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते यांनी यावेळी बुद्ध वंदना घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याला आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments